शांतीत क्रांती

युवा विवेक    25-Aug-2021   
Total Views |

'शांतीत क्रांती' : विपश्यनेचा काट्याकुट्यांतून जाणारा मार्ग
shantit kranti_1 &nb

फरहान अख्तर दिग्दर्शित 'दिल चाहता है' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला नुकतीच १० ऑगस्ट रोजी वीस वर्षं पूर्ण झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई तर केलीच, शिवाय अनेक पुरस्कारही पटकावले. त्यासोबतच मैत्रीच्या, प्रेमाच्या बदलणाऱ्या नात्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका तरुण पिढीसाठी हा चित्रपट एक सुखद स्मरणरंजन बनून राहिला आहे.

तीन मित्रांची गोवा रोड ट्रिप, त्यांच्या मैत्रीत पडलेली फूट, वेगवेगळ्या वाटांवरच्या त्यांच्या प्रेमकथा आणि नंतर एकत्र येणं, सगळ्यालाच एक टवटवी होती. मरगळ आलेल्या बॉलिवूडच्या एकाच पठडीतल्या कथांमध्ये 'दिल चाहता है'च्या वेगळेपणाने केवळ स्वतःचा मार्ग तयार केला नाही, तर एका संपूर्ण पिढीला अक्षरशः वेड लावलं. या वेडाचे पडसाद वेगवेगळ्या कलाकृतींतून आजही दिसतात, कधी थेटपणे, तर कधी अप्रत्यक्षपणे. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच दाखल झालेली मराठी वेब मालिका 'शांतीत क्रांती' हे याच वेडाचं एक रूप आहे.

अर्थात गोवा ट्रिप, तीन मित्र, त्यांच्या जगण्यावर असलेला 'दिल चाहता है'चा अमीट ठसा हे सगळं असलं, तरी या वेबमालिकेची कथा काहीशा वेगळ्या अंगाने पुढे जाते.
श्रेयसच्या गर्लफ्रेंडने साखरपुड्यानंतर त्याच्याशी लग्न मोडलं आहे. तो मात्र त्यातून बाहेर पडायला तयार नाही. प्रसन्नाला जलतरणाच्या ट्रेनिंगसाठी परदेशी जायचं असताना बायको गरोदर असल्याचं कळतं, त्यामुळे तो द्विधा मनःस्थितीत आहे. दिनारकडे पुरेसे पैसे नाहीत आणि त्यात त्याचं दारूचं व्यसन सुटत नाहीये. श्रेयसच्या ब्रेकअपनंतर दारू पिण्यासाठी हे तिघे मित्र दिनारच्या घरी भेटतात. मात्र, तिथे अवचित उगवलेल्या आलोकला कसं हुसकावून लावायचं, याचा ते विचार करत असताना तो स्वतःच निघून जातो आणि जाताना त्यांना शांतिवनाबद्दल सांगतो. आपण गोव्याला जातोय, असं सांगून श्रेयस प्रसन्ना आणि दिनारला फसवून शांतिवनात घेऊन जातो. पुढे काय होतं, ते तिथे रमतात का की कंटाळून पुढे गोव्याला निघून जातात, हे सर्व अर्थातचपुढे कथेत ओघाने येतं.

मालिकेच्या पहिल्या दृश्यातच श्रेयस प्रसादाचं तीर्थ चाटताना दिसतो. नंतरच्या काही मिनिटांतच रुपाली सर्वांसमोर त्याच्याशी ठरलेलं लग्न मोडते. त्यानंतर लगेच प्रसन्ना आणि दिनारची दृश्यं आहेत. या तिन्ही पात्रांची ओळख करून देणारी ही दृश्यं म्हणजे पात्रपरिचयाचा उत्तम नमुना आहेत. शेवटच्या भागापर्यंत या तिघांच्या वागण्यात बरीच स्थित्यंतरं येत असली, तरी आपल्या मूळ स्वभावापासून हे तिघेही फारशी फारकत घेताना कुठेही दिसत नाहीत. मालिकेच्या उत्तम लेखनामुळे हे साध्य झालं आहे. मालिकेच्या प्रत्येक भागाला दिलेलं शीर्षकही समर्पक आहे. विपश्यनेत तुमच्या विचारांचं आणि भावनांचं तुम्ही तटस्थपणे निरीक्षण करणं अपेक्षित असतं. या प्रक्रियेत आधी स्वतःच्या मनातील कोलाहलाची जाणीव, त्याचा स्वीकार, विरेचन आणि पुढे सगळ्या गोष्टींच्या अनिश्चित असण्याचा स्वीकार करून मनःशांती मिळवणं, या मार्गाने माणूस जातो. श्रेयस, प्रसन्ना आणि दिनारचा प्रवासही याच क्रमाने होतो. एका भागात काकूंशी बोलताना लगेच रागावणारा प्रसन्ना शेवटाकडे येताना शांत होतो. नेहाचं वागणं, तिचा शांतपणे होणारा घटस्फोट पाहून श्रेयस स्वतःच्या आणि रुपालीच्या नात्याकडे तटस्थपणे पाहू लागतो आणि त्याला आपली चूक उमगते. पहिल्या भागापासून उर्मट वाटणारा दिनार शेवटच्या भागात पूर्णपणे वेगळा भासतो.

मालिकेतले काही प्रसंग इतके उत्तम झाले आहेत की,त्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. ड्रमिंगच्या दृश्यात "मला संगीतातलं कळत नाही" म्हणणारा प्रसन्ना स्वतःच्या मनातल्या भीतीला साद घालतो आणि वेड लागल्यासारखा ड्रम बडवतो, तो प्रसंग म्हणजे या मालिकेचा 'पीक पॉईंट' म्हणावा लागेल. त्या प्रसंगातलं पाण्याखालचं दृश्य स्तब्ध करणारं आहे. श्रेयसने पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे, हे कळल्यानंतरही नेहा ज्या शांतपणे त्याचं म्हणणं ऐकून घेते, ते पाहण्यासारखं आहे. एका प्रसंगात दिनार पॉलाला "वा माझी माँ आनंद शीला" म्हणतो, ते भन्नाट आहे. श्रेयस, प्रसन्ना आणि दिनारचे विनोद उत्तम जमून आले आहेत. मौनाच्या दिवसापूर्वी दिनारने घातलेला राडा, त्यातून त्याचा श्रेयस आणि प्रसन्नाशी झालेला वाद आणि या प्रसंगाचं 'दिल चाहता है'मधल्या समीर, आकाश आणि सिद्धार्थच्या भांडणाशी साधर्म्य असूनही जाणवणारं वेगळेपण, हा या मालिकेचा आणखी एक हायलाईट आहे. तिघांच्याही आयुष्यातली भीती, आपापल्या मैत्रीच्या व्याख्या आणि स्वतःचं आयुष्य ते तिघेही तटस्थपणे पाहू लागतात, तेव्हा प्रेक्षक म्हणून आपणही एकरूप होतो आणि त्यांच्या प्रवासासोबत स्वतःलाही नकळत जोखून पाहू लागतो.

पॉला मॅकग्लीन आणि सारंग साठ्ये यांनी या मालिकेचं सुबक दिग्दर्शन केलं आहे. मालिकेचं टायटल डिझाईन आकर्षक आहे. सौरभ भालेराव यांचं संगीत अफलातून आहे. काही भागांच्या शेवटी येणारी गाणी खूप छान जुळून आली आहेत. मालिकेच्या गोळीबंद लेखनाची जबाबदारी चेतन डांगे, अद्वैता देशमुख, प्राची हंकारे, अभय महाजन, अनुषा नंदकुमार, मृणाल पंत आणि सारंग साठ्ये या सहा शिलेदारांनी लीलया पेलली आहे. एक उत्तम वेब मालिका कशी लिहावी, याचं उदाहरण म्हणजे 'शांतीत क्रांती' ही मालिका, असं म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये.

मात्र मालिकेच्या लेखनासोबत ती त्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, याचं श्रेय आहे यातल्या कलाकारांचं. ललित प्रभाकरने साकारलेला गंभीर तरीही गोंधळलेला प्रसन्ना, अभय महाजनचा दिशाहीन श्रेयस, आलोक राजवाडेचा उर्मट दिनार, ही मुख्य पात्रं तर लाजवाब आहेतच. मात्र, इतर लहानसहान पात्रं साकारणाऱ्या कलाकारांची कामगिरीही मोलाची आहे. विजय निकम यांनी साकारलेले महागुरू, शिखा तलसानियाची शांत नेहा, सुहिता थत्ते यांची काकू, निनाद गोरेंचा छोटू, धनंजय सरदेशपांडे यांनी साकारलेले धुमाळ काका (भाडिपाच्या काही एपिसोड्समध्ये दणकेबाज फलंदाजी केलेल्या दिवंगत धुमाळकाकांच्या स्मरणार्थ पात्राला हे नाव दिलं असावं), सागर यादव यांनी साकारलेले शिंदे, ही सगळी पात्रंही मालिका पाहताना आपला ठसा सोडून जातात. मृण्मयी गोडबोले (निशी), विभावरी देशपांडे (अंजली मेहता), सखी गोखले (रुपाली), जितेंद्र जोशी (गोपी), सुनील अभ्यंकर (दीक्षित काका), राधिका इंगळे (वीणा), सारंग साठ्ये (निखिल) या सर्व कलाकारांनी केवळ एक किंवा दोन भागांत दिसूनही काही मिनिटांची दृश्यं खिशात टाकली आहेत. अमेय वाघचं सरप्राईज पॅकेज प्रचंड आवडण्यासारखं आहे. चाणाक्ष प्रेक्षकांना याची 'कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण'च्या प्रिया बापटच्या एपिसोडशी असलेली लिंक सहज लक्षात येईल.

भाडिपा आणि टीव्हीएफ या दोन्ही चॅनेल्सनी आजवर दर्जेदार कंटेंट देऊन प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. या वेब मालिकेद्वारे त्यांनी तोच वारसा पुढे चालवत प्रेक्षकांच्या भेटीला एक सुंदर वेब सिरीज आणली आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.

- संदेश कुडतरकर.