तेहतीस वर्षांची बनवाबनवी

युवा विवेक    23-Sep-2021   
Total Views |
#तेहतीस_वर्षांची_बनवाबनवी
#मयूर_भावे

banawabanawi_1   
'धनजंय माने इथेच राहतात का?'
'सारखंसारखं त्याच झाडावर काय?'
'सत्तर रुपये वारले...'
'मॅडम तुम्हाला लिंबू कलरची साडी काय सुरेख दिसते हो.....'
'इंग्रजांच्या काळातील ट्यूब...'
अशा असंख्य इमोशन्सचा, रिलेशनचा, कनेक्शनचा आणि इंप्रेशनचा आज ३३ वा वाढदिवस. माझ्या पिढीने हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तो रविवार दुपारी सह्याद्री वाहिनीवर. दर रविवारी दुपारी चार वाजता मराठी चित्रपट पाहण्याचं प्रचंड कौतुक, अप्रूप आणि आनंद तेव्हा होता. त्यात लक्षा, अशोक सराफ, सचिन, सुप्रिया यांचे चित्रपट प्रचंड आवडायचे. ते वारंवार लागले तरी पाहिले जायचे. त्याची चिकित्सा, समीक्षा, रसग्रहण, चर्चा, परिसंवाद, वादविवाद, फेबुवर पोष्टी, वॉचिंग अमूकढमूक असे स्टेट्स अपडेट करणं हा प्रकार तेव्हा कोसो लांब होता. त्यामुळे जे दिसतंय ते तसंच्या तसं पाहणं आणि त्याचा निखळ आनंद घेणं हेच काय ते साध्यं असायचं.
अशा काळातला 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट! ३३ वर्षांत आणि विशेषत: गेल्या पाच वर्षांत या चित्रपटावर इतकं बोललं, लिहिलं आणि वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केलं गेलं आहे की... आता पुन्हा या चित्रपटावर काय लिहावं हा प्रश्न आहे. याचं उत्तर खरं म्हणजे 'काहीच नाही' असंच आता द्यावं लागेल. कारण अगदी 'मीम'पर्यंतदेखील हा चित्रपट जाऊन पोहोचला. 'हृदयी वसंत फुलताना..' हे गाणं डीजेवर आलं. वसंत सबनीसांच्या संवादाची जादू आजच्या तरुणाईवर अजून आहे. कॉफी मग आणि टी शर्टवरही धनंजय माने इथे राहतात का दिसतं... आजही एखाद्या मुलीला तिने लिंबू कलरची साडी घातली की चिडवलं जातं, गंमत केली जाते... त्याचं कनेक्शन कुठे तरी त्या संवादाशी जोडलं जातं. आणि हेच मला या चित्रपटाचं बलस्थान वाटतं...
हा चित्रपट तुम्हाला जोडत जातो. तुमच्यातल्या सामान्य माणसाची 'फर्स्ट रिॲक्शन', पहिली दादच या चित्रपटाने पूर्ण तीन तास टिपली आणि त्यामुळेच तो आजही अजरामर आहे. नाटकाचं, तमाशाचं वेड असलेला परश्या आजही आहे, त्याला आजही गाव सोडून पुणं-मुंबई गाठावंच लागतंय. इथे आल्यावर त्याला पाठिंबा देणारा आणि स्वत:चंच कसंबसं भागवणारा धनंजय मानेही आहे आणि अशा अनेकांच्या नशिबाला लागलेले घरमालकदेखील आहेतच. ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी धनंजयची धडपड, मॅडमला मारलेल्या थापा, शंतनूची तळमळ, त्यांना या नव्या शहरात अचानक भेटलेल्या लीलाबाई काळभोरांसारख्या 'मावशी' ही तुमच्या-माझ्यासारख्या गाव सोडून आलेल्या अनेक तरुणांचीच कथा आहे.
मित्रांमुळे मिळालेलं जगण्याचं बळ, ती बेफिकिरी, जगण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी, प्रेम, सेटल होण्याची धडपड, महानगरांमध्ये 'जागा' मिळवताना करावी लागणारी कसरत अशा अनेक गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या, त्या आजच्या तरूणाईलाही रिलेट होणाऱ्या आहेत, म्हणूनच आजही हा चित्रपट ताजा, टवटवीत आणि आपला वाटतो. सहज, सोप्या, विनोदी आणि तुमच्या-माझ्या भाषेत लिहिलेल्या संवादांमुळे मनावर या गोष्टी कोरल्या गेल्या; आपल्याशा झाल्या. ३३ काय पुढची किमान १०० वर्षे या समस्या कायम राहणार आहेत. मानवी स्वभाव तसेच राहणार आहेत आणि त्यामुळे हा सिनेमा कालबाह्य होणार नाही, विजोड वाटत नाही आणि वाटणारही नाही. या चित्रपटातल्या अभिनेत्यांचा संच प्रचंड तुफान होता. त्यात प्रत्येकाचं एक 'टायमिंग' होतं आणि सर्वांचं मिळून एक 'टायमिंग' होतं. त्यामुळे कोणाचाही कोणताही 'पंच' वाया गेला नाही.
अंगविक्षेप, डबल मीनिंग, भडक विनोद, शिवराळ भाषा आणि भसाभस प्रॉपर्टी वापरून चित्रपट तयार करण्याच्या काळात आजही बनवाबनवीचे सीन पाहणारे, फॉर्वड करतकरत अधूनमधून पूर्ण चित्रपट पाहणारे अनेक लोक आहेत. ते पुढेही असतील...
'ही दुनिया मायाजाल मनुजा, जाग जरा...' असं म्हणत असताना युद्धात आणि प्रेमात यात आता जागा मिळवण्यात सर्व काही माफ असतं....' हे वाक्य जितक्या ठामपणे म्हटलं गेलंय, तितक्याच ठामपणे हा चित्रपट आपल्या मनावर कोरला गेला आहे. आजच्या दिवशी त्या सर्व कलाकारांप्रति एक सामान्य रसिक प्रेक्षक म्हणून व्यक्त केलेली ही कृतज्ञता...!!
- मयूर भावे