जेम्स वेब टेलिस्कोप

युवा विवेक    22-Sep-2021   
Total Views |
जेम्स वेब टेलिस्कोप

james web telescope_1&nbs
जेम्स वेब हा जगातील सर्वांत मोठा मानवनिर्मित आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारा टेलिस्कोप आहे. या टेलिस्कोप मुळे खगोलशास्त्रज्ञांना विविध परग्रहांवरील वातावरण तसेच आपल्या आकाशगंगेत तारे जन्माला येण्याची प्रक्रिया आणि एकंदरच अवकाशातील गूढ उकलण्यास मदत होणार आहे. जेम्स वेब हा टेलिस्कोप १८ डिसेंबर २०२१ रोजी अवकाशात झेप घेणार आहे. या टेलिस्कोपच्या साह्याने खगोलशास्त्रज्ञांना एखादी आकाशगंगा निर्माण होतानाची प्रक्रियासुद्धा पाहता येऊ शकणार आहे. तसेच, अनेक वैज्ञानिक प्रयोगसुद्धा या टेलिस्कोप च्या माध्यमातून शास्त्रज्ञांना करता येणार आहेत.
अवकाशात दूरवर पाहण्यासाठी या टेलिस्कोप ला प्रचंड मोठे असे आरसे आहेत. या आरश्यांचे तापमान हे अतिशय थंड ठेवावे लागणार आहे. परंतु या सर्वांपेक्षा सुद्धा अवघड गोष्ट म्हणजे की या टेलिस्कोपला अवकाशात प्रक्षेपित करणे हे होय. कारण जेव्हा एखादे अवकाशयान त्यासाठी असलेल्या रॉकेटच्या माध्यमातून अंतराळात झेपावते तेव्हा प्रंचड प्रमाणत कंपने निर्माण होतात आणि या कंपनांमुळे या टेलिस्कोपला धक्का लागून त्याच्या आरश्यांना तडे जाऊ शकतात. या टेलिस्कोप च्या आरश्यांची एकूण रुंदी ही सुमारे २० मीटर इतकी आहे. तसेच सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करण्यासाठी साधारण एका टेनिसच्या आकाराच्या मैदानाएवढ्या आकाराचे पत्रे या टेलिस्कोप ला लावण्यात आलेले आहेत. या टेलिस्कोपचे कार्य हे आपल्या घरी असणाऱ्या टेलीव्हिजनच्या डिश प्रमाणेच चालते. फक्त या टेलिस्कोपमध्ये इतर किरणांच्या ऐवजी प्रकाशाच्या विविध किरणांच्या प्रकारांचा उपयोग करून एखाद्या खगोलीय वस्तूची प्रतिमा तयार केली जाते. या टेलिस्कोपमध्ये चार वेगवेगळे कॅमेरे आणि सेन्सर प्रणाली बसवण्यात आलेल्या असून या द्वारे प्रकाश किरणांचे विविध रूपात विश्लेषण केले जाऊ शकते.
एखाद्या आकाशगंगेकडून येणारे प्रकाश किरण अवकाशात प्रवास करत हजारो-लाखो किमीचा प्रवास करून जेव्हा या टेलिस्कोप च्या आरश्यांवर पडतील तेव्हा ते प्रकाशकिरण एकवटून एका विशिष्ठ बिंदूवर केंद्रित केले जातील. यानंतर वर नमूद केल्याप्रमाणे कॅमेरे आणि सेन्सर प्रणाली प्रकाशाच्या विविध भागांमध्ये याचे विभाजन करून त्यांचे विश्लेषण करण्यात येईल. या टेलिस्कोपच्या मदतीने पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरून विवध परग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करता येईल आणि कदाचित या टेलिस्कोपवर लावण्यात आलेल्या स्पेक्ट्रोमीटर च्या सहाय्याने या वातावरणातील घटक वायुंचासुद्धा अभ्यास करणे शक्य होईल.
 
महाविस्फोटानंतर तयार झालेल्या आकाशगंगा आणि तारे यांचा अभ्यास फारच कठीण आहे. याचे अतिशय सोपे कारण म्हणजे या आकाशगंगा आपल्यापासून , आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या प्रचंड अंतरावर आहेत. मात्र, या टेलिस्कोपच्या प्रक्षेपणामुळे वैज्ञानिकांना अशी आशा वाटते आहे की, कदाचित या सर्व विश्वाच्या निर्मितीच्या काळात तयार झालेल्या दीर्घिकांचा अभ्याससुद्धा या टेलिस्कोपच्या माध्यमातून करता येणे शक्य होईल, तसेच या टेलिस्कोप चे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे की, या विश्वाच्या परिघावरील आकाशगंगांचा अभ्यास करणे हे होय.
 
कधी तरी आपल्या वाचनात आलेच असेल की, हे विश्व सतत प्रसारण पावत आहे. त्यामुळेच अतिशय लांब असलेल्या दीर्घिकांकडून येणारे प्रकाश किरण हे प्रकाशाच्या दृश्य भागात न येता ते इन्फ्रारेड या वेव्हलेन्थमध्ये येतात. त्यामुळे या टेलिस्कोपला या भागातील येणारे किरण मिळवून त्यांच्या अभ्यास करायचा असेल तर, टेलिस्कोपचे स्वतः चे तापमान ही अतिशय कमी हवे. याचकरता सूर्याच्या उष्णतेपासून बचाव करणारी पाच आवरणे ज्यांचा आकार हा साधारण टेनिसच्या मैदनाएवढा आहे अशी आवरणे या टेलिस्कोप ला लावण्यात आलेली आहेत. या सुरक्षा कवचांमुळे या टेलिस्कोपचे तापमान हे कायम उणे ३९०अंश इतके राहील. हा टेलिस्कोप हा ओरिगामी टेलिस्कोप आहे म्हणजेच ओरिगामी या जपानी पद्धतीत ज्याप्रमाणे कागदाच्या घड्या घालून त्याचा आकार लहान केला जातो त्याचप्रमाणे हा टेलिस्कोप दुमडून , ज्या अवकाश रॉकेटच्या साह्याने तो प्रक्षेपित करण्यात येणार आहे त्यावर हा टेलिस्कोप ठेवण्यात येणार आहे. या टेलिस्कोपच्या निर्माणात अनेक वर्षे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे त्यामुळे एकदा आपल्या जागी पोहोचल्यानंतर हा टेलिस्कोप मानवासमोर विश्वाची अनेक कोडी उलगडेल हे मात्र निश्चित !
 
-अक्षय भिडे