जाणिव शहाणीव....

युवा विवेक    17-Aug-2021   
Total Views |

जाणिव शहाणीव..
Awareness_1  H

कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट..... आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळी एका संस्थेत जायचो. वारजे भागातल्या झोपडपट्टीमधल्या लहान मुलांचं ते खेळघर होतं. रोज दिवसभराची शाळा किंवा बाकीची कामं आटपून ती चिल्लीपिल्ली एका बंगल्याच्या गच्चीवर जमायची. खेळायची, चित्रं काढायची, गाणी म्हणायची, छोट्याछोट्या वस्तू बनवायची आणि पुन्हा आपल्या अंधाऱ्या जगात निघून जायची. दिवसातले तेवढे दोन तास त्यांना मनसोक्त बालपण जगायला मिळायचं. मी त्या मुलांना गोष्टी सांगायला आणि पुस्तकं वाचून दाखवायला जायचो. मुलं अगदी तल्लीन होऊन ऐकायची, मग कुठलीही गोष्ट असो..... कधीकधी त्याच गच्चीत आमचा लंगडीचा डावही रंगायचा.

एक दिवस संध्याकाळी मी नेहमीसारखा गेलो तेव्हा कळलं की एक रोज येणारा मुलगा गेले तीन चार दिवस आला नाहीये. बाकीच्या मुलांकडून कळलं की तो शाळेतही दिसलेला नाही. मी आणि अजून एक तरुण शिक्षक त्यांच्या स्कूटरवरून त्या मुलाच्या घरी जायला निघालो. डहाणूकर कॉलनीचा चढ पूर्ण चढून गेल्यावर मागच्या टेकडीवर कुठंतरी त्याचं घर होतं. अर्थातच, गाडी घरापर्यंत जाऊ शकत नव्हती, त्यामुळे आम्ही अलिकडेच उतरून चालत निघाली. जेमतेम दीड दोन फुटांची वाट आणि दोन्ही बाजूंना झोपड्या..... संध्याकाळच्या वेळी झोपडीच्या दारात बसलेल्या बायका, मध्येच वाहणारी गटारं आणि भातुकलीइतकी चिमुकली घरं..... गटाराच्या पाण्याची आणि कचऱ्याची दुर्गधी अडवत आम्ही कसेबसे त्या मुलाच्या घरी पोचलो. घर कसलं, पत्र्याचं खोपट होतं ते..... आतमधल्या दहा एक फुटांच्या जागेत मुलाची आई, दोन बहिणी, एका झोळीत ठेवलेलं तान्हं बाळ आणि तो मुलगा एवढी मंडळी होती. आम्हा दोघांना तिथं उभं राहायलाही जागा नव्हती, म्हणून मी बाहेरच थांबलो. आतले आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते, त्याचा सारांश साधारण असा होता.

शिक्षक : काय रे, बरा आहेस का?

मुलगा : हं....

शिक्षक : आला का नाहीस दोन दिवस?

मुलगा : सायकल नव्हती.... चालत यायला उशीर होतो....

शिक्षक : का? सायकल कुठं गेली?

आई : त्याच्या बा नं इकून टाकली.... घरात पैसा नाही आन उगा अडगळ नको म्हणून....

का कोण जाणे, पण पुढचं काही ऐकवेना.... परत येताना वाटेत आमचे शिक्षक म्हणाले की, उद्यापर्यंत त्याच्या सायकलीची सोय करू. नेमकी तेव्हा माझ्याकडे किंवा माझ्या कोणत्याच मित्रांकडे सायकल नव्हती.... आम्ही सगळेच गाड्यांवरून भुर्रकन फिरणारे झालो होतो. त्या घराच्या कित्येकपट मोठ्या घरात तीन-तीन, चार-चार जणांच्या कुटुंबात राहत होतो. McDonalds च्या सॉसच्या नळाचं आणि क्रॉसवर्डमधल्या नाणी टाकून गाणी ऐकण्याच्या सीडी सिस्टीमचं आम्हाला कोण अप्रूप वाटत होतं. सायकल विकली म्हणून घरी बसावं लागतंय, असं बालपण मी तेव्हा पहिल्यांदा बघितलं. ते बालपण मनावर कायमचं कोरलं गेलं. खरं तर गालावर एक चपराक मारून गेलं. अशा चपराकी पुढच्या काळात अनेकदा बसल्या.

या घटनेनंतरच एखाद वर्षानं एका मैत्रिणीच्या माध्यमातून एका कम्युनिस्ट विचारांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. आठवड्यातून एकदा भेटायचो, निरनिराळ्या डॉक्युमेंटरीज पाहायचो, पुस्तकं वाचून त्यांवर चर्चा करायचो, कधीकधी एखाद्या वक्त्याचं भाषणही असायचं. अतुल पेठेंची 'कचराकोंडी' ही डॉक्युमेंटरी तेव्हाच पाहण्यात आली. ऑरवेलचं ऍनिमल फार्म तेव्हा अभ्यासाला होतं, शिवाय गॉर्कीची जगविख्यात कादंबरी मदरतेव्हाच वाचून काढली. त्याआधी, आर्थिक विषमता, सामाजिक दरी हे विषय फक्त परिसंवादात बोलण्याचे किंवा भाषणांत टाळ्या मिळवण्याचे आहेत, असा समज होता. शाळेतून जरी या विषयांची कळत नकळत ओळख झालेली असली, तरीही आजूबाजूच्या तुलनेनं संपन्न वातावरणात नाही रेगटाचं अस्तित्व दुरून उसासे टाकण्याइतकंच गृहीत धरलं गेलं होतं. सिनेमानाटकांनी तर झोपडपट्टीतली मुलं म्हणजे गुंड हे समीकरण इतकं घट्ट केलं होतं की नकोच बाबा ते जगही भावना फारच तीव्र होती.

पण तेजग पूर्ण नाहीच, पण थोडंफार पाहिल्यानंतर आपल्याच कोत्या मानसिकतेची लाज वाटली. त्या कम्युनिस्ट ग्रुपबरोबर शहीददिनाच्या किंवा इतर काही मोर्चांमध्ये हातात 'साम्राज्यवाद मुर्दाबाद' च्या घोषणा देत हिंडताना आपणही कधी ना कधी याच साम्राज्यवादाच्या कचाट्यात सापडणार आहोत, नाही, आपण त्याच्या जबड्यात उभं राहूनच या घोषणा देतोय, अशी शंकाही मनात यायची नाही. आजूबाजूचे मित्र म्हणायचे, कधीतरी येशीलच या तीरावर तू..... मी उडवून लावायचो..... यावरून कॉलेजच्या कट्ट्यावर दोन दिवस वाद घातल्याचंही आठवतंय. आता मागे वळून बघताना नेमकं कोण जिंकलं, हेच समजत नाही.

परंतु एक गोष्ट नक्की, या वरवर दुर्लक्षित वाटणाऱ्या, पण आपल्याच आसपास वावरणाऱ्या जगाच्या दर्शनानं मनाच्या जाणिवा शहाणिवा प्रचंड प्रमाणात समृद्ध केल्या. फक्त आपलाच विचार करत जगत जायची वृत्ती या अनुभवांनी बदलली आणि आपल्यापलीकडचं एक अंधारं जग बघायला भाग पाडलं.

आज मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून सगळं जग एका बोटावर नाचतं, पण अजूनही तो बिनसायकलीचा मुलगा मनातून जात नाही.

कदाचित, तो आहे म्हणूनच पाय जमिनीवर आहेत. नाहीतरी माऊली म्हणतातच ना,

प्रकाश हरीचा प्रकाशला देही, नेणतीच काही, मूढजन

जाणिव शहणीव तूच निवृत्तीदेवा, हरी उभय भावा, ज्ञान देशी

- अक्षय संत