स्वराशा

युवा विवेक    11-Jan-2022   
Total Views |
स्वराशा

asha bhosale 
आशा भोसले! गेल्या बहात्तर वर्षांच्या स्वरयात्रेच्या त्या नुसत्या साक्षीदारच नाही, तर दावेदारसुद्धा आहेत. या इतक्या वर्षांच्या प्रवासात काय मिळवलं, काय गमावलं, हे असले विचार कधी शिवलेच नसतील का त्यांच्या सुरांना??
 
प्रत्येक कलाकाराला त्याचं म्हणून एक कोणत्याही तुलनेशिवायचं सार्वभौमत्व हवंच असतं ना! आशाताईंच्या बाबतीत तुलना होती, ती साक्षात हिमालयाशी! कोरसमध्ये गाताना ढोपरानं बाजूला ढकलणाऱ्या आणि 'प्रतिलता' होण्यासाठी धडपडणाऱ्या गायिकांची..... वडिलांच्या नावाची पुण्याई किती काळ कामाला येणार? काळ बदलत होता, 'शूरा मी वंदिले' किंवा 'शतजन्म शोधिताना'च्या रात्रींचे उसासते धूप आपला गंध केव्हाच गमावून बसले होते. हलत्या चित्रांच्या मुक्या देखाव्यानं सूर पकडला होता आणि सैगल, अशोककुमार, देविकाराणी यांचा स्वतःची गाणी स्वतःच गायचा जमाना मागे पडून पडदयावर नुसते ओठ हलवले तरी चालतात, या संकल्पनेचा काळ आला..... मंगेशकर भगिनींचा उदय याच काळातला..... त्यांची अनेक गाणी पडद्यावर पाहताना 'यांच्यापेक्षा गाण्याचा रेकॉर्डिंगचा व्हिडिओ असता तरी चाललं असतं....' इतक्या ठोकळ्या चित्रणापासून विजय आनंद, गुरुदत्त, राज कपूर यांच्यासारख्या तुफान सॉंगमास्टर्सपर्यंत अनेकांचं प्रचंड काँट्रिब्युशन असल्याचं हमखास दिसतं. आशाताईंना सुरुवातीला कॅब्रे डान्सच्या किंवा सहनायिकेच्या गाण्यांवरच समाधान मानावं लागलं, कारण अर्थातच समोर लता मंगेशकर नावाचा अचल गौरीशंकर उभा होता. 'इक लता गाती है, बाकी सब रोती है' इथपासून 'हम सिर्फ लता से गाना गवाते है' इथपर्यंतच्या संगीतातल्या महारथींच्या प्रतिक्रिया, लता मंगेशकर नावाच्या फिनॉमिनाच्या वर्णनासाठी पुरेशा आहेत. तेवढंच नाही तर लतादीदी सोडल्यास गीता दत्त आणि शमशाद बेगम या अचाट ताकदीच्या आणि रेंजच्या गायिकाही रिंगणात होत्या. या सगळ्यातून जाऊनच आशाताईंना स्वतःला सिद्ध करायचं होतं.
 
पण त्या 'आशा भोसले' होत्या..... बेधडक, फटकळ आणि तितकीच हळव्या आणि सच्च्या! ओ.पी.नय्यर आणि आशा भोसले यांची जोडी जमली, लतादीदींशी अबोला असण्याच्या सहा वर्षांच्या काळात एस.डी.बर्मन यांनी आशाताईंकडे मोर्चा वळवला आणि अर्थातच त्यानंतर पंचमदा उर्फ आर.डी. बर्मननं आशाताईंच्या आवाजात एक वेगळाच रंग भरला. पंचमदा गेल्यावर आता कोण, हा प्रश्नच उरला नाही, कारण साठीच्या आशाताईंचे सूर तेव्हा विशीत असलेल्या उर्मिला मातोंडकरच्या तालावर थिरकू लागले. इंडी पॉपच्या नव्या जमान्यात अदनान सामीपासून ब्रेट लीपर्यंत अनेकांच्या सुरांत सूर मिसळून आशाताई गायल्या. अगदीच ऐंशीच्या उमरीच्या मजरुह सुलतानपुरीसाहेबांचा उत्फुल्ल बहर त्यांनी 'जानम समझा करो' सारख्या अल्बममधून पुन्हा अनुभवायला लावला.
 
आशाताई नक्की कशी आहेत? त्यांच्या कलाकारीच्या रेंजबद्दल कित्येकांनी आपल्या लेखण्या तुटेपर्यंत झिजवल्यात, पण त्यापलीकडे जाऊनही आशा भोसले नावाचं सतरंगी चेटूक उलगडायचं म्हणजे त्यांच्या सुराइतकंच नितळ, निखळ व्हायला लागतं.
 
आशा भोसले! ओ.पी.नय्यरसाहेबांच्या चालींवर डल्ला मारून त्याच आशाताईंना शिकवणाऱ्या एका संगीतकाराला तोंडावर 'आता ओपीची गाणी कशी गायची, हे तू मला शिकवणार??' हे ऐकवणाऱ्या, किशोरकुमारच्या चेष्टेने भांबावून जाणाऱ्या, पण त्याच्याबरोबर बिनधास्त यॉर्डलिंग करत दंगा करणाऱ्या, शिरीष कणेकरांच्या पुस्तक प्रकाशनाला प्रमुख पाहुण्या म्हणून जाऊन त्यांनाच 'बहुदा तुम्हाला मी आवडत नसावे कारण तुम्हीच तुमच्या कार्यक्रमात नेहमी म्हणता, आयुर्विमा, सुनील गावसकर, लता मंगेशकर आणि गाजर का हलवा यांना पर्याय नाही', असं रोखठोक सांगून येणाऱ्या किंवा समोर पडलेला कवितेचा कागद उचलून सहज गुणगुणायला लागलेल्या आणि त्यातून घडलेलं 'मेरा कुछ सामान' नावाचं अद्वितीय शिल्प समर्थपणे साकार करणाऱ्या..... 'उमराव जान' ची गाणी ऐकल्यानंतर लेखक दिग्दर्शक कमाल अमरोही त्यांना म्हणाले होते, 'मुझे पता नहीं था, आप इतना अच्छा गाती हो.....' यावर 'म्हणजे? उमराव जान आलाच नसता तर हे राष्ट्रीय गुपित त्यांना कधीच कळलं नसतं की काय???' अशी खोचक, पण मार्मिक टिपणी करणाऱ्या, बाली बेटावर चांदण्या रात्रीचं आभाळ मनभर साठवून घेताना 'आकाश तारकांचे उचलून रात्र गेली' ही ओळ कविराजांना खिडकीतून आकाश पाहताना सुचली असेल का? कारण ते दृश्य मी आत्ता याइथं बघतीय' असं मनस्वीपणे म्हणणाऱ्या, एका नाजूक क्षणात 'मी आयुष्यभर ऑल्सो रॅनच राहिले का?' ही जन्मभरीची खंत अलगद व्यक्त करणाऱ्या आणि पुन्हा एकदा मैफिलीत शरीक होऊन आजच्या लकी अलीला 'मी तुझ्या आजोबांबरोबर गायलीय, तुझ्या वडिलांबरोबर गायलीय, आता तुझ्याबरोबर गाते....' असं म्हणत त्याच्यासोबत भर स्टेजवर 'इक पल का जीना' गाणाऱ्या आणि सगळ्यात विशेष म्हणजे वयाच्या सत्तरीत त्या गाण्याची सिग्नेचर स्टेप करून दाखवणाऱ्या, एखाद्या आरशांनी भरलेल्या खोलीत उमटावीत, तशी आशाताईंची डोळ्यांवर आणि मनावर उमटलेली अशी अनेक प्रतिबिंबं.
 
आशा भोसले म्हणजे नक्की कोण?? आशा भोसले म्हणजे पाणी, जो रंग भराल तो आपलासा करत वाहणारी रुणझुणती नदी! नदीच्या पाण्याचं आणि आशाताईच्या गाण्याचं वय विचारायचं नसतं. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनात 'चुनरिया' या चित्रपटात आशा भोसलेंनी आपलं पहिलं गीत गायलं, त्याला आता जवळपास बहात्तरपेक्षा जास्त वर्षं उलटून गेली. तिथपासून सुरू झालेला हा नदीचा प्रवाह अनेक घाट फिरून आत्ताच्या 'सांड की आंख'पर्यंत येऊन पोहोचलाय..... किती वळणं, किती सुखदुःखांचे क्षण आणि मानापमानांचे कढ पचवलेत या नदीनं. वाहत्या नदीला आपल्यासोबत काय वाहून न्यायचं, याचा चॉईस नसतो, जे आहे त्याचा स्वीकार करून पुढं वाहत राहायचं असतं. आशाताईंनी अनेकदा मुख्य प्रवाहाविरुद्ध बंडखोरी केली. पंचमदांबरोबर त्यांनी आपल्या गळ्याला अफाट फिरकवलं, थिरकवलं; पण काळासोबत बदलत जाताना बदलत्या काळाला मात्र स्वतःच्या सुरांवर डाग लावू दिला नाही.... गंगोत्रीतून उपजणाऱ्या प्रवाहाइतकाच तो सूर आणि त्यातली प्रत्येक तान वर्षानुवर्षं तितकीच कोवळी आणि कळीदार राहिली..... आपल्या बाबांचा म्हणजेच मास्टर दीनानाथांचा खडा स्वर आणि बहिणीचा नाजूक साज यांच्या बरोबर मधली वाट त्या स्वरानं पकडली आणि बघताबघता त्या झऱ्याचा कधी प्रवाह बनला, कळलंही नाही.
 
मास्टर दीनानाथ आपल्या या लाडक्या लेकीला प्रेमानं 'हबं' म्हणायचे.... हबं म्हणजे खुळं. मोठी बहीण पहाटे उठून रियाझ करायची तेव्हा हे हबं साखरझोपेत तरी असायचं किंवा माईच्या हातून सायीचं दही खात असायचं. बाबा गेले, पण माईंनी मात्र आपल्या लेकरांना एकच गोष्ट सांगितली, 'तुमचे बाबा तुमच्याकडे कायम बघतायत, तुम्ही महाराण्या आहात आणि तुम्ही काहीही झालं, तरी महाराण्याच राहणार.'
 
आजही त्या रेकॉर्डिंगला बाहेर पडतात, तेव्हा न चुकता बाबांच्या फोटोला नमस्कार करतात. घरी आल्यागेल्याचं प्रेमानं स्वागत करतात आणि वयाच्या पंच्याऐंशीपारही परदेश दौरे गाजवतात, कसं जमतं?? काही नाही, त्या 'आशा भोसले' आहेत..... गंज तंबोऱ्याच्या तारांवर चढतो, गळ्यातल्या सच्च्या सुरांवर नाही, हे त्यांनी फार पूर्वीच ओळखलंय..... म्हणूनच आज त्या अनेक नावांनी ओळखली जातात. गुलजारांची माया, पंचमदांची मोनिका, हृदयनाथांची निळावंती, रहेमानची राधा आणि आपल्या आशाताई ! ही रात्र अशीच तरुण राहो!
 
- अक्षय संत