लेखकू

युवा विवेक    07-Sep-2021   
Total Views |

लेखकू
writer_1  H x W

कधीकधी खरंच प्रश्न पडतो, आपण का भेटतो? कोण ठरवतं की आपण या वेळी, या इथे, असे असे भेटणार आहोत आणि त्यापुढे किंवा त्याआधी या विशिष्ट गोष्टी घडणार आहेत.... कोणी ठरवलं हे?

खरं सांगू का, मला नेहमी वाटतं की लेखक हे बिरूदच खूप विचित्र असतं..... गायकाला विचारतात, कोणाकडे शिकलायस, तो चटकन घराणं सांगतो, नृत्य कलाकारांना विचारतात, कोणता नृत्यप्रकार? मग ते कथक, भरतनाट्यम किंवा अजून कुठला प्रकार शिकलेला असतील त्याचं नाव सांगतात, एवढं कशाला, अगदी चित्रकारांनाही विचारतात, लैंडस्केप्स की पोर्ट्रेट्स? मग तो त्याची स्पेशल गोष्ट सांगतो....

मी लेखक आहे हे कळल्यावर मला दोन प्रश्न हमखास विचारले जातात... पहिला, काय लिहिता, ज्यामध्ये कादंबरी, नाटकापासून ते जाहिरातींपर्यन्त सगळं येतं आणि दुसरा, बाकी काय करता?? मजा वाटते मला यासगळ्याची.... आणि मग प्रश्न पडतो की आपण खरंच लेखक आहोत की लेखनिक??

लेखन काय किंवा कोणतीही कला काय, त्याचे मूलस्त्रोत कायमच अनाकलनीय असतात. देव म्हणून काहीतरी असतं, हे मानणारे त्याला दैवी म्हणतात, इतर लोक कष्ट आणि बौद्धिक किंवा मानसिक सामर्थ्याचा हवाला देऊन माणसाचाच उदोउदो करण्यात रमतात.

निर्मिती ही प्रक्रिया या सगळ्याच्या खूप पलीकडची असते. निर्मिती ही निर्माता आणि निर्मात्याचा निर्माता यादोघांच्या एकतानतेतून घडणारी गोष्ट असते, असा माझा तरी अनुभव आहे. ही एकतानता मी माझ्या निर्मितीमध्ये खूप अनुभवलीय.....

आणि कळलंच नाही कधी, पण तीच एकतानता मला बोटाला धरून निर्मात्याकडे घेउन जातानाही दिसते. एखादी गोष्ट लिहिताना त्यातली पात्र कशी असतील, कुठे भेटतील,काय बोलतील, हे अचूक ठरलेलं असतं. तो ठराव माझ्यापर्यंत म्हणजेच माध्यमापर्यंत पोहोचण्याची वेळही ठरलेली असते. माझ्यापर्यंत पोचल्यावर त्याला मूर्तस्वरुप मिळतं आणि मला उगीचच निर्मात्याची पदवी....

आणि हा सगळा विचार करुनच मला प्रश्न पडतो की असं सगळं जर असेल तर मग आपली गोष्ट कोण लिहितंय? आपल्या कथेचा निर्माता कोण, आपल्या कहाणीचा लेखक उर्फ़ माध्यम कुठे आहे? कोणी ठरवलं की, आपण या वेळी, या इथे, असे असे भेटणार आणि त्यापुढे किंवा त्याआधी या विशिष्ट गोष्टी घडणार.... कोणी ठरवलं? एकदा भेटायचंय त्याला.... खूप कडकडून भेटायचंय..... तो जो कोणी असेल.... आजचा नमस्कार त्याला......

- अक्षय संत