पोलिओला हरवणाऱ्या सुवर्ण पदकाची गोष्ट

युवा विवेक    06-Sep-2021   
Total Views |

पोलिओला हरवणाऱ्या सुवर्ण पदकाची गोष्ट... विनीत वर्तक ©
pramod bhagat_1 &nbs

२७ मार्च २०१४ चा दिवस होता जेव्हा वर्ल्ड हेल्थ फाउंडेशनने भारताला पोलिओमुक्त झाल्याचा दर्जा दिला. तब्बल दोन दशकांच्या प्रयासानंतर भारताने पोलिओ रोगाला भारतातून हद्दपार केलं होतं, पण या काळात पोलिओ व्हायरसने भारतातील अनेक मुलांना आपल्या विळख्याने व्यंगत्व आणलं होतं. याच पोलिओच्या विळख्यात ओरिसामधला एक पाच वर्षांचा मुलगा सापडला. डॉक्टरांनी त्याला पोलिओ झाल्याचं निदान केलं आणि त्याच्या आई-वडिलांना एक निर्णय घेण्याची कठीण जबाबदारी दिली. आयुष्यात आपल्या शरीराशी निगडित खूप कमी गोष्टी असतात, ज्यांच्याबद्दल आपल्याला निर्णय घेण्याची वेळ येते. जेव्हा ती येते तेव्हा तो क्षण आयुष्यातील सगळ्यांत कठीण क्षणांपैकी एक असतो. त्या मुलाच्या आई-वडिलांना त्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं, त्या मुलाचे हात किंवा पाय यापैकी काय वाचवू? असं डॉक्टरांनी विचारलं, त्याच्या वडिलांनी मुलाचे हात वाचवा असं डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी त्या मुलाचे हात तर वाचवले पण पोलिओ त्याच्या डाव्या पायाला अधू करून गेला.

एका ५ वर्षांच्या मुलाच्या भविष्यावर एक न सुटणारं ग्रहण लागलं. त्या मुलाला लहान वयात कळलं की, आपल्याला आलेलं व्यंगत्व आपल्याला स्वीकारून आयुष्य जगायचं आहे. त्याने त्या व्यंगत्वाला आपलं शक्तीस्थान बनवलं. व्यंगत्वावर त्याने मात तर केलीच पण त्याच्या वडिलांनी वाचवलेल्या त्याच डाव्या हाताचा उपयोग करून त्याने इतकी उंची गाठली की साक्षात पोलिओला त्याने दाखवून दिलं की, माझ्या पायात जरी तू व्यंगत्व आणलं तरी त्या वाचलेल्या हाताने मी ४ सप्टेंबर २०२१ ला इतिहास रचला. हा प्रवास आहे पोलिओला हरवत जगात नंबर १ चा पॅराबॅडमिंटनपटू असलेल्या आणि भारताला २०२० च्या टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळात पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या 'प्रमोद भगत' याचा.

लहानपणापासून प्रमोदला बॅडमिंटन खेळ आवडत होता. आपल्या घराच्या बाहेर खेळणाऱ्या मुलांना तो बघत बसायचा. पोलिओने त्याचा डावा पाय अधू केला असला तरी त्याच्या मनातून बॅडमिंटन खेळ गेला नव्हता. आपल्या व्यंगत्वाला आपलं हत्यार बनवतं प्रमोद बॅडमिंटन खेळू लागला. आवडीचं रूपांतर व्यावसायिक झालं. प्रमोद रोज तासनतास बॅडमिंटन खेळाचे धडे गिरवू लागला. त्याने शरीराने धडधाकट असणाऱ्या मुलांसोबत बॅडमिंटनच्या स्पर्धेत भाग घ्यायला सुरूवात केली. राज्य पातळीवर प्रमोद भगतने आपल्या खेळाची चुणूक दाखवली. तिकडून प्रमोदने आपलं लक्ष्य पॅरा खेळांकडे वळवलं आणि त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. तिकडून सुरू झालेला त्याच्या यशाचा आलेख चढताच राहिला. प्रमोद पॅराबॅडमिंटन स्पर्धेत जागतिक पातळीवर ३ वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. बॅडमिंटन खेळातील त्याचं सातत्य आणि जिद्द इतकी होती की पुरस्कारांचा पाऊस एकामागोमाग एक पडत राहिला. २०२० साली टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत याच वर्षी एस. एल. ३ या प्रकाराच्या बॅडमिंटन या खेळाचा प्रवेश केला जाणार होता. भारत सरकारच्या Sports Authority of India ने देशातील विविध खेळाडूंना निवडून ज्यांच्यात ऑलिम्पिक मेडल जिंकण्याची क्षमता आहे त्यांच्यावर Target Olympic Podium Scheme (TOPS) या कार्यक्रमाअंतर्गत अजून लक्ष द्यायला सुरूवात केली होती. ज्यात प्रमोद भगतचा समावेश होता. आपल्यावर देशाने ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करत प्रमोदने पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली.

प्रमोद भगतचा हा प्रवास सोप्पा नव्हता. अनेक अडचणींतून त्याने मार्ग काढला. ज्या वडिलांनी आयुष्यातला एक कठोर निर्णय घेऊन प्रमोदचे हात वाचवले होते, तेच वडील त्याच्यासाठी रोल मॉडेल ठरले. प्रमोदच्या प्रत्येक इच्छेला त्यांनी आत्मविश्वासाचे पंख दिले. त्यामुळेच प्रमोद आज इतिहास रचू शकलेला आहे. कोणताही खेळ म्हटला की हार-जीत ही येतेच आणि त्याहीपेक्षा महत्वाचा असतो तो खेळाडूचा शारिरीक आणि मानसिक फिटनेस. कोणत्याही खेळाडूचे कोच आणि त्याचं कुटुंब या बाबतीत महत्वाची भूमिका बजावते. प्रमोदला झालेल्या शारिरीक दुखापतीमुळे त्याच्या करियरवर काळे ढग जमा झाले होते. प्रमोद स्वतः यामुळे निराशेच्या गर्तेत लोटला गेला होता. पुन्हा आपण कधी बॅडमिंटनची रॅकेट हातात धरू की नाही अशी शंका वाटत असतात त्याचे कोच गौरव खन्ना यांनी त्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं. त्याची अपयशातून यशाकडे घेतलेली ही उडी इतकी निर्णायक होती की २०२१ या वर्षात प्रमोद अजिंक्य राहिलेला आहे. जगातील क्रमांक १ चा खेळाडू म्हणून त्याने स्पर्धेत भाग घेतला आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेचं सुवर्ण पदक जिंकूनच तो तिकडून बाहेर पडला आहे. प्रमोद स्पर्धेआधी म्हणाला होता,

Olympics is the dream of every athlete and mine as well. I want to make my country proud by crediting medals through my historical performances at the biggest sports stage-Olympics.

आपले शब्द त्याने तंतोतत खरे करून दाखवले आहेत. या यशात त्याची मेहनत, जिद्द, चिकाटी तर आहेच पण त्यासोबत कोच गौरव खन्ना आणि भारताच्या Paralympic Committee of India (PCI) चा खूप मोठा सहभाग आहे. ज्यांनी प्रमोद सारख्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार केलं. प्रमोद भगतने स्वतः म्हटलं होतं,

To participate in international stages such as the Olympics is not a cup of tea nowadays as the competition is on the verge but one should go with the aim to win and not just to participate.

आज प्रमोद भगतने पोलिओला हरवत पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करत एक इतिहास रचला आहे. त्याचे वडील जिथे कुठे असतील तिथे त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयाचा आज अभिमान असेल. त्यांच्या मुलाने आज पोलिओला हरवून संपूर्ण देशापुढे असं एक उदाहरण ठेवलं आहे, जे अनेक खेळाडूंना आपलं सर्वोत्तम देण्यासाठी प्रोत्साहित तर करेलच पण त्यापलीकडे प्रत्येक आयुष्यातील अश्या कठीण निर्णयांचा सामना करण्यासाठी हिंमत देईल.

प्रमोद भगतचं त्याच्या यशासाठी खूप खूप अभिनंदन. त्याच्या जिद्दीला माझा कडक सॅल्यूट आणि पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल