हबलने शोधला सूर्यमालेबाहेरील नवा बाह्यग्रह

युवा विवेक    14-May-2021   
Total Views |

hubble_1  H x W 
एक्सो-प्लॅनेट म्हणजेच बाह्यग्रह. आपल्या सूर्यमालेपासून शेकडो प्रकाशवर्ष अंतरावर आपल्याच सूर्यामालेसारख्या अनेक नव्या सूर्यमाला आहेत. ह्या सूर्यमालांमध्येसुद्धा केंद्रस्थानी एक किंवा अनेक तारे, आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या भोवती कक्षेत असलेले लहान-मोठे असे आणि विविध प्रकारचे
ग्रह आहेत. याच ग्रहांना एक्सो-प्लॅनेट म्हणजेच बाह्यग्रह असे संबोधले जाते. हे ग्रह आपल्यापासून शेकडो प्रकाशवर्ष दूर असल्याने यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला काही वर्ष वेळ लागतो. त्यामुळे त्यांचा शोध घेणे किचकट काम आहे. या बाह्यग्रहांचा शोध लावण्यासाठी वैज्ञानिक एक अनोखी पद्धत वापरतात. या पद्धतीला ट्रांझिट मेथड असे संबोधले जाते. या पद्धतीमध्ये दूरदर्शकाच्या साह्याने त्या सूर्यमालेतील मुख्य ताऱ्याकडून येणाऱ्या प्रकाशाचे विश्लेषण केले जाते. जेव्हा या सूर्यमालेतील ग्रह हा त्या ताऱ्यासमोरून जाईल तेव्हा त्या ताऱ्याचा प्रकाश त्या ग्रहाच्या आकाराच्या तुलनेत कमी होईल. याचे सोपे उदाहरण म्हणजे तुम्ही सूर्यग्रहण अनुभवले असेलच. सूर्याग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याच्या समोर येतो तेव्हा, आपल्याला सूर्याचा प्रकाश देखील कमी झालेला दिसतो. अगदी अशाच पद्धतीने हे बाह्यग्रह शोधले जातात.
नुकतेच या पद्धतीने हबल या अवकाशीय दुर्बिणीने एक अनोखा असा बाह्यग्रह शोधला. हा बाह्यग्रह पृथ्वीपासून सुमारे ३७९ प्रकाशवर्षे इतका दूर आहे. म्हणजेच या ग्रहापासून निघालेले प्रकाशकिरण प्रचंड प्रवास करून पृथ्वीपर्यंत पोहोचायला सुमारे ३७९ वर्षे इतका कालावधी लागतो. या बाह्यग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रह आकाराने सतत प्रसरण पावत आहे. ताऱ्याभोवती सुरुवातीच्या काळात जे धुलीकण आणि विविध पदार्थ फिरत असतात त्यांच्या सततच्या घर्षणामुळे हळूहळू ते कण एकमेकांना बांधले जाऊ लागतात आणि हळूहळू त्याच्यापासून ग्रहांची निर्मिती होते. हबलने शोधलेला हा ग्रह नुकताच जन्मलेला असून सध्या तो वायुरूपात आहे. हा ग्रह अंदाजे ५० लक्ष वर्षांपूर्वी जन्मलेला असला पाहिजे आणि याचा आकार हा आपल्या सूर्यमालेतील गुरू इतका मोठा आहे. हा ग्रह त्याच्या प्रारंभिक काळात असल्याने तो सतत प्रसारण पावत असल्याचे हबलच्या या शोधावरून लक्षात आलेले आहे. या बह्याग्राहाला PDS ७०B असे नाव देण्यात आलेले आहे. या ग्रहाचा अभ्यास करण्यास वैज्ञानिक उत्सुक आहेत याचे मुख्य कारण म्हणजे पहिल्यांदाच त्यांना नव्याने तयार होऊ घातलेल्या ग्रहाचे आकलन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. हबल च्या सहाय्याने वैज्ञानिकांनी प्रथमच एखाद्या बह्याग्रहाचे आकारमान आणि वस्तुमान किती पटीने वाढत आहे याचे गणित मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हबल दुर्बिणीच्या सहाय्याने आजवर सुमारे ४००० बाह्यग्रह शोधण्यात वैज्ञानिकांना यश प्राप्त झालेले आहे. यापैकी साधारण १५ बह्याग्रहांचे थेट छायाचित्रीकरण तर उर्वरित ग्रहांचे ट्रांझीट मेथड च्या सहाय्याने चित्रीकरण करण्यात हबलला यश आलेले आहे. या बह्याग्रहांचा शोध यासाठी महत्वाचा आहे की भविष्यकाळात याच सूर्यमालांमध्ये कदाचित पृथ्वीसमान ग्रह असू शकेल आणि त्यावर पाण्याची शक्यता असल्याने कदाचित मानवाप्रमाणेच प्रगत अशी जीवसृष्टी असू शकेल. यामुळेच बाह्यग्रहांचा शोध हा मानव जातीच्या भविष्याच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचा आहे. कारण येत्या काळात कदाचित प्रकाशाच्या वेगाने जाणारी अवकाशयाने बनवण्यात मानवाने यश प्राप्त केले तर, हे बाह्यग्रह कदाचित अंतराळ प्रवासातील आपली स्थानके ठरू शकतील.
- अक्षय भिडे