नटखट

युवा विवेक    12-Aug-2021   
Total Views |

उपदेशाचे डोस न पाजता काही महत्त्वाचं सांगणारा 'नटखट'
natkhat_1  H x

शाळकरी मुलांवर संस्कार करण्यासाठी गोष्टींसारखं दुसरं उपयुक्त माध्यम नाही. पंचतंत्र, हितोपदेश यांतील कथा अजरामर आहेत आणि अनेक पिढ्या घडवत आल्या आहेत, ते याच कारणामुळे. अनुकरणप्रिय असणारी लहान मुलं आसपासच्या लोकांच्या वागण्यातून कळत-नकळत अनेक गोष्टी उचलत असतात. त्यातल्या चांगल्या कोणत्या, वाईट कोणत्या, हे उपदेशातून त्यांना सांगण्यापेक्षा एखाद्या गोष्टीच्या आवरणात लपेटून सांगितलं, तर ते त्यांना जास्त भिडतं आणि खोलवर रुजतंही. 'नटखट' या लघुपटाची कथा काहीशी याच वळणाने जाणारी आहे.

खट्याळ सोनू शाळेत खोड्या करण्यात पटाईत आहे. वर्गात शिक्षकांचं लक्ष नसताना वर्गातून बाहेर निघून जाणं, मित्रांसोबत मिळून खोड्या करणं, हे नेहमीचंच. तो एकदा मैदानात खेळत असताना सोबतच्या मोठया मुलांच्या गप्पा ऐकतो. कोणत्यातरी मुलीने त्रास दिला, म्हणून बंटू आणि त्याच्या मित्रांमध्ये तिला उचलून एखाद्या निर्जन स्थळी नेण्याची चर्चा चालू असते. हा प्रसंग त्याच्या मनावर कोरला जातो. त्याचा वर्गमित्र बिरू एकदा मुलींच्या वेण्या ओढत असतो, तेव्हा रेश्मा त्याला विरोध करते. हे कळल्यानंतर बिरू, सोनू आणि त्यांचे काही मित्र रेश्माला उचलून नेण्याचं ठरवतात. त्या योजनेनुसार तिला त्रास देत एका निर्जन स्थळी घेऊन जातात. ती गयावया करू लागते, तेव्हा हे सर्वजण काही वेळाने तिला सोडून देतात. घरी जेवणाच्या टेबलवर सोनूचे आजोबा, वडील आणि काका एका वेगळ्याच संदर्भात एका आमदार बाईच्या अडेलतट्टूपणाबाबत चर्चा करत असताना सोनू म्हणतो, "उठवा दो." हे ऐकून त्याची आई चपापते आणि या प्रकरणाचा छडा लावायचं ठरवते.

त्याच्या खोड्यांना आळा घालण्यासाठी ती त्याला एक गोष्ट सांगायचं ठरवते. राजा रुद्र आणि त्याची मुलगी राजकुमारी ऊर्मी यांची गोष्ट. ती गोष्ट काय आहे, त्या गोष्टीतून सोनूची आई सोनूला कशी शिकवण देते आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला स्वतःहून न सांगता ती शोध घेण्यास कशी प्रवृत्त करते, हे जाणून घेण्यासाठी हा लघुपट पाहावा लागेल.

विखारी पौरुषत्वाच्या (toxic masculanity) संकल्पनेवर भाष्य करणार्‍या अनेक सुंदर कलाकृती आजवर येऊन गेल्या. हा लघुपट त्या सर्व कलाकृतींमध्ये महत्त्वाचा ठरतो. याचं कारण या लघुपटातील कथेची ट्रीटमेंट. मुख्य कथानकाला पूरक अशी एक गोष्ट पार्श्वभूमीला चालू राहते आणि अतिशय साध्या, सरळ पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत जे पोहोचवायचं आहे, ते सांगून मोकळी होते.

लघुपटातील बारीकसारीक गोष्टी संवादांशिवाय फार काही बोलून जातात. जेवणाच्या टेबलावरच्या प्रसंगात प्रथम घरातल्या सर्वांत वृद्ध पुरुषाच्या मिशा दिसतात, नंतर त्याच्या मोठ्या मुलाच्या, त्यानंतर लहान मुलाच्या आणि मग त्याच्या नातवाचा चेहरा दिसतो. पुरुषसत्ताक व्यवस्था एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे कशी हस्तांतरित होत आली आहे, हे या काही सेकंदांच्या दृश्यातून सहज जाणवतं.

सोनू टीव्हीवर एक डान्स शो पाहत असतानाचं एक दृश्य आहे, ज्यात एक नर्तक आणि एक लहान मुलगा भान हरपून नाचत आहेत. सोनू ते दृश्य पाहण्यात रंगून गेला असताना त्याचे वडील येतात आणि रिमोट हिसकावून घेऊन युध्दाची, हाणामारीची दृश्यं पाहू लागतात. पौरूषाच्या चुकीच्या संकल्पना लहान मुलांच्या मनात कुठून जन्माला येतात, ते सांगण्यासाठी हे दृश्य पुरेसं आहे. सोनूच्या आईच्या गोष्टीत येणारा जैवसाखळीचा उल्लेख बर्‍याच गोष्टी सांगून जातो. समस्या सोडवायच्या तर, समस्येच्या मुळावर काम करणं किती गरजेचं आहे, यावर भाष्य करतो. त्या गोष्टीच्या अनुषंगाने येणारी सोनूच्या आयुष्यातील दृश्यं आणि त्यात हळूहळू होणारे बदल स्क्रीनवर समांतर पद्धतीने दिसत राहतात.

सोनूच्या आईला त्याच्या वहीत मिश्या काढलेला मिकी माऊस दिसतो. त्यातून सोनूच्या मनात काय रुजतंय, याचा ती बरोबर अंदाज बांधते आणि त्याच्या संस्कारक्षम मनाला आकार द्यायचं ठरवते. शेवटाकडे येताना सोनू एका चित्रात शांतपणे रंग भरत असल्याचं दिसतं. त्याच्या मनातील खळबळ शांत झाल्याचं या एका दृश्यातून सहज कळतं. सुरुवातीच्या दृश्यांतील गडद प्रकाशयोजना लघुपटाच्या शेवटी बदलते आणि पांढरा उजळ प्रकाश स्क्रीनवर दिसू लागतो. हा बदल सोनूच्या वागण्याशी मिळताजुळता आहे.

अनुकंपा हर्ष आणि शान व्यास लिखित या लघुपटाचे दिग्दर्शन शान व्यास यांनी केले आहे. 'परिणीता', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारख्या चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका केल्यानंतर विद्या बालन या लघुपटातही एका अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसते. डोक्यावर पदर घेऊन वावरणारी घरची सून आपल्या लहान मुलाला वळण लावताना मात्र एक प्रेमळ आई होते. मुकाट नवऱ्याचा मार सहन करणारी पत्नी सोनूला गोष्ट सांगताना मात्र त्याच्याहून लहान होते. विशेष म्हणजे, विद्या बालनने या लघुपटाच्या निर्मितीचीही जबाबदारी उचलली आहे. सोनूची भूमिका सानिका पटेल या लहानग्या मुलीने इतकी सुंदर वठवली आहे की, श्रेयनामावली पाहिल्याशिवाय एका मुलीने ही भूमिका केलीय, हे लक्षातच येत नाही. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

'व्हूट सिलेक्ट'या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला हा लघुपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बत्तीस मिनिटांचा हा लघुपट म्हणजे उत्तम कलाकृती पाहू इच्छिणार्‍या प्रेक्षकांसाठी मेजवानीच आहे.

- संदेश कुडतरकर.