वारसा देणाऱ्या एका आईची गोष्ट...

युवा विवेक    16-Aug-2021   
Total Views |

वारसा देणाऱ्या एका आईची गोष्ट...
Inheritance_1  

आपला वारसा मागे ठेवून जाणं म्हणजे काय? 'वारसा' या शब्दाचे अनेक अर्थ आपल्यापैकी प्रत्येकजण काढतो. कोणासाठी तो पैसा असतो, तर कोणासाठी जमीन-मालमत्ता असा असतो, पण खरा वारसा म्हणजे पुढल्या पिढीवर पडणारी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप. यातील व्यक्तिमत्वाची छाप आपण कशी मागे ठेवतो यालाही अनेक कंगोरे आहेत. अनेक खेळाडूंनसाठी वारसा म्हणजे त्यांनी केलेले विक्रम किंवा मिळवलेले पुरस्कार आणि पदकं. पण या सगळ्या भाऊगर्दीत 'वारसा' या शब्दाला एका धावपटूने एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. ती खेळाडू म्हणजे 'एलिसन फेलिक्स'.

एलिसन फेलिक्स ही एक अमेरिकन धावपटू आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तिने तब्बल ११ वेळा ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत. ती अमेरिकेची सर्वाधिक ऑलिम्पिक पदकं जिंकणारी धावपटू आहे. तिची ऑलिम्पिकमधील कामगिरी तिच्या खेळातील पराक्रमाची साक्ष देणारी आहे. पण तिच्या मते,

"[A legacy] goes so much further than just performing and running fast times, but it's about speaking up," It's about trying to make a difference."

एलिसन फेलिक्स...

म्हणतात ना की, काही खेळाडू हे वेगळ्याच मातीचे बनलेले असतात. तिच्या या शब्दांचा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तिच्या कारकिर्दीत आपण थोडं डोकावायला हवं तर त्या शब्दांचं महत्व आपल्याला जाणवून येईल. २०१८ साली आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर तिने आई बनण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही महिला धावपटूंसाठी मातृत्व स्वीकारणं म्हणजे तिच्या कारकिर्दीचा अंत असा एक समज जगामध्ये होता. 'नायके' हा जगप्रसिद्ध खेळांच्या बुटाचा ब्रँड ज्याचं ब्रीदवाक्य आहे,

"Just do it"

तो याच एलिसन फेलिक्सचा मुख्य प्रायोजक होता. पण तिने आई बनण्याचा निर्णय घेतल्यावर नायके-ने तिच्या करारानुसार देण्यात येणाऱ्या रकमेत तब्ब्ल ७० टक्के कपात केली आणि जर ती आपल्या खेळाचा दर्जा राखू शकली नाही तर तिच्यावर नुकसानीचा दावा ठोकण्याची तरतूद केली. एकीकडे आपल्या ब्रीदवाक्याने लोकांना भुरळ घालणाऱ्या 'नायके'च्या फोलपणा विरुद्ध एलिसन फेलिक्सने बंड केलं. 'नायके'सारख्या प्रसिद्ध ब्रँडच्या विरुद्ध तिने शड्डू ठोकून 'आई बनणे हा काही गुन्हा नाही' हे निक्षून सांगितलं.

आई बनायचं की एक उत्तम धावपटू? या कचाट्यात सापडलेल्या एलिसन फेलिक्सने दोन्ही गोष्टींना आपलंसं करण्याचा निर्णय घेतला. तिने नायके-ला बाहेरचा रस्ता दाखवला आणि स्वतःचा 'सायश' नावाचा ब्रँड तिने बाजारात उतरवला. हे करताना तिने केलेलं ट्विट तिच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी बाजू मांडते. तिच्या ट्विट मधील शब्दांचा केलेला हा स्वैर अनुवाद,

एलिसन फेलिक्स म्हणते,

"मी आयुष्यभर धावत आहे. मी त्यात खूप चांगली आहे. मला मिळालेली पदकं माझ्याकडे असलेल्या निपुणतेची साक्ष देण्यास पुरेशी आहेत. पण मला थांबण्याची भीती वाटते. धावण्याशिवाय माझी ओळख माझी मलाच माहीत नाही. बाकीच्या स्त्रियांप्रमाणे आई होणं हे माझ्या कारकिर्दीसाठी एक प्रकारची फाशीची शिक्षा असेल याचा विचार करून मला भीती वाटायची. पण तरीही मी निर्णय घेऊन मी मातृत्व स्वीकारलं. माझ्या गर्भधारणेच्या वेळी मला लिंग अन्यायाचा सामना करावा लागला. माझ्या प्रायोजकाने (नायके) ने माझ्या मातृत्वाला पाठिंबा दिला नाही. त्यांनी त्या काळात माझ्यावर केलेल्या अन्यायापासून मी पळून जाऊ शकत नाही.

मला असं सांगितलं गेलं की, 'स्वतःची जितकी पत आहे तसं वागावं'. धावपटूंनी नुसतं धावायचं असतं कारण तो एक धंदा आहे, पण मला हे रुचलं नाही. मी त्या विरुद्ध आवाज उठवला, कोणत्याही महिला धावपटूला आई बनण्याचा हक्क आहे आणि या काळात तिचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. महिला धावपटूंना आपलं करिअर किंवा मातृत्व यातील एक गोष्ट स्वीकारण्याचे दडपण यायला नको. माझ्या लढ्यामुळे आता प्रायोजकत्वाच्या करारात अनेक महिला धावपटूंना या बाबतीत संरक्षण दिलं गेलं आहे.

माझ्या गर्भधारणेदरम्यान अडचणी उध्दभवल्याने मला जाणवले, की माझ्या आवाजाचा उपयोग दुसऱ्या अन्यायाबद्दल जागरूकता आणण्यासाठी करणेही आवश्यक आहे. अमेरिकन आरोग्य व्यवस्थेमध्ये वांशिक अन्याय केला जात आहे. त्या संदर्भात अमेरिकन काँग्रेसशी मी बोललेली आहे. यापुढेही अन्यायाविरुद्ध पुकारलेला माझा लढा मी सुरू ठेवणार आहे.

माझ्या लढ्यामुळे यावर्षी ऑलिम्पिकसाठी कोणीही माझं प्रायोजकत्व घेण्यासाठी पुढे आलेलं नाही. प्रायोजकत्वामधील अटींमध्ये बदल करण्यासाठी विनवणी करून मी थकले आहे. त्यामुळे आता मीच ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर, मी आणि काही महिला मिळून आम्ही आमचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे. ज्याला 'सायश' असं नाव दिलं आहे. हा ब्रँड महिलांसाठी महिलांनी तयार केला असून त्यांच्याद्वारे उत्पादनांची रचना आणि विकास केला गेला आहे. मी माझ्या धावण्याच्या शर्यतीत वापरण्यात येणाऱ्या रेसिंग स्पाइक्स वापरून त्याला सुरूवात केली आहे. आम्ही महिलांच्या जीवनशैलीचे स्नीकर्स पुढे आणत आहोत आणि ते त्या समस्त महिला वर्गाच्या मदतीने तयार करत आहोत.

मी हे सर्व प्रत्यक्षात साकार होणाऱ्या क्षणांचा भाग होण्याची मला आतुरता लागून राहिली आहे. मी ज्या बुटांमध्ये स्पर्धा करते त्यापेक्षा या ब्रँडने उत्पादन केलेली उत्पादने माझ्यासाठी खूप जास्त महत्वाची आहेत. हा ब्रँड एका नवीन आशेची, समाजाच्या स्वीकृती आणि समाजात बदल घडवण्याच्या शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. मला आशा आहे की तुम्हालाही ते बदल जाणवतील.

जेव्हा तुम्ही मला धावताना पाहता, तेव्हा जाणून घ्या की मी फक्त पदकांसाठी आणि पुरस्कारांसाठी धावत नाही. मी बदल घडवण्यासाठी धावत आहे. मी प्रत्येक माणसाच्या समानतेसाठी धावत आहे. मी आई म्हणून धावत आहे. मी महिलांसाठी धावत आहे. कोणत्याही गोष्टीपेक्षा, मी भविष्याच्या दिशेने धावत आहे जिथे कोणत्याही महिलेला किंवा मुलीला तिचे स्थान माहित असल्याचे सांगितले जाणार नाही.

या उन्हाळ्यात भेटू,

एलिसन फेलिक्स...

आई, कार्यकर्ता, उद्योजक आणि सहा वेळा ऑलम्पिक सुवर्णपदक विजेती.

हे ट्विट तिने टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी केलं होतं. टोकियो ऑलिम्पिक संपेपर्यंत तिने सातव्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून आपल्या सर्व ऑलिम्पिक पदकांची संख्या ११ वर नेली असून ती अमेरिकेची सगळ्यांत जास्त ऑलिम्पिक पदकं पटकवणारी धावपटू ठरली आहे. आपण मातृत्व स्वीकारलं म्हणजे आपलं ध्येय आणि आपलं करिअर एक खेळाडू म्हणून संपत नसतं, हे तिने जगातील सर्व महिला खेळाडूंना दाखवून दिलं आहे. नायके-सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडचे दात त्यांच्यात घशात घालून आपल्या मागे आपल्या कृतीतून असा एक संपन्न 'वारसा' ठेवला आहे. जो येणाऱ्या अनेक पिढयांना एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते याची प्रेरणा देत राहील.

एलिसन फेलिक्सचा हा प्रवास प्रत्येक मातृत्व स्वीकारणाऱ्या महिलेला एक नवी ऊर्जा देणारा ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एलिसन फेलिक्सने जो लढा दिला आहे त्यासाठी तिला कडक सॅल्यूट आणि तिच्यातील त्या खिलाडू वृत्ती, जिद्द, बाण्याला माझा साष्टांग नमस्कार. तिच्या कर्तृत्वाचा हा वारसा नक्कीच आपल्यापैकी प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे. तो नेहमीच आपल्याला कठीण परिस्थितीत मार्गदर्शक ठरेल.

-  विनीत वर्तक

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.