शब्दे घडितो आकार

युवा विवेक    21-Sep-2021   
Total Views |

शब्दे घडितो आकार....


gadima gulzar_1 &nbs 

महाराष्ट्रातला माणदेशाचा रखरखीत, शुष्क प्रदेश..... पाण्यासाठी उन्हातान्हातून मैलोनमैल वाट तुडवत जाणारी आणि उन्हाच्या तापत्या जाळात वीतभर सावली शोधणारी इथली माणसं..... गावकुसाबाहेरच्या विहिरीवरून एक प्रौढ माणूस हातात पाण्यानं भरलेली कळशी घेऊन संथपणे चालत घराजवळ आला. घरामध्ये एका कोपऱ्यातल्या बाजल्यावर एक आजारी स्त्री कण्हत होती तर दुसरीकडे एक मुलगा हातात पुस्तक घेऊन वाचत बसला होता. स्त्री कण्हत मुलाला म्हणाली. 'गजानना, जरा वडिलांच्या हातातली कळशी घे रे....' मुलगा पुस्तक बाजूला ठेवून ताडकन उठला आणि वडिलांच्या खांद्यावरची पाण्यानं भरलेली कळशी घेऊन आत गेला..... आईच्या शब्दांनी मुलाची कानशिलं लाजेनं लाल झाली होती. बाप घरात पाणी भरतोय आणि हाताशी आलेला मुलगा घरात बसून आहे..... ??? त्याच रात्री होते नव्हते तेवढे कपडे एका पिशवीत कोंबून जेमतेम सातवीपर्यंत शिकलेल्या त्या मुलानं पोटासाठी पुण्याची वाट धरली.....!

१९४७..... स्वातंत्र्याची पहाट उगवली तीच मुळी फाळणीच्या जखमेच्या रक्तानं माखलेली.... माणूस माणसाचा उरला नव्हता..... डोळ्यांना फक्त एकच रंग दिसत होता..... लाल रक्ताचा..... माणसं एकमेकांना गवतासारखी कापत सुटली होती..... जी जिवंत राहत होती ती जीवाच्या आकांतानं पळत होती.... या वादळात अडकलेला एक अकरा वर्षांचा मुलगा आपलं घरदार, शाळा आणि गावकूस सोडून भटकत होता..... पोटात भूक आणि डोळ्यांत अश्रू घेऊन हरवलेली वाट शोधत तो कसाबसा दिल्लीला पोचला.... या सगळ्या गडबडीत शिक्षण सुटलं ते कायमचंच......

तुम्हाला वाटेल, या कोणाच्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण जग आज या दोघांना दोन भाषांमधील महाकवी म्हणून ओळखतं.... सातवीत शाळा सोडून माणदेशातून पुण्यात आलेला तो मुलगा म्हणजे गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा.... आणि फाळणीत हरवत दिशाहीन अवस्थेत दिल्लीला पोचलेला अकरा वर्षांचा तो.... संपूरणसिंग कालरा उर्फ गुलजार.....

पुण्यात काम शोधत हिंडत असताना गदिमांची भेट त्यांच्या वडिलांच्या एका मित्राशी झाली. गदिमा काहीकाळ त्यांच्याकडेच राहत होते. त्यांच्या घरातल्या पुस्तकांच्या प्रचंड खजिन्यातच गदिमांना मोरोपंत, तुकाराम-ज्ञानेश्वर, शाहीर रामजोशी असे अनेक कवी भेटले.... यासर्वांच्या मुशीतून गदिमांची कविता फुलत गेली. थोड्या फार फरकानं तीच गोष्ट गुलजारांची..... दिल्लीत एका गराजमध्ये गाड्यांना रंग द्यायचं काम करणारे गुलजार रंग वाळेपर्यंत काहीतरी वाचत बसायचे. अशातच एक दिवस त्यांच्या वाचनात आलं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर लिखित 'द गार्डनर'.... ते पुस्तक वाचून गुलजार इतके प्रभावित झाले की तिथूनच त्यांनी लेखक बनायचा निर्णय घेतला.

अण्णा माडगूळकर काय किंवा गुलजार काय, एका वेगळ्याच काळातले महाकवी..... त्या काळात आजच्याइतक्या संधी तर उपलब्ध नव्हत्याच, पण आजच्यासारखा माध्यमांचा सुकाळ (आणि सुळसुळाट!!) सुद्धा नव्हता. चित्रपट, नाटक, संगीत, कविता या कला होत्या. अजून त्यांच्या 'भ्रष्ट न-कला' झाल्या नव्हत्या. चित्रपटसृष्टी सिनेमा धंदाया सदरात मोडत नव्हती. एखादं गाणं बनवायला गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, गायक एकत्र बसत, चर्चा करत, दिग्दर्शकाला एखादा शब्द खटकला टर त्याची चर्चेत तो कवीकडून बदलून घेत. नटनटीपेक्षाही दृश्याला महत्व देऊन गीतरचना केली जाई, त्यामुळेच आजही त्याकाळातली गाणी आपण सहज गुणगुणतो.....

त्रेचाळीस वर्षांपूर्वी गदिमा गेले. गुलजार अजूनही लिहितायत, पण तेही आज पंच्याऐंशी वर्षांचे आहेत. एवढ्या मोठ्या काळात फक्त सिनेमा किंवा साहित्याचाच नव्हे तर, संपूर्ण समाजाचाच चेहरामोहरा आश्चर्य वाटावं इतक्या वेगानं बदलत गेलाय. सिनेमातंत्र शिकवण्याचे वर्ग सुरू झालेत, गीतलेखन, संवादलेखन यांचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणारे अनेक कोर्सेस चालू झालेले दिसतात. अनेक उत्तम शिकलेले लोक कलेच्या प्रांतात आपलं प्राविण्य दाखवू लागलेत. आज आपल्याकडे पैशाला पासरी या दरानं माध्यमं उपलब्ध आहेत. शिक्षणाची दारं शहरीकरणानं आणि आर्थिक उदारीकरणानं खुली केलीच आहेत. आज नुसता मीडियाहा शब्द उच्चारला तरी वर्तमानपत्रापासून 'टिकटॉक'पर्यंत असंख्य पर्याय समोर येतात. वेबसीरीजच्या माध्यमातून जगभरातलं मनोरंजन एका क्लिकवर आलंय. माध्यमं उदंड आहेत, पण आशयाचं काय? संध्याकाळी टीव्ही लावला तर चॅनलचा लोगो आणि बदलणारे चेहरे सोडल्यास एकच कार्यक्रम आपण तीन तास बघतोय, असंच वाटतं आणि तरीही आपण त्यांना शिव्या घालत ते बघतो.

अण्णा काय किंवा गुलजार काय, या दिग्गजांनी 'जे द्यायचं ते सकसच' या ध्यासानं पछाडून अनेक मनं समृध्द केली. गुलजारांची 'मिर्झा गालिब' ही सिरीयल आजही आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल, पण आजचं चित्र पाहिलं की, एकच प्रश्न पडतो, आज सगळ्या प्रकारच्या सुखसोयी, उत्तम शिक्षण आणि जगभराचं एक्स्पोजर समोर हात जोडून उभं असूनही 'खपतंय ना, विका' या वृत्तीनं आजचे लेखक का राहतात? मी मान्य करतो की, आज काळाच्या गरजा बदलल्यात, व्यावसायिक लेखक म्हणून अनेक बंधनं असतात आणि आजच्या महागाईच्या काळात 'फक्त लेखनावर' पोट भरणं निदान सुरुवातीला तरी अवघड आहे. पण निदान जे देतोय, ते वेगळं, आशयसंपन्न असेल, याचा आग्रह तर प्रेक्षक आणि लेखक, या दोन्ही बाजूंनी धरला जाऊच शकतो ना.....

एवढं शिक्षण घेतल्यावर, इतकं जग पाहिल्यावर, बदलत्या काळाच्या रोलर कोस्टरमधून प्रवास केल्यावर कुठंतरी वाहत्या पाण्याला एक निवळशंख स्थैर्य मिळतं. मन क्षणांच्या हिशोबापलीकडे धावून त्यातल्या अनुभूतीचा मागोवा घ्यायला लागतं आणि त्याच प्रक्रियेतून एखादं अचाट शब्दशिल्प जन्माला येतं, पण त्यासाठी वेळ, संयम आणि मनाची योग्य मशागत गरजेची असते.

वेगळं, सुंदर, जगण्याला भिडणारं लिहूया.... लिहित राहू या..... काय माहित, कदाचित आपल्यातही एखादे 'अण्णा' किंवा एखादे 'गुलजार' दडलेले असतील.....

- अक्षय संत