एका हरवलेल्या खेळण्याची गोष्ट....

युवा विवेक    20-Jul-2021   
Total Views |

toy_1  H x W: 0 
पुलंचं बटाट्याची चाळ आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. त्या पुस्तकातला मला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे शेवटचं ‘चिंतन’.... संपूर्ण पुस्तक एखाद्या हास्यमैफलीसारखं रंगत जाताना शेवटाकडे मात्र डोळ्यांच्या कडा ओल्या करून जातं. काळ बदलतच राहतो, पण बदलत्या काळाची पावलं मागच्या पाऊलखुणा पुसू शकत नाहीत. उलट, काळाबरोबर त्या अजून गडद होत जाताना दिसतात. आठवणी या हरवलेल्या खेळण्यांसारख्या असतात. त्यांची ओढ स्वस्थ बसू देत नाही आणि त्यांचं हरवून जाणं सहज स्वीकारताही येत नाही. वाढत्या वयाबरोबर आठवणींचा संग्रहही वाढत जातो आणि एखाद्या एकांतवेळी या आठवणींचीच मैफिल रंगत जायला लागते.
माझं बालपण पुण्यातल्या वाडा संस्कृतीत गेलं. म्हणजे, तसं आमच्या बिल्डिंगला 'सोसायटी' वगैरे म्हणत, पण ते नावापुरतंच!! आयुष्यातली पंधरा वर्षं रात्री झोपणे किंवा कुठं बाहेर जाणे, या दोन कारणांशिवाय घराचं दार बंद असलेलं पाहिल्याचं आठवतच नाही. घराची आणि मनाची दारं सताड उघडी असणाऱ्या माणसांत माझं लहानपण गेल्याचा मला अजूनही अभिमान आणि आनंद वाटतो.
सगळी घरं दोन छोट्याछोट्या खोल्यांची..... छतावर उतरते पत्रे आणि त्यावर चारदोन कौलं..... पाऊस पडायला लागल्याचं आम्हाला पत्र्यावर वाजणाऱ्या थेंबांच्या ताशामधून कळायचं.
आमच्या घरासमोरच छोटंसं अंगण होतं. वाड्यातली सगळी मुलं त्या अंगणात मनसोक्त क्रिकेट खेळायची.... आता ऐकून आश्चर्य वाटेल, पण तेव्हा मोबाईल नावाची गोष्ट अस्तित्वातच नव्हती, त्यामुळे मुलं प्लेस्टेशन्स आणि ऍप्सपेक्षा अंगणांत आणि मैदानांत खेळताना दिसायची. एक टप्पा आउट, बॉल टप्पा पडून वाड्याच्या बाहेर गेला तर बाउन्ड्री, डायरेक्ट गेला तर सिक्सर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याची बॅट त्याची बॅटिंग, असे गल्ली क्रिकेटमधले अलिखित नियम आमच्या खेळातही होते. बॉल लागून कोणाच्यातरी खिडकीची काच फोडणे, हा नित्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे एखाददुसरा अपवाद वगळता त्याचंही कोणाला फार काही वाटायचं नाही. मुळात खिडकीची काच ही बॉल लागून फुटण्यासाठीच बसवली जाते, यावर उभयपक्षी दुमत नव्हते. घरी केलेल्या पदार्थांची भरपूर देवाणघेवाण चालायची, त्यामुळे वाड्यात कोणाला काय आवडतं, हे सगळ्यांनाच ठाऊक होतं.
सणासुदीला काय कपडे घ्यायचे, याची चर्चा शेजाऱ्यांसमोरही बिनदिक्कत व्हायची. मुळात त्यांना 'शेजारी' हे फक्त मधल्या भिंतींमुळे दिलेली उपाधी होती. तसे सगळे एकमेकांच्या घरातलेच होते.
दिवाळीत फटाक्यांची अदलाबदल असायची आणि नरक चतुर्दशीला पहाटे पहिला फटाका कोण लावणार, यावरून स्पर्धा असायची. दिवाळीचे चारही दिवस अख्खी गल्ली फटाक्यांच्या आवाजांनी दुमदुमत असायची. त्या चार दिवसांत धूर, प्रदूषण यांवर कोणीही कोणालाही व्याख्यानं द्यायचा नाही किंवा किल्ला करताना मातीत बरबटून घरी आलं म्हणून ओरडण्याची पद्धत तेव्हा आमच्या वाड्यात तरी चलनात नव्हती.... उलट किल्ला म्हटलं की अळीव आणण्यापासून तो किल्ला फटाका लावून उडवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींत घरातली मंडळीही उत्साहानं सहभागी व्हायची. माझ्या आईवडिलांनी कधीही पुस्तक, वही, अभ्यास, मार्क्स, असले धोशे माझ्यामागे लावले नाहीत. ट्रेक्सना जातोयस, जा, कविता लिहितोयस, लिही, हाच खाक्या!! मला अजूनही आठवतंय, मी नववीत असताना माझा पहिला लेख “छावा” नावाच्या बालमासिकात छापून आला, तेव्हा तो अंक वाड्यात घरोघरी फिरला होता.
दर रविवारी वाड्यातल्या सगळ्या मुलांचा जथ्था आमच्याकडे ‘महाभारत’ बघायला यायचा. त्यात एक आजीही होत्या. त्या कुठं राहायच्या, नेमक्या कोणाच्या कोण होत्या, ते मला अजूनही माहिती नाही. पण एखादं व्रत असल्यासारख्या त्या बरोब्बर रविवारी सकाळी घरी येऊन बसायच्या आणि ‘महाभारत’ संपलं की निघून जायच्या. आम्हीच काय, पण घरातली मोठी माणसंही त्यांना ‘महाभारत आजी’ म्हणूनच हाक मारायची.
आमच्या वाड्याच्या मागच्या बाजूला एक जुनी चाळ होती. ती किती जुनी होती, हे अजूनही ठाऊक नाही, पण बघताना मात्र कधीही कोसळून पडेल, असं वाटायचं. मी वाड्यातून बाहेर पडल्यानंतरही ती चाळ तशीच उभी होती.... तेव्हा सगळ्याच गोष्टी जितक्या लवचिक होत्या, तेवढ्याच चिवट..... राग, लोभ, प्रेम, माया, असूया, मैत्री, स्पर्धा.... सगळंच.... आम्हा मुलांमध्ये जी स्पर्धा व्हायची, ती खेळाच्या मैदानातच, एरवी अभ्यासाच्या बाबतीत, “त्याला बघ कसे छान मार्क्स मिळतात, नाहीतर तू...” असं कोणीही आपल्या मुलांना चुकुनही म्हटल्याचं मला आठवत नाही. रागातला अबोलासुद्धा जास्तीत जास्त एखाद दुसरा दिवस टिकायचा, कारण कितीही भांडलं तरी आतला पीळ अभेद्य होता. पण गाठी कितीही घट्ट बांधल्या तरी कधी ना कधी सुटतातच.... हळहळू पिकली पानं एकेक करत गळू लागली. मागे उरलेले ओनरशिप ब्लॉक्स घेऊन वाडा सोडून निघून गेले. मागची चाळही पाडून तिथं मोठ्ठं कॉम्प्लेक्स उभं राहिलं. रविवारी सकाळी येणाऱ्या महाभारत आजी कुठं गेल्या, कोणालाच ठाऊक नाही. त्या चाळीतली माणसं कुठं हरवली, कोणीच विचारलं नाही....
अजूनही सगळे शेजारीपाजारी भेटतात, एकमेकांच्या घरी जातात. वाड्यातल्या आठवणी काढून एकमेकांना सांगत बसतात, हसतात आणि पुन्हा आपापल्या घरांच्या बंद दारांमागे जाऊन विसावतात. ब्लॉक्सची दारं वाड्यातल्या दारांसारखी कायम उघडी नसतात ना..... आता पाऊस पडू लागला की, बाल्कनीसकट सगळी दारं बंद करतो मी..... हो, उगीच पाऊस आत यायला नको.... एकदा दारं बंद केली की, मग सगळेच आवाज बंद होतात. पत्र्याचे, पावसाचे आणि आठवणींचेही..... चाळ पडलीच, काही महिन्यांत वाडाही पडेल.... तिथंही एखादं कॉम्प्लेक्स उभं राहील. खेळणं कायमचं तुटून जाईल.
काही खेळणी हरवलेलीच राहण्यात मजा असते..... काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्याच बऱ्या असतात....
अक्षय संत