अवघड जागेचं दुखणं उलगडून पाहताना

युवा विवेक    14-May-2021   
Total Views |

unraveling_1  H 
कोणत्याही कलाकाराचं आयुष्य निरखून पाहावं, तर ते चारचौघांसारखं सरळसोट का नसतं? शापित गंधर्वाचं जगणं हे त्याच्यासाठी विधिलिखित असतं की त्याने आयुष्यभर स्वतः वेगळं आयुष्य जगण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा तो परिपाक असतो? त्यातून मिळालेल्या प्रसिद्धीनंतरही जे शोधण्यासाठी हा सगळा अट्टाहास केला, ते त्याला खरंच सापडतं का? की सरतेशेवटी त्याची ओंजळ इतरांप्रमाणेच रिकामी राहते? मग अशा वेळी तो आपल्या गतकाळातले क्षण आठवून स्वतःला दोष देत राहतो की त्यातही नवनिर्मितीची काही बीजं सापडतात का, ते शोधतो? असे अनेक प्रश्न पेद्रो अलमोदोवार लिखित आणि दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट 'पेन अँड ग्लोरी' आपल्यासमोर उपस्थित करतो आणि एक निरतिशय सुंदर असा दृश्यानुभव देऊन जातो.
साल्वादोर या एकेकाळच्या प्रथितयश दिग्दर्शकाने स्वतःचं लिखाण आणि दिग्दर्शन याला पूर्णविराम दिलाय. तरीही अचानक तीन दशकांपूर्वी दिग्दर्शित केलेल्या स्वतःच्या गाजलेल्या चित्रपटाचं स्क्रीनिंग पुन्हा करण्याचं तो ठरवतो आणि त्यानिमित्ताने अल्बर्टो या त्या चित्रपटातल्या अभिनेत्याशी साल्वादोरचे झालेले वाद पुन्हा नव्याने उफाळून येतात. साल्वादोर पाठदुखी, डोकेदुखी, अचानक श्वास कोंडणं अशा अनेक व्याधींनी ग्रस्त आहे. त्यात अल्बर्टोसह झालेल्या काही भेटींत त्याला हेरॉईनचं व्यसन जडलं आहे. अशाच एका भेटीत त्याने लिहिलेला 'अॅडिक्शन' हा मोनोलॉग अल्बर्टो वाचतो आणि त्याचं नाट्यरूपांतर करण्यासाठी साल्वादोरला गळ घालतो. आपण काय लिहिलंय, हेच तुला कळलेलं नाही, असं सांगत तो अल्बर्टोला स्पष्ट नकार देतो. त्यानंतर झालेल्या नियोजित स्क्रीनिंगला नशेच्या आहारी गेलेला साल्वादोर प्रेक्षक त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी त्याची वाट पाहत असतानाही स्वतःच्या आजारपणाचं कारण सांगून जाण्याचं टाळतो आणि त्या वेळी घरी असलेल्या अल्बर्टोबरोबर त्याचं कडाक्याचं भांडण होतं. अल्बर्टोची समजूत काढण्यासाठी पुन्हा त्याच्या दारावर गेलेला साल्वादोर 'अॅडिक्शन'चं रूपांतर करण्याची अल्बर्टोला परवानगी देतो, मात्र स्वत:चं नाव कुठेही येऊ नये, अशी गळ घालतो. अल्बर्टो त्यासाठी तयार होतो आणि सादरीकरण करतो, तेही अपेक्षेपेक्षा उत्तम. मात्र साल्वादोरला जी भीती असते, तेच होतं. या मोनोलॉगच्या निमित्ताने त्याचा भूतकाळच त्याच्या समोर येऊन उभा ठाकतो. साल्वादोर त्याला कसा सामोरा जातो, त्या धक्क्यातून तो सावरतो की आणखी खोलात बुडत जातो, सगळ्यांतून अंग काढून घेतलेल्या साल्वादोरवर त्याच्या प्रियजनांच्या विनंतीचा काही परिणाम होतो का, त्यातून तो पुढे काय निर्णय घेतो, याबद्दल अधिक काही सांगणं म्हणजे या पेंटिंगची मजा घालवण्यासारखं होईल.
चित्रपटातील काही संवाद मनाचा तळ ढवळणारे आहेत. साल्वादोर जेव्हा मोनोलॉगमध्ये आपल्या प्रियकराला आपण हेरॉईनच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी किती वाट पाहिली, हा भाग सांगतो, तेव्हा तो म्हणतो की, "प्रेम काहीही करू शकतं, फक्त आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिला स्वतःला उद्ध्वस्त करण्यापासून नाही वाचवू शकत." एड्युआर्दोला छान पेंटिंग्ज काढता येतात, पण त्याला अक्षरओळख नाही. लहानगा साल्वादोर त्याचा हात धरून त्याला मुळाक्षरं गिरवायला शिकवताना म्हणतो, "लिहिणं म्हणजे चित्र काढण्यासारखंच आहे, फक्त अक्षरांनी चित्रं काढण्यासारखं." अशा काव्यात्मक पद्धतीने एखाद्याला जी गोष्ट चांगली जमते, त्यावर विश्वास ठेवून तुला हेही जमेल, हे सांगणं म्हणजे निव्वळ सुंदर आहे. स्वतःच्या आजारांविषयी सांगताना साल्वादोर एके ठिकाणी म्हणतो, "जेव्हा मला वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना एकाच वेळी छळत असतात, तेव्हा माझा देवावर विश्वास असतो आणि मी त्याचा धावा सुरू करतो. जेव्हा एकच एक वेदना त्रास देत असते, तेव्हा मात्र मी नास्तिक असतो." ही एक वेदना म्हणजे मनाचं दुखणं. सतत त्रास देणारी दुःखं आणि सल.
साल्वादोरचं बालपण गरिबीत गेलं आहे. मात्र तो अनेक गोष्टींमध्ये निष्णात आहे. गाण्याचं अंग उजवं असल्यामुळे त्याला इतर विषयांचा अभ्यास न करताच चांगल्या गुणांनी पास केलं जातं. मात्र मग भूगोल, शरीरविज्ञान हे विषय तो कसे शिकतो, हे दाखवणारा एक अतिशय सुंदर पीस चित्रपटात आहे. तो म्हणतो की, चित्रपटांच्या निमित्ताने मी फिरू लागलो तेव्हा मला भूगोल कळू लागला आणि माझ्या शरीराची दुखणी सुरू झाली, तेव्हा मला शरीरातल्या हाडांची, सांध्यांची, अवयवांची नेमकी ओळख झाली. चित्रपट बनवणाऱ्या कुठल्याही दिग्दर्शकाला मिळत जाणारं ज्ञान हे याहून कोणत्या वेगळ्या पद्धतीने मिळतं? आजूबाजूच्या घटनांमधून, स्वतःच्या आयुष्याचं त्रयस्थपणे अवलोकन करून त्याचा वर्तमानाशी मेळ साधतच कोणताही कलाकार आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतो, हेच अप्रत्यक्षरीत्या साल्वादोरच्या जगण्यातून दिसतं. चित्रपटातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचारलेल्या अनेक प्रश्नांना साल्वादोर 'मला माहीत नाही' हे उत्तर देतो. अगदी लहानपणीच्या प्रसंगांपासून ते दिग्गज दिग्दर्शक झाल्यानंतरही. हे माहीत नसणंच त्याच्या प्रवाही असण्याचं द्योतक आहे. तेच त्याला सगळ्या प्रश्नांची नव्याने उत्तरं शोधायला मदत करत आहे. एखादा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही, मात्र काही वर्षांनी तो 'कल्ट' म्हणून गणला जातो, हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांनी पाहिलेलं सत्य आहे. त्यामागच्या कारणांचाही वेध घेण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. काळानुरूप माणसं बदलतात, त्यांच्या आयुष्यात बरंच काही घडून गेलेलं असतं, त्यातून त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलत जाते आणि अधिक प्रगल्भ होत असते, हे सांगू पाहतो.
वरवर पाहता सगळ्यांशी फटकून वागणाऱ्या साल्वादोरच्या मनाचा हळवा कोपरा अनेक दृश्यांतून दिसत राहतो. अल्बर्टोला लवकरात लवकर घराबाहेर हाकलणारा साल्वादोर फ्रेडेरिकोला मात्र लगेच भेटायला तयार होतो. फ्रेडेरिकोने स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या चांगल्यावाईट गोष्टी सांगितल्यानंतर तो त्याच्यावर चिडत नाही. प्रेम असूनही त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्या आईची स्वतःच्या गावी शेजाऱ्यांच्या सहवासात आपला मृत्यू व्हावा, ही इच्छा आपण पूर्ण करू शकलो नाही आणि हॉस्पिटलमध्ये तिला मरण आलं, हा सलही त्याला आतून जाळतो आहे. एड्युआद्रोने त्याचं लहानपणी काढलेलं पेंटिंग अचानकपणे त्याला मिळतं आणि त्या पेंटिंगच्या मागे त्याने साल्वादोरसाठी लिहिलेलं पत्र तो वाचतो, तेव्हा भावनावेगाने त्याचे डोळे अविरत झरू लागतात. चित्रपटसृष्टीतल्याच नाही, तर इतरही कलाकारांना जेव्हा प्रेक्षक माणूसघाणा, तिरसट, गर्विष्ठ अशी शेलकी विशेषणं लावून मोकळी होतात, तेव्हा त्यांच्या संवेदनशील कलाकृतींच्या उगमाचं मूळ मात्र त्यांनी आयुष्यभर भोगलेल्या, न सांगता येणाऱ्या दुःखात आहे, हे मात्र सोयीस्करपणे विसरतात. ते दाखवून देण्याचं काम हा चित्रपट सहज करतो.
"तुम्ही जितकं अधिकाधिक पर्सनल लिहू लागता, तितकं ते अधिकाधिक युनिव्हर्सल होत जातं" असं वपुंचं एक खूप सुंदर वाक्य आहे. लेखक लिहितो तेव्हा तो स्वतःच्याच आयुष्याचा एक तुकडा वाचकांसमोर मांडत असतो. पण त्यातल्या दुःखाशी, सुखाशी नातं जुळलं की प्रत्येकाला ती आपलीच गोष्ट वाटू लागते आणि म्हणूनच कलाकार श्रेष्ठ ठरत असतो. स्वतःचाच भूतकाळ जेव्हा साल्वादोरसमोर अचानक उलगडू लागतो, तेव्हा सुरुवातीला गोंधळलेला तो त्या भूतकाळाशी शांतपणे हातमिळवणी करतो आणि हीच गोष्ट त्याला नव्याने जगण्याची उमेद देऊन जाते. प्रसिद्धीचा सुवर्णकाळ अनुभवल्यानंतर आपला मोनोलॉग निनावी असावा, अशी इच्छा करणारा आणि त्याद्वारे लोकांना आपलं आयुष्य कळू नये, यासाठी धडपडणारा तो शेवटी पुन्हा नव्याने स्वतःचीच गोष्ट सांगायला सुरुवात करतो. म्हणूनच अनेक मुद्द्यांना कवेत घेत काही नवीन सांगू पाहणारा हा चित्रपट एक आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव ठरतो.
- संदेश कुडतरकर.