'नयट्ट' : 'उघडा डोळे, बघा नीट' सांगणारा चित्रपट

युवा विवेक    01-Jul-2021   
Total Views |

Naytt_1  H x W: 
पोलिसांच्या आयुष्याचं चित्रण करणारे बरेच चित्रपट आजवर येऊन गेले. त्यातील काही मोजके चित्रपट सोडले तर, करमणुकीच्या छटांमध्ये रंगवून विषयाचं गांभीर्य घालवण्यातच बऱ्याच जणांनी धन्यता मानली. तरीही काही स्तुत्य प्रयत्न मात्र दीर्घ काळ लक्षात राहिले. 'नयट्ट' हा मार्टिन प्रकट दिग्दर्शित आणि शाही कबीर लिखित नेटफ्लिक्सवर अलीकडेच आलेला मल्याळम भाषेतील चित्रपट हा अशाच चांगल्या चित्रपटांपैकी एक. सध्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर हा चित्रपट काही भाष्य करू पाहतो. समाजमाध्यमांतून व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं की, कुणावरही चिखलफेक करण्याचं काम आणखी सोपं होऊन जातं. अशांना मग इतर लोकांच्या झुंडी येऊन मिळतात आणि त्यातून एक समाजमन बनत जातं. एक मतप्रवाह उदयाला येतो. एखाद्या पक्षाला सत्तेत ठेवायचं की, सत्ता उलथून टाकायची, ते मग अशा झुंडी ठरवतात. यात बळी जातो तो मात्र काही प्रामाणिक माणसांचा. ज्यांच्यासाठी हे मतप्रवाह तयार होतात, ते आपला कार्यभाग साधून वेगळे होतात. सामान्य जनतेलाही खोट्या आश्वासनांशिवाय काही मिळत नाही. पण 'मुकी बिचारी कुणीही हाका' म्हणतात त्याप्रमाणे आपण फसवले जातोय, हेच त्यांना कळत नसेल, तर हेच दुष्टचक्र वर्षानुवर्षे चालू राहतं.
'नयट्ट' म्हणजे शोधाशोध, शिकार. प्रवीण मायकल हा एका नव्या पोलीस स्थानकात पुन्हा नव्याने पोलीस म्हणून रुजू होतो. तिथे आधीच काम करत असलेल्या सुनीताला बिजू हा स्थानिक गुंड त्रास देतो आहे. शाब्दिक चकमकीतून एकदा प्रवीण आणि त्याचा वरिष्ठ अधिकारी मणियन बिजूला अटक करतात. मात्र, त्याच्या दलित पक्षाच्या राजकीय दबावामुळे त्यांना बिजूविरुद्ध कोणतीही कारवाई न करता त्याला सोडून द्यावं लागतं. पोलिसांमधली आणि या स्थानिक गुंडांमधली चकमक बिजूचा मित्र जयन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो आणि पोलीस कसे विनाकारण अत्याचार करतात पाहा, असा गर्भितार्थ घेऊन तो व्हिडिओ व्हायरल होतो. त्यानंतर काही दिवसांनी प्रवीण, मणियन आणि सुनीता एका लग्नाला गेलेले असताना तिथे प्रवीण आणि मणियन दारू पितात. परतीच्या वाटेवर मणियनचा पुतण्या राहुल - ज्याने ड्रिंक केलेलं नाही तो - जीप चालवत असतो. मात्र, एका वळणावर एका तरुणाच्या बाईकला त्यांची गाडी धडकते आणि अपघात होतो. ज्याला अपघात झाला आहे, तो जयन आहे, हे कळल्यावर त्याला तिथेच सोडून द्यायचं की इस्पितळात पोहोचवायचं यावर काही क्षण खलबतं होतात आणि सर्व जण त्याला इस्पितळात पोहोचवतात. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो. या घटनेची कबुली द्यायला तिघेही पोलीस स्टेशनला येतात. मात्र, जयनचा मृत्यू झालाय, हे बिजूच्या गटाला कळतं आणि क्रोधाचा आगडोंब उसळतो. आता जयनच्या खुनाचा आरोप आपल्यावर येणार, याची या तिघांना चाहूल लागते आणि तीच जीप घेऊन ते पळून जातात. पुढे सुरू होतो तो या तिघांचा शोध. त्या तिघांना शोधण्यात वरिष्ठ पोलिसांना यश मिळतं का, या सगळ्यात कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, हे सगळं पुढे ओघाने चित्रपटात येतं.
प्रवीण, मणियन आणि सुनीता पळून जातात, त्यानंतरचा त्यांचा प्रवास, सुरक्षित जागी लपण्यासाठीची त्यांची धडपड, त्यांच्यांत अधूनमधून उडणारे खटके हे सर्व पाहताना त्यांची अगतिकता पदोपदी जाणवत राहते. प्रवीण आणि सुनीता यांच्यातलं अबोल नातं मोजक्या संवादांतूनही जाणवत राहतं. मुन्नारमध्ये हे तिघेही मणियनच्या मित्राकडे आश्रय घेतात, तेव्हा आसपास कसली सोय नसतानाही मणियनचा हटवादी स्वभाव डोकं वर काढतो. त्यावेळी चिडणारा प्रवीण मणियनची ढासळलेली मनःस्थिती पाहून मात्र शांत आणि हतबल होतो. आपल्या मुलीच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम असताना आपण तिथे हजर राहू शकत नाही, याचं शल्य मणियनला बोचत असतं. अशा लहानसहान प्रसंगांतून या तिघांमधल्या माणूसपणाची झलक वारंवार दिसत राहते. ते ज्या ठिकाणी आश्रय घेतात, त्या मुन्नारच्या जंगलाचा चित्रपटात लोकेशन म्हणून केलेला वापर अतिशय समर्पक वाटतो. चित्रपट सुरू होतो, तोच पोलिसांच्या दोन गटांत रंगलेल्या रस्सीखेचच्या सामन्याने. यातूनच चित्रपटात पुढे काय होणार आहे, याची सूचक झलक मिळते. निवडणूक तोंडावर आलेली असताना दलितांच्या एका गटातील तरुणाचा अपघाती मृत्यू होणं, तो खून असल्याचं भासवलं जाणं, यामुळे आपल्याला दलितांच्या मिळणाऱ्या मतांवर परिणाम होऊ नये, म्हणून तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना मतदानाच्या दिवसापूर्वी पकडून आणण्याचं फर्मान मुख्यमंत्री काढतात. जयनचा मृत्यू झाल्यानंतर पुढे काय होणार, याची मणियनला आधीच कल्पना आलेली आहे. पोलिसदलात इतकी वर्षं प्रामाणिकपणे काम करूनही आपल्या हाती फक्त निराशाच येणार, हे त्याला पक्कं ठाऊक आहे. त्यामुळे परतीचा कोणताही मार्ग त्याला दिसत नाही. प्रवीण मात्र नवीन असल्यामुळे त्याला समजावू पाहतो. मात्र पुढे जे काही होतं, त्याने प्रवीण आणि सुनीता दोघेही हादरून जातात. तरीही कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य जगासमोर आणण्याचं ठरवतात.
त्या दोघांना कोर्टात नेत असताना एका मतदात केंद्रावरचं एक दृश्य आहे. जिथे एक वृद्ध अंध महिला मतदान करण्यासाठी येते आणि तिचं बोट धरून एकजण त्या मशीनवरचं एक चिन्ह दाबतो. आपण सर्वजण कसे राजकीय पुढाऱ्यांच्या हातातल्या कठपुतळ्या झालो आहोत, हे फार कमी शब्दांत बोलून जाणारं हे दृश्य आहे. उत्तरार्धातल्या वेगाने घडणाऱ्या घटना मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार कसा फोफावत चालला आहे, हे स्पष्टपणे दाखवून देतात. विरोधाभास हा की, आपल्या जातीय कळपातल्या एकाचा मृत्यू झाल्यानंतर जो रोष उसळतो, त्यावर कुणीतरी आपली पोळी भाजून घेतोय, हेही त्या कळपातल्या लोकांना कळत नाहीये. एका विशिष्ट जातीची व्होट बँक हडपण्यासाठी जाता येईल तितक्या खालच्या पातळीवर राजकारणी जातात आणि तरीही लोक शहाणे होत नाहीत. व्यवस्थेत असूनही अधिकार नसलेल्यांचा मात्र यात हकनाक बळी जातो आणि त्यांची पर्वा मात्र कुणालाही नाही, हे हा चित्रपट फार प्रखरपणे जाणवून देतो.
कुंचको बोबन, जोजू जॉर्ज आणि निमिषा सजायन या तिघांनीही मुख्य भूमिकेत उत्तम कामगिरी केली आहे. यामा गिल्गमेश यांनी साकारलेली तडफदार एसपी अनुराधाही विशेष लक्षात राहते. शायजु खालिद यांचं छायांकन अप्रतिम आहे. मुळातच सुंदर असलेलं मुन्नार त्यांच्या कॅमेऱ्यातून गूढरम्य होऊन येतं. अन्वर अली यांनी लिहिलेली गाणी आणि त्याला विष्णू विजय यांनी दिलेलं संगीत सुंदर आहे. विशेषतः लग्नाच्या प्रसंगातलं गाणं आणि त्याचे शब्द. त्यानंतर वेग घेणाऱ्या घटना 'सैराट' चित्रपटातल्या 'झिंगाट'ची आणि त्यानंतर चित्रपटात येणाऱ्या नाट्यमय घटनांची आठवण करून देतात. कुठल्याही घटनेवर तात्काळ व्यक्त होऊन एखाद्या व्यवस्थेलाच चूक ठरवण्याची मानसिकता बदलायची असेल, तर हा चित्रपट चुकवता येण्यासारखा नाही.
- संदेश कुडतरकर.