अनुदिनी संवादिनी

युवा विवेक    04-Jan-2022   
Total Views |

अनुदिनी संवादिनी 

anudini sanwadini

सर्वप्रथम युवाविवेकच्या सर्व वाचकमित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!!

एव्हाना जुन्या वर्षाचा मागोवा घेऊन झाला असे, आप्तमित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन झाल्या असतील आणि अर्थातच नव्या वर्षाचे संकल्पही झाले असतील. एकूणच काळ बदलला, तरी ही नवेपणाची पालवी मात्र कधीच जुनी होत नसते. पण काही गोष्टी आता काळाच्या ओघात मागे पडल्यासारख्या वातात्ता किंवा कदाचित त्यांचे संदर्भ बदलले असतील. पूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिनदर्शिका आणि पंचांग यांच्याबरोबरीनं एक अत्यंत महत्वाची गोष्ट खरेदी केली जायची, अनुदिनी अर्थात डायरी ! आज सगळं काही हाताच्या एका क्लिकवर समोर हजर असण्याच्या काळात डायरी हा प्रकार आपलं स्थान कितपत टिकवून आहे, याची शंका वाटते, पण एक काळ होता, जेव्हा डायरी ही घरात दिनदर्शिकेइतकीच आवश्यक वस्तू होती.

 

असं काय होतं या डायरीमध्ये? खूप काही! मनातल्या कवितेपासून वाण्याच्या हिशोबापर्यंत असंख्य नोंदी या डायरीच्या पानापानांमध्ये केल्या जायच्या. फोनवर कॅल्क्युलेटर येण्याच्या पूर्वीच्या काळात पाच रुपयाच्या फुलपुडीपासून पाचशे रुपयांच्या शालजोडीपर्यंत अनेक छोटेमोठे हिशोब डायरीत बंदिस्त असायचे. दार महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी महिन्याचा खर्च किती झाला किंवा पुढच्या महिन्यात किती खर्च करायचाय, याचा घरगुती अर्थसंकल्प या डायरीच्या मदतीनंच मांडला जायचा. बदलत्या काळात घरोघरी टेलिफोन आले आणि त्याचबरोबर टेलिफोन नंबर्सची डायरीसुद्धा. डिक्शनरीसारखे अल्फाबेटीकली लिहिलेली नावं आणि त्याच्यासमोर त्यांचे फोन नंबर्स लिहिणं हे काम सामान्यत: घरातल्या बायकांचं असायचं. त्यामुळेच की काय, डायरीच्या मागच्या पानांवर कधीकधी एक उलट एक सुलट, एकाआड एक टाकाकिंवा खालच्या वाण्याकडून तुरडाळ दोन किलो, साखर तीन किलो आणणेअसा मौलिक मचकूरही लिहिलेला सापडायचा. तसंच, एकाच नावाची अथवा आडनावाची तीनचार माणसं किंवा एका पानावर त्या त्या अक्षरानं सुरु होणाऱ्या सगळ्याच लोकांचे नंबर्स लिहिण्याची गडबड, त्यातून होणारी गिचमिड आणि त्या गिचमिडीतून नेमका हवा त्या माणसाचा नंबर ऐन वेळी शोधून काढण्याची जादुई करामत, हा क्रम घरोघरी मातीच्या चुलींपेक्षा जास्त कॉमन होता. आपलेच नाही, तर शेजारपाजारच्या नातेवाईकांचे नंबर्सही त्याच डायरीत बिनदिक्कत लिहिलेले असायचे.

 

ही झाली घरगुती डायऱ्यांची गोष्ट!वैयक्तिक अनुदिनी अर्थात प्रायव्हेट डायरीची बातच निराळी. जागतिक साहित्याशी तोवर फारच जुजबी परिचय झालेला नसल्यामुळे ॲन फ्रँक वगैरे मंडळींची नावंही कानांवरून गेलेली नव्हती. नाही म्हणायला, पुलंच्या बटाट्याची चाळमध्ये किंवा शांता शेळकेंच्या 'चौघीजणी'मध्ये पात्रांनी दैनंदिनी लिहिल्याचे उल्लेख होते; पण प्रायव्हेट डायरीही आपल्या प्रगतीपुस्तकापेक्षा जास्त गुप्ततेत ठेवण्याची वस्तू असावी, असंच वाटत आल्यामुळे एकूणच त्याबद्दल गूढ आकर्षण आणि त्यात काय लपवायचं?’ पद्धतीचा अनुदार भावही होता. डायरीची खरी गंमत कळायला लागली ती कविता लिहायला लागल्यापासून आपल्या कविता कोणालाही दाखवायच्या योग्यतेच्या नाहीत, हे फार लवकर कळल्यामुळे त्या कुठल्यातरी डायरीत किंवा वहीत लिहून ठेवणे आणि ते बाड शक्यतो कपाटाच्या सगळ्यात तळाशी लपवणे, यात उगीचच कुठलातरी खजिना लपवत असल्याचा आनंद मिळायचा. सुरुवातीच्या उत्साही दिवसांमध्ये आपल्याला कविता सुचेल तेव्हा डायरी बरोबर असावी, म्हणून दप्तरात ठेवून फिरल्याचंही आठवतंय; पण कविता, पाउस आणि भूक आपल्या वेळेप्रमाणे कधीच येत नाहीत, हे सत्य नकळत्या वयात उमगल्यामुळे एका बंदिस्त डायरीपेक्षा वह्यांच्या मागचे कागद किंवा तिकिटांचे चिटोरे, यांच्यावरही काम भागू लागलं आणि डायरी पुन्हा कपाटात बंदिस्त झाली.

 

डायरीचा सगळ्यात लोकप्रिय असलेला उपयोग करण्याचे प्रसंग माझ्यावरतरी फारच कमी वेळा आले. आपल्या रोजच्या घडामोडी, मनातल्या भावना, कोणालाही सांगता येत नाहीत अशी गुपितं, रहस्यं समजून घेणारी सखी संवादिनी म्हणजे डायरी, हे मुळातलं रहस्य आयुष्यात फार उशिरा कळलं. एक तर लपवण्यासारखं काय आहे, या विचारातून मोठं होण्याच्या काळातच शब्दांच्या मागेही लपता येतं, हा नवा शोध लागल्यामुळे डायरीची गरजच भासली नाही..... मनातली वादळं कवितेत गुंफली की, आपल्यालाही मोकळं झाल्याचं समाधान मिळतं आणि वाचणारा कवितेचा त्याच्या त्याच्या पद्धतीनं, कुवतीनं अर्थ लावायला मोकळा होतो, ही दुधारी सोय आयतीच झाल्यामुळे चोरून, जगापासून काहीतरी लपवून ते डायरीत लिहून ठेवावं, असा एखाद-दुसरा अपवाद वगळता असोशीनं कधी वाटल्याचं आठवत नाही. एक-दोनदा तोही प्रयत्न करून पाहिला, पण नियमितपणाया गुणाशी पहिल्यापासून बहात्तरचा आकडा असल्याने हा संकल्प छतीस दिवसही सलग टिकला नाही.

 

आजही कपाट आवरताना ती अपवादात्मक असलेली डायरी हाताला लागली की, स्वतःचंच हसू येतं. आतमध्ये जपून ठेवलेलं तेव्हाचं एखादं बसचं तिकीट, हॉटेलचं बिल, त्याच्यामागे लिहिलेली एखाददुसरी चारोळी आणि जिच्यासाठी ती डायरी लिहिली तिचा एखादा फोटो, असं खूप काय काय सापडतं! मन एकदम त्या दिवसांमध्ये पोहोचतं. उगीच प्रश्न पडतो, ‘तीसध्या काय करत असेल? कुठं असेल? कधी कधी एखादी जीर्ण टेलिफोन डायरी चाळताना एखादा जुना नंबर दिसतो आणि नुसत्या नंबरवरून अनेक आठवणी फेसासारख्या उसळत वर येतात. त्या नंबरचा मालक किंवा मालकीण या जगात नसेल, तर त्यांच्या आवाजाच्या आठवणीनंही क्षणभर कातर व्हायला होतं.... पेट्रोल तीस रुपये, चहा तीन रुपये अशा नोंदी साधारण मध्ययुगीन वाटू लागतात. खरंच, डायरीत काय जादू असते, ते खऱ्या अर्थानं ती लिहिण्यापेक्षा खूप वर्षांनी ती पुन्हा चाळताना कळतं, तेव्हाच्या वाटा आणि आताचे मुक्काम असे अचानक समोर दिसले की पुलंचं एक वाक्य आठवतं.... आपण सगळे फक्त पत्त्याचे धनी, मचकुराचा मालक कोणी निराळाच असतो.....

 

- अक्षय संत