आपले विचारविश्व

युवा विवेक    25-Sep-2021   
Total Views |

#दुमडलेल्यापानापाशीदोन

#आपले_विचारविश्व


aaple vicharvishwa_1  

हिरव्या रंगाच्या दोन छटांमध्ये विभागलेलं मुखपृष्ठ तुमचं लक्ष वेधून घेतं. वरचा अर्धा भाग हलका आणि खाली गडद हिरवा रंग. हे दोन्ही भाग विभागणारं एक मोठं वडाचं झाड. या झाडाचा वरचा भाग, त्याच्या पारंब्या हलक्या हिरव्या रंगाच्या भागात आहेत, तर मुळं खालच्या गडद भागात. जमिनीवर झाडाचा विस्तार किती झालाय? हे पटकन सांगता येतं, कारण तो दिसत असतो. मात्र, जमिनीखालचा विस्तार कसा सांगणार? म्हणूनच झाड कापणं सोपं आहे उखडून टाकण्यापेक्षा...!!

विचारांचंही अगदी असंच. या वटवृक्षासारखं.. कोणताही विचार, वाद, विचारसरणी आत किती खोलवर रुजलीय, हे सांगता येणं अवघड आहे आणि तिला मुळासकट नष्ट करणं त्याहून अधिक अवघड...! खरं म्हणजे, मुखपृष्ठाबाबत एवढं लिहिण्यामागचं कारण म्हणजे, या पुस्तकाचं नाव आहे आपले विचारविश्व...! विचारांचे विश्व..!

'क्रॅश कोर्स', 'ऑल इन वन' वगैरे असं या पुस्तकाला नक्की म्हणता येईल. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं, तर जगभरातील विविध तत्त्ववेत्ते, त्यांचे विचार, वेगवेगळे वाद, विचारसरणी यांची ही तोंडओळख आहे. अर्थात, मी तोंडओळख म्हणतोय, त्यामुळे विस्ताराची अपेक्षा करणं कदाचित भ्रमनिरास करणारं ठरू शकतं; पण तरीही ही पुस्तक वाचावं आणि आवर्जून वाचावं. कारण, जवळपास सर्व प्रमुख विचारसरणींची थोडक्यात मांडणी आपल्याला कळते आणि हे सर्व एकाच पुस्तकात उपलब्ध होतं. दुसरं असं, की शिरवाडकरांनी एवढा मोठा पसारा ३६४ पानांत मांडलाय. त्यामुळे हे काम म्हणजे...आकाशाचा अमर्याद विस्तार पाहून नंतर आपल्या खिडकीतून दिसणारं आकाशही तेच आहे. फक्त, एवढंच म्हणजे अंतिम नव्हे, अशी समजूत मोठ्यांनी लहानांनी काढावी, अशा भूमिकेतून केलेलं लिखाण आहे.

पुस्तकाची अनुक्रमणिका त्याचा मोठा आवाका दाखवते. पुस्तकाची मांडणी सहा भागात करण्यात आली आहे. पहिला भाग पूर्वेची प्रज्ञा असा आहे. ज्यात वेद, उपनिषदे, सांख्य विचार, न्याय-वैशषिक, पूर्व मीमांसा, अद्वैत, जैन आणि बुद्ध विचार वगैरे यांचा समावेश आहे. 'पश्चिमेचा विचारविकास' या दुसऱ्या भागात ग्रीक तत्त्वज्ञान, फ्रान्सिस बेकन, टॉमस हॉब्स, व्हॉल्टेअर आणि रुसो, कांट, नित्शे यांच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख आहे. 'वास्तवाचे वेध' या तिसऱ्या भागात मार्क्स, एमिल डरखाईम, जॉर्ज सिमेल, रसेल, फ्रॉइड वगैरे वगैरे यांच्या विचारांची मांडणी करण्यात आली आहे. चौथा भाग आपल्याला अधिक जवळचा वाटतो. कारण तो आहे 'आपला भारत'. यामध्ये भारतीय विचार, महात्मा बसवेश्वर, महानुभाव संप्रदाय, गुरू नानक, संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, चोखामेळा महाराज, समर्थ रामदास, संत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा मागोवा घेतला आहे. त्याचबरोबर राजा राममोहन रॉय, दयानंद सरस्वती, ज्योतिबा फुले, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, आगरकर, योगी अरविंद, महात्मा गांधी वगैरे यांचाही समावेश आहे. 'विज्ञान आणि धर्म' या पाचव्या भागात त्या स्वरूपातील मांडणी आहे. शेवटच्या आणि सहाव्या 'व्यक्ती आणि विचार' या भागात व्यक्ती आणि विश्व, व्यक्ति आणि समाज, व्यक्ती आणि मन यावर भाष्य केले आहे.

एक मात्र आवर्जून सांगेन, की हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवावं असं अजिबात नाही. दूध आटवून आटवून तयार केलेली ही घट्ट बासुंदी आहे. दिवसाला फार तर एक-दोन वाट्याच. त्यावर अपचन होऊ शकतं. विचार.... विचार... विचार... कशासाठी करायचो हो हा विचार? का समजून घ्यायचे हे विचार?? तर, आपले विचार समृद्ध होण्यासाठी. मी म्हणतो तेच बरोबर किंवा तेच चूक असं नसून, जगात प्रत्येक गोष्टीला पहिली पहिल्याची, दुसरी दुसऱ्याची आणि तिसरी सत्याची अशा तीन बाजू असतात, हे जाणून घेण्यासाठी.

प्रत्येक तत्त्ववेत्त्याला त्याची मांडणी उजवी वाटली आणि त्याने ती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यातून अनुयायी निर्माण झाले, अंधपणे मागे चालणारे भक्तांच्या झुंडीही निर्माण झाल्या. मात्र, तटस्थपणे अभ्यास आणि निर्लेप मांडणी करणं काहींनाच जमलं. कदाचित या अभ्यासाचा थोडा अंश आपण या पुस्तकातून मिळवू शकू.

कोणताही विचारप्रणेता, तत्त्ववेत्ता, त्याचे विचार जगाला देतो, तेव्हा तो काय म्हणतो? मला माहीत नाही! मात्र, मला एका विचारवंतांचं स्वत:कडे तटस्थपणे बघणं पटतं, ते मुद्दाम येथे या पुस्तकाच्या निमित्ताने देतो.. तो म्हणतो....

'वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करू द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन.

माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन.

माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!'

आणि हे सांगणारा तो तत्त्ववेत्ता, विचारवंत म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...!

- मयूर भावे