अस्वस्थ रक्तपेशींच्या स्वस्थतेची गोष्ट

युवा विवेक    28-Aug-2021   
Total Views |
दुमडलेल्या पानापाशी

lekhakachi goshta_1 
अस्वस्थ रक्तपेशींच्या स्वस्थतेची गोष्ट

पुस्तकाचं नाव : लेखकाची गोष्ट
लेखक : विश्राम गुप्ते, पृष्ठे : 324

लेखक होणं म्हणजे भानात येणं. लेखक होणं म्हणजे केवळ भाषा कमावणं नाही. लेखक होणं म्हणजे पर्सनल ओळखीपाळखी वाढवणं नाही. लेखक होणं म्हणजे सुहास्य वदनाने साहित्य क्षेत्रातल्या ज्येष्ठांना वंदन करणं नाही. लेखक होणं म्हणजे भोळ्याभाबड्या वाचकांमध्ये मिरवणं तर अजिबातच नाही. लेखक होणं म्हणजे स्वतःची जगण्याची व्हिजन शोधणं. स्वतःची दुर्बीण किंवा टेलिस्कोप तयार करणं. अनुभवाचं निरीक्षण करण्यासाठी स्वतःचं एक सूक्ष्मदर्शक यंत्र, म्हणजेच मायक्रोस्कोप शोधून काढणं. लेखक होणं म्हणजे सतत अस्वस्थ राहणं. लेखक होणं म्हणजे कुठेही, कधीच सुखी न वाटणं.

हा एक परिच्छेद वाचला तरी, स्वतःला लेखक म्हणवणारा किंवा लिहिणारा प्रत्येक व्यक्ती नक्कीच काही क्षण विचार करेल. ‘आत्मपरीक्षण करणं’ किंवा ‘अंतर्मुख होणं’ असे मोठे मोठे शब्द वापरले नाही तरी, वरच्या चार ओळी वाचल्यावर अवस्था होते ती अशीच. लेखक! लिहिणार्‍या माणसाला मिळालेली ओळख. काहींचा छंद, काहींचं व्यक्त होण्याचं साधन, काहींचा मन मोकळं करण्याचा मार्ग, काहींचा मौनसंवाद, काहींचा अव्यक्त वाद, काहींचा व्यवसाय, काहींची गरज, काहींची जबाबदारी, काहींनी घेतलेलं सोंग; तर काहींना चिकटवलं गेलेलं बिरूद!

लेखनाचं व्रत जपणार्‍या लेखकाला काही तरी सांगायचं असतंच. म्हणूनच तर तो लिहितो अनेकांच्या कथा, मांडतो अनेकांची गार्‍हाणी आणि साजरे करतो सुखाचे सोहळेही. मात्र, या पलीकडे जाऊन जेव्हा तो स्वतःच्या प्रवासाविषयी बोलू लागतो, लेखक होण्याच्या प्रक्रियेविषयी सांगू पाहतो, त्यासाठी केलेल्या वाचनाबद्दल तळमळीने व्यक्त होऊ पाहतो, त्या वाचनातून जे हाती लागलं ते त्रयस्थ; पण ठामपणे नोेंदवू लागतो तेव्हा साकारते ती त्याची गोष्ट. म्हणजेच लेखकाची गोष्ट!

‘लेखकाची गोष्ट’ हे विश्राम गुप्ते यांचं पुस्तक अशीच एक नोंद आहे, एका जाणत्या वाचकाचं आणि नेमस्त लेखकाचं टिपण आहे. लेखकाच्या लेखनात त्याची जडणघडण दिसते. त्याचा प्रवास दिसतो. त्याने काय वाचलं, काय वेचलं, काय उराशी कवटाळलं, काय सोडून दिलं, काय स्वीकारलं आणि काय नाकारलं हे सगळं जाणवतं. त्याने निवडलेल्या प्रतीकांमधून, लेखनातल्या रूपकांमधूनही खूप ‘बीटविन द लाइन्स’ कळतात. हे सगळं कसं कळतं? हे जाणून घेण्याचा मार्ग म्हणजे गुप्ते यांचं ‘लेखकाची गोष्ट’ हे पुस्तक आहे.

‘लेखकाची गोष्ट’ या पुस्तकात गुप्तेंनी आपला प्रवास उलगडला आहे. 34 लेख आणि 324 पानांमध्ये त्यांनी अनेक लेखक, कवी, समीक्षक, पुस्तकं, संदर्भग्रंथ यांचा धावता आलेख मांडला आहे. यासाठी पुस्तक क्रमांक एक- अमूक अमूक, लेखक- अमूक अमूक आणि त्यावरच्या दहा ओळी असा ठोकळेबाजपणा न घेता त्यांनी त्यांना त्या लेखकाबद्दल काय वाटलं, त्या पुस्तकात काय जाणवलं, त्याचा धागा धरून नवं काय सापडलं आणि ते पुस्तक का वाचावं हे अतिशय प्रवाही शैलीत सांगितलं आहे. यासाठी त्यांनी आत्मनिवेदनाचा पर्याय निवडला आहे.
एका लेखकावर न्यायालयात खटला भरला गेला आहे आणि तो लेखक आपला प्रवास सांगतो आहे, असं चित्र निर्माण करून गुप्ते यांनी त्याद्वारे आपली कैफियतच मांडली आहे. मात्र, हे आपलं आत्मचरित्र नाही, हे ते अगदी ठामपणाने सांगतात. ते म्हणतात, ‘ही गोष्टीरूप कैफियत म्हणजे माझं आत्मचरित्र नाही. तो करताना मला आलेल्या चित्रविचित्र आणि तापदायक अनुभवांची ही उजळणी आहे. त्या अनुभवांमधून मी माझा कसा बचाव केला आणि स्वतःला कसं मरू दिलं नाही, कोमेजू दिलं नाही ह्याची ही सत्यकथा आहे.’

गुप्ते यांनी स्वतःच्या प्रवासाची आणि अर्थात पुस्तकाची सुरुवात चांदोबा, कुमार आणि फास्टर फेणे यांपासून केली आहे. पुढे या प्रवासात श्री. ना. पेंडसे, अरुण साधू, श्री. पु. भागवत, ग्रेस, बाबा आमटे, नारायण धारप, साने गुरूजी यांपासून इंग्रजी लेखक, तत्त्वज्ञदेखील येतात. मराठी वाचकाला इंग्रजीचं आकर्षण असतं, अप्रूप असतं आणि काही प्रमाणात भीतीही असते. आपल्या तिसर्‍याच लेखात गुप्तेंनी यावर सविस्तर भाष्य केलं आहे. जेम्स हॅडली, पेरी मेसन, जॉन स्टेनबॅक, आयर्विंग स्टोन, व्हॅन गॉग असे अनेक लेखक एकापाठोपाठ एक वाचले. क्लासिक इंग्रजी साहित्य कसं मिळवलं, ते वाचताना काय अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली, हे अतिशय मनापासून त्यांनी दिलं आहे.

या पुस्तकाचं वैशिष्ट्य हेच आहे की, यात वाचकाला थेट मत मिळतंय. ते किती घ्यायचं, किती सोडून द्यायचं, हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न. मात्र, कोणतंही पुस्तक वाचल्यावरची पहिली प्रतिक्रिया जेवढी उत्स्फूर्त आणि सच्ची असते, तेवढ्याच सहजतेने गुप्ते यांनी आपलं लेखन केलं आहे. यामुळे वाचकांना मराठी-इंग्रजी पुस्तकांची एक वेगळी यादी मिळते आहे, हे वेगळं सांगायला नको.. त्या त्या लेखकाच्या शैलीविषयीदेखील गुप्ते यांनी लिहिलं आहे आणि मुळात हे सगळं त्यांच्या जीवनासह येत असल्याने त्या त्या वयात काय वाचन झालं, हेही त्यात ओघाने आलं आहेच.
अरुण साधूंबद्दल ते सहजपणे लिहतात की, साधूंच्या कादंबर्‍यांमध्ये ‘एव्हरीडेनेस’ होता. या अर्थाने त्यांची कादंबरी आधुनिक होती. साधूंचं सगळं कन्टेपररी. म्हणजे चालू जीवनाबद्दल होतं. अमेरिकेतल्या निओ जर्नालिझमचा हा देशी आविष्कार साहित्यिक फॉर्म म्हणून खिळवून ठेवतो. पत्रकार जेव्हा कादंबरी लिहितो तेव्हा कसा उत्कंठा जागवतो हे कळलं.
अरुण साधू पेंडश्यांसारखे रोमँटिक नव्हते, ते सामाजिक, वास्तववादी होते. त्यांची भाषा रोजमर्राची आहे. साधूंनी मला खूप इन्स्पायर केलं होतं त्या काळात. ग्रेसांबद्दलही गुप्ते यांनी खूप अचूकपणे आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. ते म्हणतात, ‘ग्रेस म्हणजे जे बोलता येत नाही ते. मी अखेरपर्यंत ग्रेसच्या वाटेला गेलो नाही. ते मात्र माझ्या वाटेवर अचानक अवतरायचे. माझ्याकडे न बघता मला दर्शन द्यायचे. पारंपरिक देवासाठी तळमळणार्‍या लोकांना ग्रेसने प्रेयसीसाठी तळमळायला शिकवलं; पण हे करताना त्यांनी शब्दांची आतिषबाजी केली. त्यामुळे ग्रेसची कविता दुर्बोध झाली असावी. ग्रेस सायकॉलॉजिकल आहेत, लॉजिकल नाही. ते व्यक्तिनिष्ठ आहेत, वस्तुनिष्ठ नाहीत. ते धार्मिक आहेत, सेक्युलर नाहीत. अरुण साधू, ग्रेस यांच्याप्रमाणे अनेक लेखकांच्या शैलीबद्दल गुप्तेंनी मार्मिक टिप्पणी केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, मराठी साहित्य, साहित्यव्यवहार, भाषा, लेखक, प्रकाशक, वाचक, वाचक-लेखक संबंध, या सगळ्याचे आर्थिक, राजकीय, सामाजिक पडसाद यावरही वेळोवेळी गुप्तेंनी आपले भाष्य केले आहे. त्यामुळे लेखकाची गोष्ट या पुस्तकाच्या नावाखाली लिहिलेली ‘अ सर्व्हायव्हल गाइड फॉर मराठी रायटर्स’ ही ओळ सार्थ ठरते. मराठी साहित्य आणि लेखकाला टिकून राहायचं असेल, तर त्याने जशा व्यावहारिक गोष्टी शिकणं गरजेचं आहे, तसंच स्वतःला सतत खोदत राहणंही गरजेचं आहे. ‘आता नवं काय?’ आणि ‘आता यापुढे काय?’ या दोन प्रश्‍नांनी त्याने अस्वस्थ होणं गरजेचं आहे. या दोन प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी असंख्य विषय देऊ शकणांर वाचनाचं हे गाइड लिहू पाहणार्‍या आणि चांगलं वाचू पाहणार्‍या प्रत्येकाने वाचायला हवंच. ‘माझ्या अस्वस्थ रक्तपेशींनी रिलॅक्स व्हावं म्हणून मी लिहितो,’ असं गुप्ते का म्हणतात आणि असं ते लिहितात तरी काय, याचा अनुभव ‘लेखकाची गोष्ट’मधून नक्कीच मिळेल.
- मयूर भावे