स्वतःशी झगडणाऱ्याची प्रामाणिक कथा

युवा विवेक    17-Jun-2021   
Total Views |

struggle_1  H x 
'पती, पत्नी और वो' हा तसं पाहिलं तर, मालिका आणि चित्रपटांतून असंख्य वेळा चर्वितचर्वण करून झालेला विषय. विवाहबाह्य संबंधांवर कधी गंभीर भाष्य केलं गेलं, तर कधी खेळीमेळीने हा विषय हाताळला गेला. प्रेमकथांचा रतीब जसा वर्षानुवर्षे घातला गेला, तसाच या विषयाचाही. मात्र, यातील 'वो' बऱ्याचदा स्त्री होती. पुरुषांचे किंवा स्त्रियांचे विवाहबाह्य संबंध हे बहुतेकदा भिन्नलिंगी संबंधांभोवतीच आजवर घोटाळताना दिसले. अलीकडच्या काही मालिकांतून, चित्रपटांतून मात्र समलिंगी संबंधांचं चित्रणही होऊ लागलं आहे. असं असलं तरी समलैंगिकांच्या बऱ्याचशा कथा स्वतःचा स्वीकार, समाजाकडून होणारी हेटाळणी या विषयांवर भाष्य करतात. विवाहबाह्य समलैंगिक संबंध हा विषय फार कमी दिसतो. अलीकडेच झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेली 'हिज स्टोरी' ही वेब मालिका याच विषयाचा वेध घेते. केवळ एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांना काहीतरी थ्रिलिंग दाखवू या, हा आविर्भाव मात्र त्यात दिसत नाही. अतिशय संवेदनशीलपणे आणि प्रामाणिकपणे हा विषय या मालिकेत हाताळण्यात आला आहे.
साक्षी आणि कुणाल हे एक सुखी जोडपं. वीस वर्षांचा सुखाचा संसार विनातक्रार निभावलेलं. त्यांना दोन मुलं आहेत. मोठा शिवाय आणि धाकटा श्लोक. साक्षी आणि कुणालने एकत्र मिळून आता तिसरं रेस्टॉरंट उघडलं आहे. त्याच्या उदघाटन समारंभाला त्यांची मित्रमंडळी जमली आहेत. कुणालला न सांगता साक्षीने फूड ब्लॉगर आणि समीक्षक असलेल्या प्रीतलाही बोलावलं आहे. कार्यक्रमात साक्षीची मैत्रीण सोनाक्षी आपल्या नवऱ्यासोबत जिचं अफेअर चालू आहे, त्या मुलीला पाहते आणि चिडते. त्यातूनच साक्षी, राफिया, लव्हलीन आणि सोनाक्षी यांच्यात सुखी वैवाहिक आयुष्याबद्दल चर्चा सुरू होते आणि साक्षी-कुणाल परफेक्ट कपल असण्यावर सर्वांचं एकमत होतं. साक्षीपासून लपवलेलं कुणालचं एक दुसरं आयुष्य आहे. तो तीन वर्षांपासून प्रीतच्या प्रेमात आहे. सर्व काही सुरळीत चालू असताना साक्षीला कुणाल आणि प्रीतच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळतं आणि ती कोसळते. वीस वर्षांचा आपला संसार खोटा होता, ही भावना तिला उद्ध्वस्त करून टाकते आणि ती काहीतरी निर्णय घेते.
या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ती कुठेही प्रचारकी होत नाही. आक्रस्ताळेपणा दाखवत नाही. यातली पात्रं जेव्हा वीस वर्षांच्या संसाराबद्दल बोलतात, तेव्हा त्यातून आलेली प्रगल्भता त्यांच्या वागण्यातून, संवादांतून जाणवते. कुणालचं पात्र जसं खलनायकी वाटत नाही, तशीच साक्षीही बिचारी वाटत नाही. तिला अर्थातच धक्का बसलाय. लग्न सावरण्यासाठी तिच्या अल्पमतीला सुचतील असे पर्यायही ती कुणालसमोर ठेवू पाहते. मात्र, यात आपली चूक नाही, तशी कुणालचीही सर्वार्थानं चूक नाही, हे कळल्यावर त्याचं जगणं ती एक मित्र म्हणून समजून घेऊ पाहते. प्रीतमुळे आपला संसार उद्ध्वस्त झाला, या विचारातून सुरुवातीला प्रीतवर रागावलेली साक्षीनंतर त्याच्याशीही मैत्रीचं नातं जोडू पाहते. एलजीबीटी कम्युनिटीला आपण पाठिंबा देतो, आपण फार मोकळ्या स्वभावाचे आहोत, अशा स्वतःच्याच समजुतींना शांत झाल्यावर ती जोखून पाहते आणि आपला लिबरल स्वभाव आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर आहे, तोवर मिरवण्यापुरताच आजवर होता, हेही तिला स्वतःलाच जाणवतं. विशेष म्हणजे, मनातल्या या द्वंद्वानंतरही ती खचून न जाता नव्याने सुरुवात करते.
केवळ प्रीत, कुणाल आणि साक्षीच्या नात्याबद्दल ही मालिका बोलत नाही, तर त्यासोबत इतरही अनेक प्रश्नांना कवेत घेत पुढे जाते. होमोफोबियाची मुळं आपल्या समाजात किती खोलवर रुजलेली आहेत, यावर अनेक प्रसंगांतून भाष्य केलं आहे. कुणालच्या स्वतःच्या स्वीकाराबद्दल ही मालिका बोलते, त्याचप्रमाणे कुणाल आणि साक्षीचं नातं हे प्रीत आणि कुणालच्या नात्यापेक्षा कसं वेगळं आहे, यावरही हलकंफुलकं भाष्य करते. साक्षीची मैत्रीण राफिया ही सिंगल मदर आहे. आपल्या वयात येणाऱ्या मुलीला - जान्हवीला - तिने पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. मात्र, तरीही त्यांच्यात खटके उडतात. कुणाल आणि साक्षीचा मित्र निहाल आपल्या पत्नीपासून लपवून मजा करतो आहे. लव्हलीन त्याकडे दुर्लक्ष करते. मात्र, त्यांच्या मुलावर - वेदवर - जेव्हा स्वतःच्या मनातल्या पुरुषार्थाच्या कल्पना तो लादू पाहतो, तेव्हा मात्र ती आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. साक्षी आणि कुणालचा धाकटा मुलगा श्लोक जितका समजूतदार आणि शांत आहे, तितकाच मोठा मुलगा शिवाय रागीट आणि विखारी आहे. होमोफोबिक आहे. वेद, जान्हवी, श्लोक आणि शिवायची मैत्री आजच्या पिढीतल्या टीनेजर्सचं प्रातिनिधिक चित्र आहे. त्यांच्यासमोर माहितीचं मायाजाल आहे. त्यांच्याकडे गॅजेट्स आहेत. मात्र, त्यांच्या कुटुंबातले हेवे-दावे त्यांच्या मैत्रीवरही नकळत आपला ठसा उमटवत आहेत आणि त्यांच्या संवेदनशीलतेवर, त्यांच्या घडण्यावर कळत-नकळत परिणाम करत आहेत. जान्हवीसाठी पझेसिव्ह होणारा शिवाय वेदबाबत मात्र आक्रस्ताळा आहे. स्वतःला जाणून घेऊ पाहणारा, गोंधळलेला वेद जान्हवीसोबत बोलताना मात्र आनंदी असतो. शिवायच्या आक्रस्ताळ्या स्वभावावर आक्षेप घेणारा लहानगा श्लोक तो घर सोडून जाऊ लागतो, तेव्हा मात्र त्याला मिठी मारून रडतो. एकाच व्यक्तीच्या व्यक्तिगणिक बदलणाऱ्या गुणविशेषांबद्दल, एकाच व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या राग आणि प्रेमाबद्दल अशा प्रसंगांतून ही मालिका काही सांगू पाहते.
या मुलांच्या पालकांची मैत्रीही वास्तवाचं प्रतिबिंब दाखवणारी आहे. निहालच्या वाईट मनोवृत्तीचं दर्शन सर्वांना घडतं, तेव्हा सर्व जण त्याला वाळीत टाकतात. एका प्रसंगात कुणालचा आणि निहालचा होणारा संवाद तर अप्रतिम. मैत्रीमध्येही कुठे थांबावं, याची जाणीव करून देणारा. या प्रसंगाच्या वेळी 'दिल चाहता है' मधला सिद्धार्थ आकाशच्या थोबाडीत मारतो, त्या प्रसंगाची आठवण होते. प्रत्येक माणूस कसा वेगळा असतो, एकाच कुटुंबातली माणसंही एखाद्या संकटावर कशी वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होतात, हे या मालिकेतल्या पात्रांच्या वागण्यातून जाणवतं. लिफ्टमध्ये दोन पात्रांचे होणारे संवाद हीसुद्धा मालिकेतली नोंद घेण्यासारखी बाब आहे. राफिया आणि कुणालमधला संवाद, साक्षी आणि वेदमधला संवाद, निहाल आणि शिवायमधला संवाद, ही तीन दृश्यं प्रत्येक पात्राबद्दल मोजक्याच शब्दांत बरंच काही सांगून जातात.
प्रियामनीने साकारलेली खंबीर साक्षी अप्रतिम. सत्यदीप मिसराने रंगवलेला कुणाल संयत आणि शांत. मृणाल दत्तने साकारलेली प्रीतची भूमिका गोड आहे. इतर सर्व कलाकारांनीही आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. बलजितसिंग चड्ढा आणि सुपर्ण वर्मा यांचं सशक्त लिखाण या हळव्या विषयाला कुठेही भरकटू देत नाही. प्रशांत भागिया यांनी ते तितक्याच सुंदर रीतीने हदिग्दर्शित केलं आहे. श्रीनिवास आचार्य यांचं नेत्रसुखद छायांकन या गर्भश्रीमंत वर्गाचं चित्र अगदी नेमकेपणाने डोळ्यांसमोर उभं करतं. उच्चभ्रू वर्गाच्या छानछोकीत लपलेल्या काचा उलगडून दाखवताना ते केवळ एका वर्गाचं चित्रण न राहता ती माणसांची गोष्ट कशी होईल, हा मालिकेच्या लेखक-दिग्दर्शकांचा प्रामाणिक प्रयत्न या मालिकेच्या अभिनय, छायांकन, पार्श्वसंगीत अशा सर्वच बाबींतून जाणवतो. 'ये दिल' हे शीर्षकगीत आणि 'नैना काहे भर आये' हे गाणं - दोन्हीही मधाळ आणि मनाचा ठाव घेणारी. ही खऱ्या अर्थाने 'त्याची कथा' आहे. त्याला कुठेही हिरो म्हणून त्याचं उद्दातीकरण करता त्याचं माणूसपण अधोरेखित करणारी. बदलत्या नातेसंबंधांकडे डोळसपणे पाहायचं आणि विवाहाच्या नात्यातल्या मैत्रीचाही वेध घ्यायचा, तर असे प्रामाणिक प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवेत.
- संदेश कुडतरकर