'वपु' 'असेच' तर होते !

युवा विवेक    26-Jun-2021   
Total Views |

vp_1  H x W: 0  
'वपु' 'असेच' तर होते !
'कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही; मात्र गगनभरारीचं वेड रक्तात असावं लागतं....' अशी असंख्य वाक्ये, सोप्या शब्दांत सांगायचं तर 'कोट्स' ज्यांनी अतिशय सहजपणे निर्माण केले, ज्यांचं साध बोलणंही सुंदर होत गेलं, ज्यांचं लिखाण वाचून सोडून द्यावं किंवा केवळ नोंदी टिपत जावं यापलीकडे जाऊन ते मनाच्या एका कप्प्यात जपून ठेवावं असं झालं, त्या व.पु. काळे यांचा आज स्मृतिदिन (२६ जून २००१)
वाचनवेड्या मराठी माणसाने व.पु. काळे वाचले नाहीत, असं सहसा होत नाही. मुंबई महापालिकेत स्थापत्यविशारद (आर्किटेक्ट) म्हणून काम करणाऱ्या वपुंनी उदंड लिखाण केलं. कोणत्याही प्रदर्शनात किंवा पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर वपुंची ग्रंथसंपदा बघून भारावून जायला होतं. नोकरी, कथाकथनाचे प्रयोग आणि लिखाण सांभाळून वपुंनी हार्मोनियमवादन केलं, फोटोग्राफी केली, सुंदर हस्ताक्षराचं वेड जोपासलं आणि माणसांचा संग्रह केला. माणसं उभी केली. स्वत:ला भेटलेल्या, इतरांना भेटलेल्या, मित्रांना, नातेवाईकांना, आजवर कधीच न भेटलेल्या, कल्पनेतल्या, विचारांतल्या अशा विविध प्रकारच्या आणि पद्धतीच्या माणसांना वपुंनी आपल्या लेखनात आणलं. स्वत:च्या कथांना त्यांनी 'कथा' असं न म्हणता 'पॅटर्न' असं म्हटलं. वपुंच्या वाचकाला ते तंतोतंत पटतं. कारण असे पॅटर्न अनेकांच्या आयुष्यात येत असतात. मात्र, त्यांच्यातलं वेगळेपण ओळखून त्यावर लिहिणारा असतो तो एखादाच वसंत पुरुषोत्तम काळे!
'लिखाण म्हणजे केवळ चुना असतो. त्यात अनुभवाचा कात टाकल्याशिवाय साहित्याचं पान रंगत नाही...' असं 'वपुर्झा'च्या शेवटी लिहिणारे वपु वाचकाला सतत एकाच कोड्यात टाकता, एकच प्रश्न त्याच्यासमोर उभा करतात आणि तो हा की, 'वपुं, तुम्हाला खरंच असे विलक्षण लोक भेटले होते का?' वपुंची कथा ही केवळ घटना न राहता किंवा एखादा दाखला न होता ती अनेकांचा अनुभव झाली, अनेकांचं आत्मकथन झाली. काहींसाठी सहानुभूतीची शाल झाली, तर काहींच्या अव्यक्त भावनांचा प्रकट आविष्कार झाली.
'वलय'मधली मृणालिनी देवधर असो की, 'पार्टनर'मधला श्री असो वपुंचं लेखन हे केवळ लेखन नसून ते एका मनाने दुसऱ्या मनाला केलेलं आर्जव भासतं. त्यांच्या संवादात तत्त्वज्ञान असतं, विचार असतो, अनुभव असतो आणि निवेदनात आर्तता असते, संवेदनशीलता असते, जे जाणून घेतलं आहे, जे त्यांना लेखक म्हणून दिसलं आहे ते तसंच्या तसं वाचकांना वाचक म्हणून दिसावं ही धडपड आहे. वाचक आणि लेखक यांच्यातलं द्वैत जावं यासाठीची कळकळ दिसते.
'आपण सारे अर्जुन', 'ही वाट एकटी'ची यांसारख्या कादंबऱ्या असतील, 'वपुर्झा'सारखं आगळवेगळं पुस्तक असेल, भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीचं केलेलं रसग्रहण असेल, 'वपु सांगे वडिलांची कीर्ती' यातून स्वत:च्या वडिलांचं उभं केलेलं व्यक्तिचित्रण असेल, 'प्लेझर बॉक्स'सारखा पत्रसंवाद असेल किंवा वलय, महोत्सव, घर हरवलेली माणसं, मोडेल पण वाकणार नाही...... यांसारखे अनेक कथासंग्रह असतील.. वपु देत गेले. स्वत:ला दिसलेलं, स्वत:ने अनुभवलेलं उधळत गेले आणि रसिक, वाचक, श्रोते मिळेल तेवढं, जमेल तेवढं, झेपेल तेवढं घेत गेले.
१९९९ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी त्या संमेलनाचा उल्लेख 'रसिक संमेलन' असा केला. त्यांना महाराष्ट्र सरकारचा उत्तम लेखकासाठी दिला जाणारा पु.भा. भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं होतं.
'वपु' म्हणजे कोण याचं उत्तर दोनच शब्दांत देता येतं किंवा ते दोनच शब्द समर्पक ठरतील, असं मला वाटतं. त्यापैकी एक शब्द म्हणजे 'रसिक' जो सतत तृप्ततेच्या मागे असतो, सौंदर्याचा पुजारी असतो, व्यवस्थितपणाचा भोक्ता असतो आणि दुसरा शब्द म्हणजे 'फॅन्ट्सी' जी सतत हुरहूर लावत असते आणि पूर्ण होण्यासाठी धडपडण्याची नवी ऊर्जा देत असते. वपु असेच तर होते.....!!
- मयूर भावे.