पृथ्वीचा वेग आणि पृथ्वीवरील धरणे

युवा विवेक    01-Sep-2021   
Total Views |

पृथ्वीचा वेग आणि पृथ्वीवरील धरणे
Earth's velocity and eart

सध्या चीनमध्ये बांधण्यात आलेल्या महाप्रचंड धरणाची चर्चा सर्वदूर सुरू आहे. चीनने बांधलेले धरण सुमारे १७५ मीटर उंच असून यामध्ये साधारण ४० ट्रिलियन किलोग्राम इतक्या प्रचंड प्रमाणात पाणीसाठा होऊ शकतो. यांगत्से या नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. आता मंडळी तुम्ही विचार करत असाल की, या धरणाचा इथे काय संबंध? तर तो संबंध असा की, या महाविशाल धरणामुळे आपल्या पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग हा मंदावला आहे, परंतु आपल्याला लगेच घाबरून जाण्याचे काही कारण नाही. या धरणामुळे पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग म्हणजे परिवलनाचा वेग फक्त ०.०६ मायक्रोसेकंदाने कमी झालेला आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण या विषयी अधिक माहिती घेणार आहोत.

वस्तुतः पृथ्वीचा परिवलन वेग हा अनेक बाबींवर अवलंबून असतो. त्या बाबी म्हणजे, पृथ्वीवर असणारे महासागर, तसेच पृथ्वीवरील विस्तृत जलाशय, पृथ्वीचा उपग्रह चंद्र, तसेच पृथ्वीवर होणारे भूकंप, वातावरणातील होणारे बदल आणि त्यामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशांमध्ये होणारे बदल. या सर्व गोष्टींमुळे पृथ्वीच्या परिवलनामध्ये फरक पडू शकतो. कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही मायक्रोसेकंद इतका बदल या बाबींमुळे घडत असतो. त्यामुळे कधी पृथ्वीचा वेग मंदावतो, तर कधी तो वाढतो.

चंद्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर, चंद्रामुळे पृथ्वीवरील महाकाय जलाशयांना भरती आणि ओहोटी येते. चंद्रामुळे या महासागरांवर परिणाम होतो आणि परिणामतः पृथ्वीच्या परिवलन गतीवरसुद्धा परिणाम होतो. गेल्या काही लक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग हा आजच्या वेगापेक्षा फार जास्त होता. म्हणजेच त्या काळी पृथ्वीवरील दिवस हा नक्कीच २४ तासांपेक्षा कमी तासांचा आणि लहान होता. मात्र, पुढील वर्षांमध्ये चंद्रामुळे आणि भरती ओहोटीमुळे हा वेग मंदावला आणि परिणामतः पृथ्वीवरील दिवससुद्धा मोठा झाला.

गेल्या शतकातील मानवजातीला काळजीत टाकणारी सर्वात मोठी बाब म्हणजे ग्लोबल वार्मिंग’. म्हणजेच औद्योगिकीकरणामुळे होणारे वातावरणातील बदल. याच औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीच्या वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढू लागले आणि कार्बन आणि इतर वायू यांमुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले. याच तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशांमधील बर्फ दर वर्षी अधिकाधिक वितळू लागला. यामुळेच समुद्राची पाणी पातळीसुद्धा वाढू लागली आहे. महासागरांची पातळी वाढू लागल्याने भरती-ओहोटीच्या दरम्यान आणि भरती-ओहोटीमुळे पृथ्वीच्या परिवलन गतीमध्ये होणारा परिणामदेखील वाढताना दिसू लागलेला आहे.

वरील सर्व बाबी स्पष्ट करण्याचे कारण म्हणजे धरण आणि पृथ्वीचा वेग यांचा परस्परसंबंध सहज लक्षात यावा यासाठी हे विवेचन केलेले आहे. चीनने यांगत्से नदीवर बांधलेल्या महाविशाल धरणामुळे प्रचंड मोठा जलाशय तयार झालेला आहे. ज्याप्रमाणे चंद्राचा प्रभाव पडून पृथ्वीवरील महासागरांना भरती-ओहोटी येते त्याचप्रमाणे चंद्राचा प्रभाव अतिशय किरकोळ प्रमाणात या जलाशयावर देखील होतो आहे त्यामुळे पृथ्वीचा “इनेर्शिया” म्हणजेच जडत्व वाढल्याने पृथ्वीचा परिवलन वेग मंदावला आहे. हा वेग वर सांगितल्याप्रमाणे साधारण ०.०६ मायक्रोसेकंदाने वाढलेला आहे. मानवनिर्मित वास्तूमुळे पृथ्वीवर परिणाम होण्याची कदाचित (ग्लोबल वार्मिंग सोडून) ही पहिलीच वेळ असेल. कुणास ठाऊक कदचित येत्या काळात आपण पृथ्वीचा वेग आपल्याला हवा तसा ठेवू शकू !!!

- अक्षय भिडे