हर्क्युलस

युवा विवेक    06-Jul-2021   
Total Views |
 
हर्क्युलस.... हेच त्याचं नाव आणि आलम दुनिया त्याला याच नावानं ओळखते.... त्याला हे नाव कुणी आणि का दिलं, याचा इतिहास मराठी ओव्यांच्या कवियित्रींच्या किंवा अजंठातल्या लेणीच्या शिल्पकारांच्या इतिहासाइतकाच गूढ आहे..... पण त्याच्याबद्दल बोलताना किंवा लिहिताना त्याचा उल्लेख 'हर्क्युलस' असाच होतो.... असं केलं की त्याला खूप आवडतं ते.... आपल्याला कोणीतरी देवाइतकंच महत्व देतंय, असं वाटून त्याचा अहंकार सुखावतो.
हर्क्युलस त्या परमेश्वरासारखाच सर्वव्यापी सर्वसाक्षी आहे.... तो केव्हाही, कुठेही आणि कोणाबरोबरही आढळतो. तो एखाद्या कॉफीशॉपमध्ये मित्रांच्या घोळक्यात त्यांच्याच पैशानं घेतलेली सिगारेट निम्म्याच्यावर फिल्टर ओठांत भिजवून झुरके मारताना दिसेल, साध्या बसच्या तिकिटाकडे एखाद्या सिनेमाच्या प्रीमियरचं तिकीट असल्यासारखा मुग्धपणे पाहत बसलेला दिसेल किंवा अगदीच यापैकी कुठं दिसला नाही तर कुठल्यातरी लेटेस्ट मैत्रिणीबरोबर गळ्यात गळा घालून एखाद्या पुलावर बसलेला असेल. हर्क्युलसचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो कधीच एकटा दिसत नाही. कायम कोणी ना कोणी बरोबर असलेलं त्याला जाम आवडतं.
हर्क्युलस दिसायला देखणा वगैरे मुळीच नाही. जळलेल्या पोळीसारखे त्याच्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत. बाकी नाकीडोळीही अगदी सामान्य, गर्दीत खपून जाईल असाच आहे तो.... मी एकदा त्याला त्या डागांबद्दल जरा दबकतच विचारलं तेव्हा तो उसन्या अवसानानं (इतर सगळ्याच गोष्टींप्रमाणे त्याचं अवसानही उसनंच असतं.) म्हणाला, "काही नाही रे, लहानपणी फटाके उडवताना भाजलं होतं...." आता हे कितपत खरंखोटं असेल, त्याचं त्यालाच ठाऊक, पण ती गोष्ट तो तशाच उसन्या अवसानानं आजवर कित्येक लोकांना आवडीनं सांगत आलाय....
हर्क्युलसच्या अशा असंख्य आवडीनिवडी आहेत आणि त्या असंख्य वेळा बदलत राहतात. ते बदल मोस्टली त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर अवलंबून असतात.... हर्क्युलसच्या काही जगावेगळ्या थियरीज आहेत. तो स्वतःला यारोंका यार वगैरे मानतो आणि त्यामुळे यारीदोस्तीत एकमेकांच्या आवडीनिवडी अडाप्ट करणं कंपल्सरी असतं, असं त्याचं मत आहे. पण त्याची ही मतं बऱ्याचदा समोरच्या माणसावर नाही तर त्याच्या खिशातल्या पाकिटाच्या वजनावर अवलंबून असतात, ही 'अंदरकी बात' फक्त त्याला आणि आमच्यासारख्या त्याच्या कम्पल्सिव्ह मित्रांनाच ठाऊक आहे. त्यामुळे चहा, सिगारेटचे ब्रॅण्डस आणि दारूची बिलं यातलं काहीही किंवा सगळंच भागवू शकणाऱ्या येरुगणांत तो सहज रमून जातो.
हर्क्युलसची अशीच एक विचित्र आवडीची गोष्ट म्हणजे तात्विक आणि पुस्तकी बोलणं.... किंबहुना तात्विक बोलणं हेच त्याला वाटणाऱ्या त्याच्या 'हुषारी'चं व्यवच्छेदक लक्षण आहे. 'पैसा हा जितका परसेप्शनल तितकाच ऑप्शनल असतो, कारण तो थेंबासारखा येतो आणि पाण्यासारखा वाहतो' किंवा 'आपण स्वतःला जे समजतो ते आपण नसतोच, आपण दुसऱ्याला जे समजतो ते खरं तर आपण असतो.' असली सामान्य माणसांच्या, हर्क्युलसच्या भाषेत 'पब्लिक' च्या डोक्यावरून जाणारी वाक्यं तो दिवसाला शेकडा या दरानं फेकत असतो. बोलताना समोरच्याला आपलं वाक्य कळणार नाही, याची तो पुरेपूर दक्षता घेतो आणि जर कोणी एक्सप्लेनेशन विचारायचा प्रयत्न केलाच तर 'याच्यासाठी सांगत असतो, वर्ल्ड लिटरेचर वाच..... जा बिडी घेऊन ये आपल्याला.... ' असं म्हणत स्वतःचा पाय अलगद मोकळा करून घेण्याचं त्याचं कसब भल्याभल्यांना गोंधळात टाकतं.
हर्क्युलस करतो काय? तो खूप काय काय करतो..... परवाच आमच्या अड्ड्यातला एक मित्र बोलता बोलता म्हणाला, मी पुढच्या वर्षी एमबीएला ऍडमिशन घेतोय...." झालं.... दुसरा दिवस हर्क्युलसनं स्वतःची कंपनी कशी उभी करता येईल, त्यासाठी काय काय लागेल, याच्या मुक्तचिंतनात व्यतित केला. अड्ड्यातल्या काही सेटल्ड मित्रांशी बोलून त्यानं थोड्याफार भांडवलाचीही सोय करून घेतली. हे कमी होतं म्हणून की काय, 'तुमच्याशिवाय कंपनी चालणार का भाऊ....' असं मस्कापॉलिश मारत रोजच्यापेक्षा दुप्पट सिगारेट्स आणि चहाही उकळले. आता फक्त प्रश्न होता तो कंपनी सर्व्हिस सेक्टरमधली असावी की मॅन्युफॅक्चरिंग, पण तूर्तास तो प्रश्न त्यानं भांडवलाच्या रकमेवर सोडून दिला.
दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही सगळे पुन्हा नाक्यावर तंबू टाकायला, नेमाडेंच्या भाषेत, उदाहरणार्थ भंकस करायला, जमलेलो असतानाच आमचा दुसरा एक मित्रवर्य घरी लवकर जायची कटकट करायला लागला. एरवी नुसत्या तंबाखूच्या वासानंही पिसाळणारा हा आमचा चैतन्यकांडप्रेमी आज हर्क्युलसनं कधी नव्हे ते त्याला सिगारेट ऑफर करूनही (दुसऱ्याच्या पाकिटातली, अर्थातच ) थांबत नव्हता, तेव्हा मात्र आम्ही एकमेकांकडे 'कुछ तो गडबड है, दया' अशा नजरेनं पाहत त्याला रिंगणात घेतला आणि चौकशी समिती नेमली. अध्यक्ष अर्थातच मा. म. हर्क्युलस साहेब.... पाचच मिनिटात समितीचा अहवाल आला..... 'उद्यापासून माझा जर्मनचा क्लास सुरू होतोय सकाळी.... मला लवकर उठायचंय.'
बास....हर्क्युलसरावांना एवढी काडी पुरेशी होती. त्यांनी लगेच आपल्या मागच्या सात पिढ्या जर्मनीतच वाढलेल्या असल्यागत जर्मनीबद्दल आपली अगाध मतं मांडायला सुरूवात केली आणि दुर्दैवानं आमचा तो मित्र नेहमीचा असूनही हर्क्युलसच्या बोलण्याला फसला.गरम लोखंडावर हातोडा मारतात तसं हर्क्युलसनं आपला पार्श्वभाग त्याच्या बाईकच्या बॅकसीटवर मारला आणि तडक त्याच्या घरी गेला. त्याच्याकडून त्याची बेसिक जर्मनची, त्याला सध्या न लागणारी काही पुस्तकं उचलली आणि घरी आला.
घरी येऊन जेवण वगैरे उरकून तो ती पुस्तकं समोर घेऊन बसला. पहिल्या काही पानांतच झोप मी म्हणायला लागली होती, पण 'वर्तमानातल्या सुखांचा त्याग करणारी माणसंच उज्वल इतिहास घडवतात' या कोणत्यातरी अपसव्य भाषेत (हा त्याचाच शब्द) लिहिणाऱ्या लेखकाचं वाक्य त्याला अशा वेळी प्रमाण वाटत होतं.
शेवटी या प्रमाणवाक्याला प्रमाण ठोकून तो घराच्या गॅलरीत आला. थंड वारा त्याच्या हाफपॅन्टमधल्या उघड्या पायांवर सटासट चापट्या मारत होतं. तशाच अवस्थेत त्यानं संध्याकाळी त्याच जर्मन मित्रासाठी घेतलेली, अर्धवट ओढून विझवलेली सिगारेट काढली. खिशातून एक माचिस काढून उघडली. माचिसमध्ये दोनच काड्या उरल्या होत्या. त्यानं एक काडी पेटवून सिगारेट पेटवायचा प्रयत्न केला. पण वाऱ्यानं त्याचा हा प्लॅन हवेत उडवून दिला. त्याला एकदम सिगारेटच्या पाकिटावरची statuary warning दिसली. 'Cigarrate smoking is injurious to health....' बास बास.... लवकर मरण्यापेक्षा सिगारेट सोडावी, राव.... त्यानं त्या अर्ध्या सिगारेटकडे एकदा निरखून पाहिलं.... तो एरवी बसच्या तिकिटाकडे पाहतो ना, तसंच.... 'जाऊ दे, तशीही अर्धीच आहे, मारू पटकन,' पण एकच काडी आहे, यार.... डोक्यात चक्र फिरू लागलं.... काय करायचं?? त्यानं शांतपणे डोळे मिटून घेतले. बस, जर पेटली तर ओढली, नाही पेटली तर सोडली.... असं म्हणत डोळे उघडून त्यानं पुन्हा एकदा काडी माचिसवर घासली. नशिबानं ती पेटली.
सिगारेट पेटवून हर्क्युलस मस्त झुरके मारत गॅलरीत उभा राहिला. नेहमीसारखाच, निम्मा फिल्टर भिजवत....!
ड्रेसिंग टेबलवर जर्मनची पुस्तकं अजून तशीच उघडी पडली होती.
अक्षय संत