गुरूवरील वादळांचा वाढणारा वेग

युवा विवेक    29-Sep-2021   
Total Views |
गुरूवरील वादळांचा वाढणारा वेग

jupiter speed1_1 &nb
एखाद्या गाड्यांच्या शर्यतीत तेथील गोलाकार मार्गावर त्या वर्तुळाकार मार्गाच्या सर्वांत बाहेरच्या बाजूची गाडी ही इतर गाड्यांपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त अंतर कापत असते त्याचप्रमाणे गुरू ग्रहावरील वादळांचा वेगसुद्धा वादळाच्या बाहेरील बाजूस वाढताना आढळला आहे. हा शोध हबल अवकाशीय दुर्बिणीच्या साह्याने लावण्यात आला आहे. हबल अवकाशीय दुर्बीण गुरू ग्रहाचा अभ्यास हा गेल्या दशकाहून अधिक काळ करते आहे. गुरू ग्रहाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांना असे आढळून आले आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये गुरूवरील सर्वांत मोठे चक्रीवादळ ज्याला 'रेड जायंट स्पॉट' असेदेखील संबोधण्यात येते, त्या वादळाच्या बाहेरील भागाचा वेग हा २००९ ते २०२० या काळामध्ये सुमारे आठ टक्के वाढला आहे. या उलट या वादळाच्या केंद्रातील भागात वाहणाऱ्या वाऱ्याची गती अतिशय कमी आहे.
'रेड जायंट स्पॉट'मधील वाऱ्यांचा वेग ताशी हजार किमी इतका आहे; तसेच या वादळाच्या नुसत्या केंद्राचाच व्यास एखादी पृथ्वी त्यात सहज सामावू शकेल इतका आहे. गुरुवरील वादळ हे मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण गेल्या साधारण दीडशे वर्षांपासून मानवाने याचे निरीक्षण केलेले आहे. साधारण गेल्या दीडशे वर्षांपासूनच्या या वादळासंबंधीच्या नोंदी आपल्याकडे उपलब्ध आहेत.
आपण पृथ्वीवरील वादळांचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीच्या जवळील कक्षांमध्ये फिरणारे मानवनिर्मित उपग्रह वापरतो. या विविध उपग्रहांद्वारे गेल्या काही दशकांपासून आपल्याला पृथ्वीवरील वादळांची इत्यंभूत माहिती कळते; परंतु, आपल्याकडे गुरूजवळ अथवा गुरूच्या कक्षेमध्ये सतत फिरणारा असा एखादा उपग्रह नसल्याने गुरूवरील वादळांचा सतत अभ्यास करणे शक्य होत नाही. किंवा या गुरूवरील वादळांचा वेग कमी- जास्त होण्याचा अभ्यास करणेसुद्धा शक्य होत नाही. गुरूवरील अशा वादळांचा अभ्यास करण्याची क्षमता फक्त हबल अवकाशीय दुर्बिणीमध्येच आहे. त्यामुळे या दुर्बिणीचा वापर करून वैज्ञानिक गुरू ग्रहाचा आणि परिणामी गुरूच्या पृष्ठभागावरील वादळांचा जितका जास्त अभ्यास करता येईल तितका करत असतात.
खगोलशास्त्रज्ञ साधारण १८७५ पासून गुरू ग्रहाचा अभ्यास करीत आहेत. तसेच, गुरूवरील दिसणाऱ्या या सर्वांत मोठ्या वादळाचेसुद्धा ते निरीक्षण करत आहेत. या वादळाचा आकार एखाद्या केकच्या उभ्या आकारासारखा आहे. म्हणजेच वादळाच्या तळाशी मोठा भाग आणि वर पृष्ठभागाकडे हळू हळू निमुळता होत जाणारा भाग. वादळ हे गुरू ग्रहावरून अवकाशात उत्सर्जन होणाऱ्या वस्तूंचाच परिणाम आहे. या उत्सर्जनामुळेच ही वादळ तयार झाले असावे. या वादळाच्या निरीक्षणाच्या नोंदी या गेल्या ४०० वर्षांपासूनच्या आहेत. म्हणजेच या वादळाची उत्पत्तीसुद्धा सुमारे ४०० वर्षांपूर्वीची असावी.
गुरूवरील या वादळाप्रमाणेच वैज्ञानिकांनी हबल दुर्बिणीच्या साह्याने नेपच्यूनवरील वादळेदेखील अभ्यासली आहेत. नेपच्यूनवरील वादळे मात्र काही वर्षांत तयार होऊन नंतर काही वर्षांनी लोप पावणारी आहेत, असे वैज्ञानिकांना आढळले आहे. अशा विविध ग्रहांवरील वातावरणाचा अभ्यास करून तसेच, त्यावरील वादळांचा अभ्यास करून वैज्ञानिकांना फक्त ग्राहविषयीचीच माहिती मिळते असे नाही परंतु, ग्रहावरील या वादळांचे भौतिकशास्त्र समजून या वादळांना सुरू ठेवण्यासाठी उर्जा त्या ग्रहावरून कशी मिळते आणि या वादळांचा कार्यकारणभाव इत्यादी महत्त्वपूर्ण माहितीदेखील वैज्ञानिकांना प्राप्त होते. कुणास ठाऊक येत्या काळात नव्या जेम्स वेब अवकाशीय दुर्बिणीच्या साह्याने या वादळासंबंधी कोणती नवी रहस्ये उजेडात येतील.
 
-अक्षय भिडे