पृथ्वीचं रीपेअरिंग....

युवा विवेक    25-Jan-2022   
Total Views |

पृथ्वीचं रीपेअरिंग....


earth 

गेल्या वर्ष दीड वर्षात एका छोट्याशा व्हायरसनं आपल्या आयुष्यात थैमान घातलेलं आहे. कधी विचारही केला नव्हता, इतके विचित्र आणि न भूतो न भविष्यति असे बदल या न दिसणाऱ्या पाहुण्यानं लीलया करून दाखवले.

 

तोपर्यंत, पूर्वी भारत पाकिस्तान मॅचेसच्या वेळी, टीव्हीवर रामायण महाभारत लागायचं तेव्हा, बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हा आणि अगदी लेटेस्ट सांगायचं तर भीमा कोरेगावनंतर, अशा अगदी क्वचितप्रसंगी पुणे थांबलेलं पाहिल्याचं आठवतंय.... एरवी रोज पुण्याच्या ट्रॅफिकमधून प्राण कंठाशी आणि काळ देहाशी घेऊन फिरताना जे वाटतं ते लॉकडाऊन नावाच्या भयानक काळात प्रत्यक्षात दिसल्यावर मात्र गांगरल्यासारखं झालं. संध्याकाळी रात्री एक - दीड वाजता असतो तसा भयाण शुकशुकाट पाहून धडकी भरायची, सारं कसं शांत शांत!आणि हे फक्त पुण्यामुंबईत नाही तर पूर्ण देशात होतं..... शहरं लॉकडाऊन झाली, देश बंद पडले, सगळी पृथ्वी रिपेअरला दिल्यासारखी वाटत होती....

 

इतकी शांतता पाहताना एका विचारानं मात्र अस्वस्थ झाल्यासारखं वाटायचं, असं वाटायचं, ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना.... नाही नाही, कोरोनाचं वादळ नाही.... शहरातली दुकानं बंद, व्यवहार ठप्प, माणसं एकमेकांना भेटायला काय, पाहायलाही घाबरलेली किंवा एकूणच जीव वाचवण्याच्या प्रयत्नात जे काही योग्य असेल ते करण्यात गुंतलेली..... शहराच्या तळाशी असलेला व्यवहाराचा कालिया तेव्हाच्या शांततेत खूपच प्रकर्षानं दिसला; पण ही शांतता गरजेची होती, हे पण तितकंच खरं! या वेळाचा उपयोग अनेकांनी अनेक पद्धतींनी केला. खूप जणांनी आज आपण घरी काय करतोय, कुटुंबाला कसा वेळ देतोय, वाचन/टीव्ही/वेबसिरीज इत्यादींमध्ये कसं मन रमवतोय, याचे अनेक फोटोज, व्हिडीओज सोशल मीडियावर अपलोड केले.... आपण सगळेच आलेल्या संकटाला आपापल्या परीने तोंड द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो, पण या सगळ्यात प्रश्न पडला, जो आत्ताही अनेकदा पडतो.... पुढं काय? आता आपण कड्याच्या टोकावर उभे आहोत.... एक पाऊल चुकलं तर, समोर अक्राळविक्राळ दरी आहे..... एक विषाणू आपल्याला किती आणि कसा नाचवतोय, याचा अनुभव आपण सगळ्यांनी तेव्हा घेतला, अजूनही घेतोच आहोत.... या निमित्तानं या सगळ्या गाड्याला रिपेअरिंगची केवढी गरज आहे, हे आपल्याला जाणवली असेलच.

 

लॉकडाऊन लागतोय, पुन्हा सगळं सुरू होतंय.... लॉकडाऊन जाहीर झाला की, आपण पुन्हा घरी बसतो, सिस्टीमवर, कोरोनावर चर्चा करतो, कसं ना कसं मन रमवतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आणि आपल्या जवळच्या माणसांची काळजी घेतो, पण हे सगळं फक्त लॉकडाऊन लागलाय म्हणूनच करतोय का आपण? फाईट फॉर सर्व्हायव्हल या जाणिवेचा अनुभव सगळ्या पृथ्वीनं गेली जवळजवळ दोन वर्षं घेतलेला आहे.

 

ही जाणिव फक्त तेवढ्यापुरती राहणार का? या संकटावर मात करून आपण कधी ना कधी पुढं जाऊच, पण तेव्हाही आपण हेच करणार का पुन्हा? पुन्हा एकदा काहीच न झाल्यासारखं तेच आणि तसंच चालू होणार, पुन्हा पुन्हा ती भीती, ते दडपण अनुभवत राहणार की या काळात आपण काही तरी वेगळा विचार करणार आहोत? आताचं आता, पुढचं पुढं, इथं जीव जायची पाळी आलीय अन हे काय पुराण लावलंय, असंही वाटत असेल तुम्हाला, पण आताच हा विचार करणं खरंच गरजेचं नाहीये का हो?

 

तेव्हाची एकूण परिस्थिती पाहून वाटत होतं, सगळंच कोसळून पडणार की काय! शहरांमध्ये रस्ते ओस पडले होते, गावाकडे मालाला उचल नव्हती, व्यापार बसला होता, अर्थव्यवस्था मागे पडली होती आणि हे सगळं पुन्हा सावरावं लागणार होतं आणि आपल्यालाच सावरावं लागणार होतं. एकूणातच आपण दोन पावलं मागे गेलो होतो, पण त्यातूनही तीन पावलं पुढं येताना हा धक्का विसरला जाणार नाही, याची काळजी आपण घेतली का? तेव्हा घेतली नसेल तर निदान आता तरी घेऊ शकतो का? की, पुन्हा पुन्हा आपण त्याच तिकिटावर तोच खेळ खेळत राहणार आहोत??

 

आताही आपण गाफील राहिलो, तर शहरीकरणाचा आणि हव्यासाचा हा भस्मासुर प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या रूपात गिळायला येतच राहील आणि आपण प्रत्येक वेळी जीवावर उदार होऊन त्याचा सामना करण्यात आपली शक्ती घालवत राहू. त्यापेक्षा आताच सावध होऊ या. आपली आणि आपल्या जवळच्यांची काळजी घेऊ या.

 

लॉकडाऊनच्या काळात आपण सगळ्यांनी एकजुटीनं समोर आलेल्या संकटाचा सामना केला. आपल्या अनेक आप्तमित्रांचे अकाली मृत्यू होताना पाहिले, आपलंही असंच होणार का, या अनाम जाणीवेची टांगती तलवार डोक्यावर लटकताना पाहिली, घरांच्या चार भिंतीतच आपण अडकून पडणार का, या प्रश्नाच्या भीतीवर मात करून आपण हळूहळू सावरलो, आजही सावरत आहोत; तेव्हा जसे एकत्र होतो, आपल्या जगण्याच्या इच्छाशक्तीवर ठाम होतो; तसेच नेहमी राहायचा प्रयत्न केला, तरी कोरोनासारखं भूत आपल्या मानगुटीवर बसताना हजारदा विचार करेल.... बघायचा का असाही विचार करून.... ?

- अक्षय संत