'दिसाड दिस' वाढत जाणाऱ्या दुःखाची गाथा

युवा विवेक    30-Sep-2021   
Total Views |

'दिसाड दिस' वाढत जाणाऱ्या दुःखाची गाथा


disad dis_1  H  

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर आजवर कितीतरी लघुपट, चित्रपट, कलाकृती येऊन गेल्या आहेत. या गंभीर विषयाची धार बोथट झालीये की काय, असं वाटावं, इतक्या वेळा हा विषय मांडला गेला आहे. मात्र त्यातल्या नेमक्या किती कलाकृती या विषयावर गंभीरपणे भाष्य करतात, तो प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवतात, ही मात्र विचार करण्याजोगी बाब आहे. या गर्दीत वेगळा उठून दिसणारा एक लघुपट नुकताच पाहण्यात आला. 'दिसाड दिस' हे त्या लघुपटाचं नाव. नागनाथ रामचंद्र खरात दिग्दर्शित हा लघुपट युट्यूबवर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील एक गाव. तिथल्या तीन शाळकरी मुलांच्या नजरेतून, गाण्यातून या गावातील नागरिकांच्या हालाखीच्या परिस्थितीचं दर्शन आपल्याला घडतं. लघुपटाची सुरुवातच एका ओसाड माळरानाच्या दृश्याने होते आणि अशोक, शीतल आणि अब्बास चालत येताना दिसतात. त्यांना विमानाचा आवाज ऐकू येतो. मंत्री विमानाने दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याची माहिती त्यातील एकजण पुरवतो. मग एवढ्या उंचावरून काय दिसत असेल, या प्रश्नावर ते दुर्बिणीने पाहत असतील, असं स्वतःचं समाधान करून घेत ते पुढे चालू लागतात. एका बाभळीच्या झुडुपाखाली ते थोडावेळ विश्रांतीसाठी थांबतात. पाणी पितानाही "थोडं थोडं पी, संपवू नको" असं सांगतात. धोंडीविषयी चर्चा करतात आणि पुढच्याच दृश्यात आपल्याला धोंडी दिसू लागते. पाऊस यावा, म्हणून धोंडी या पावसाच्या देवीला आवाहन करणारं गाणं म्हटलं जातं. दोन पुरुष कमरेला लिंबाचा पाला बांधलेले दिसतात आणि त्यांच्या अंगाला गुलाल फासला जातो.

नंतर पुन्हा अशोक आणि शीतल दिसतात. त्यांना रस्त्यात गुरं दिसतात. त्या गुरांची हाडं दिसत आहेत, इतकी ती अशक्त झाली आहेत. बाभळीच्या झाडाचा पाला तोडून अशोक आणि शीतल तो आपल्या बकरीसाठी नेतात. अब्बास आपल्या कुटुंबासोबत मुंबईला जात आहे पुन्हा कधीही गावी परतण्यासाठी, हे कळल्यावर मंदिराच्या पत्र्यावर वाळण्यासाठी ठेवलेल्या मातीच्या बैलजोडीतला एक बैल अशोक आणि शीतल त्याला देतात. यापुढे लघुपटात काय होतं, हे सांगणं म्हणजे लघुपटाची सगळी कथाच उलगडल्यासारखं होईल.

लघुपटाचा मध्यवर्ती विषय हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा असला, तरी चौदा मिनिटांच्या या लघुपटाचा आवाका तेवढ्यापुरता मर्यादित नाही. एवढ्या कमी वेळात दिग्दर्शक आपल्याला लहान मुलांच्या जगात घेऊन जातो. जिल्हा परिषदेच्या शाळेत घेऊन जातो. गावातल्या मंदिरात घेऊन जातो. एक झाडही जिथे दृष्टीला पडणार नाही, अशा उजाड माळरानावर घेऊन जातो. वीजटंचाई असणाऱ्या घरांत घेऊन जातो. तो गावातल्या प्रश्नांवर भाष्य करतो, पण ते करत असताना कथेच्या केंद्रस्थानी शाळकरी मुलं आहेत, याचा विसर पडू देत नाही. शाळेत जावंसं वाटत नाही, घरी जावंसं वाटत नाही, दिसाआड दिस नुसतं रितं रितं वाटतंय, असं शाळकरी मुलांना वाटणं, ही धोक्याची घंटा आहे, याची तो आपल्याला जाणीव करून देतो. दृश्यमाध्यमाचा योग्य वापर कसा करावा, याचं हा लघुपट म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. त्या गावातला रखरखाट, सगळीकडे भरून राहिलेली एक उदासी लघुपटाच्या पहिल्या चित्रचौकटीपासून आपल्याला जाणवत राहते, अस्वस्थ करत राहते.

अब्बासचं गाव सोडून जातानाचं रडणं पाहून पोटात कालवाकालव होते. मन बालपणीच्या आठवणींत गुंतून पडतं. विशेषतः या प्रसंगातला अनुभव तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधीतरी घेतलेला असतोच. आपल्या प्रिय बालमित्रांना सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा. एकीकडे हे लहान मुलांचं जग. तर दुसरीकडे केवळ एकाच प्रसंगातून अशोकच्या आईवडिलांची अगतिकता दिसते.

"शहरात जाऊन भीक मागावी, पण इथे शेती करू नये", हे अशोकच्या वडिलांचं वाक्य त्यांच्या मनात धुमसत असलेला राग नेमका व्यक्त करून जातं. अब्बासचं कुटुंब मुंबईला जात असताना निरोप देणारे शेजारीपाजारी सहज "आठवण ठेवा" म्हणतात, त्यात किती आपलेपणा आणि नितळ प्रेमाची भावना आहे, ते सहज दिसतं. वर्गात परिपाठ चालू असताना वाचल्या जाणाऱ्या ठळक घडामोडी आणि घडलेली घटना यांतला विरोधाभास टोकाचा आहे. आपल्या विकासाच्या व्याख्या पुन्हा तपासून पाहायला लावणारा आहे.

'जागतिकीकरणाच्या युगात दुष्काळ सरकारी अनावस्थेमुळे बेचिराख आणि उद्ध्वस्त झालेल्या लाखो भारतीय शेतकरी कुटुंबांना...' ही लघुपटाच्या शेवटी बाभळीच्या झाडाच्या पार्श्वभूमीवर दिसणारी पाटी अनेक प्रश्न मनात सोडून जाणारी आहे. शितल मोटे, दिपक वायदंडे, महादेव खरात या बालकलाकारांचा नैसर्गिक अभिनय दाद देण्याजोगा आहे. लघुपटाच्या दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा, संवाद, छायांकन, ध्वनी संरचना अशा जवळपास सर्वच जबाबदाऱ्या नागनाथ खरात यांनी उचलल्या आहेत आणि त्या समर्थपणे निभावल्याही आहेत. त्यात त्यांना योगेश हरी जाधव यांची छायांकन, संकलन आणि ध्वनी संरचनेसाठी साथ मिळाली आहे. या लघुपटाच्या कथा, पटकथा आणि संवादांचं कौतुक अशासाठी की त्यात कुठेही क्लिष्टता नाही. अतिशय साधीसोपी, परंतु एका ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारी कथा फार मोजक्या आणि साध्या संवादांसह इथे मांडली आहे. हा संपूर्ण लघुपट मोबाईलवर शूट केलेला आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. इच्छा असेल तर मोजक्या संसाधनांसहसुद्धा उत्कृष्ट निर्मिती करता येऊ शकते, हे नागनाथ खरात यांनी या लघुपटातून दाखवून दिलं आहे. बारकाईने पाहिल्यास हे जाणवतं की धोंडी गीताव्यतिरिक्त कुठेही पार्श्वसंगीताचा वापर केलेला नाही. तरीही लघुपटाचा प्रभाव जराही उणावत नाही.

ग्रामओवी फिल्म्सच्या या लघुपटाला बोस्निया -हर्जेगोविना येथील विवा फिल्म फेस्टिवल २०१७ मध्ये 'गोल्डन बटरफ्लाय' पुरस्कार मिळाला होता. दृश्य माध्यमाची खरी ताकद या गोष्टीत आहे की, काही मिनिटांत जे जग आपलं नाही, तिथे आपला हात अलगद धरून नेत त्या जगाची सफर चांगला दिग्दर्शक आपल्याला घडवून आणतो आणि आपलं आयुष्य कायमचं बदलून टाकतो. माणसांचे लोंढे शहरांकडे येतात आणि शहरं गलिच्छ करतात, असा एक सूर जो नेहमी ऐकू येतो, त्यामागची कारणं ही अशी वाक्यं फेकून टाळ्या मिळवणाऱ्या अनेकांना हा लघुपट समोर आरसा धरल्याप्रमाणे दाखवून देतो आणि त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. म्हणूनच नागनाथ खरात यांच्यासारख्या दिग्दर्शकांची आपल्याला नितांत गरज आहे.

- संदेश कुडतरकर.