सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानातील विविधता

युवा विवेक    14-May-2021   
Total Views |

sun_1  H x W: 0 
सूर्याच्या पृष्ठभागावरील कोरोनाच्या तापमानाने वैज्ञानिकांना अनेक वर्षे हैराण केलेले आहे. वास्तविक बघता विस्तवाच्या जितक्या जवळ जाऊ तितकी धग आणि तापमान ह्यात वाढ अपेक्षित असते, परंतु या उलट सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान हे तुलनात्मकरीत्या थंड म्हणजे सुमारे १०,००० अंश सेल्सियस तर, त्यापुढील काही दशलक्ष किमी पसरलेल्या कोरोनाचे तापमान हे सुमारे काही दशलक्ष अंश सेल्सियस इतके आहे. कोरोनाहा सूर्याच्या शेवटचा भाग असून, त्याचे तापमान हे पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा इतके जास्त आहे, ही गोष्ट चकित करणारी आहे. शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
नुकत्याच झालेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होणाऱ्या लहान मोठ्या शेकोट्यांमुळे कदाचित कोरोनाचे तापमान अबाधित राहत असेल. हे संशोधन २७ एप्रिल २०२१ रोजी युरोपियन भूगर्भीय संस्था येथे सादर करण्यात आले आणि आता ते प्रकाशनासाठीसुद्धा मान्य करण्यात आलेले आहे.
या संशोधनासाठी संगणकाच्या मदतीने सूर्याच्या पृष्ठभागाचे सिम्युलेशन करण्यात आले. म्हणजेच सूर्याकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे संशोधकांनी सूर्याचे एक मॉडेल तयार केले. हे मॉडेल म्हणजे ज्याप्रमाणे सूर्यावर लहानलहान प्रमाणात शेकोट्या म्हणजेच, लहान प्रमाणात, परंतु सूर्याच्या केंद्रात ज्याप्रमाणे ऊर्जा तयार होते, त्याच प्रकारे ऊर्जा तयार करणारे स्रोत, या मॉडेलद्वारे तयार करण्यात आले. त्याच्या आधारे वैज्ञानिकांनी सूर्याच्या काही पृष्ठभागाचे मॉडेल बनवले आणि त्यात हे उर्जास्त्रोतदेखील बनवले. याचा उपयोग असा झाला की, सूर्याच्या ज्या कोरोनाभागात तापमान खूप जास्त आहे, त्याच मॉडेलच्या भागातदेखील तापमान हे त्याच प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. या प्रयोगामुळे शास्त्रज्ञ मंडळींना सूर्याच्या कोरोना भागातील तापमान इतके जास्त असल्याचे कारण शोधण्यास नक्की मदत होणार आहे.
या सूर्यावरील लहानलहान ऊर्जास्त्रोतांचे महत्त्व शास्त्रज्ञाना तेव्हा लक्षात आले, जेव्हा नासाच्या वैज्ञानिकांनी २०२०मध्ये सूर्याची जवळून काढलेली छायाचित्रे मिळवली. या छायाचित्रांमध्ये असे लक्षात येते की, सूर्याच्या संपूर्ण तबकडीवर असे अनेक लहानलहान ऊर्जास्त्रोत आहेत. याचाच अर्थ सूर्याच्या या कोरोना भागाचे तापमान अबाधित ठेवण्यात या लहान ऊर्जास्रोतांचे फार मोठे महत्त्व आहे. सूर्यावरील या कोरोनाचे तापमान मोठे ठेवण्याचे काम अशा लहान ऊर्जास्रोतांमुळे होत असावे, असे १९८० मध्ये यूजिन पार्कर नावाच्या संशोधकाने मांडले होते. यांच्याच नावाने सूर्याच्या अभ्यासासाठी नासाने पार्कर सोलर प्रोब या नावाने एक अवकाशयान पाठवले होते. या अवकाशयानाच्या साह्याने मिळणाऱ्या डेटाच्या मदतीनेच हे मॉडेल बनवण्यात आले होते. हेच शास्त्रज्ञ सध्या ९३ वर्षाचे आहेत आणि कदाचित या संशोधनावरून पार्कर यांचा सिद्धांत खरा ठरण्याची दाट शक्यता आहे. येत्या काळात सूर्याच्या अभ्यासासाठी अनेक याने सूर्याच्या दिशेने पाठवण्यात येणार आहेत त्यांच्या द्वारे मिळालेल्या माहिती मधून कदाचित या विषयी नक्की अधिक माहिती मिळेल. भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोसुद्धा 'आदित्य' नावाचे अवकाशयान लवकरच सूर्याच्या दिशेने धाडणार आहे. लवकरच आपल्याला सूर्याविषयीची भरपूर माहिती मिळून या सूर्यामधील घटनांचा कार्यकारण भाव समजण्यास नक्की मदत होईल.
- अक्षय भिडे