वात्सल्यसिंधू

युवा विवेक    05-Jan-2022   
Total Views |

वात्सल्यसिंधू


sindhutai sapkal 

'वात्सल्यसिंधू आई सिंधूताई सपकाळ गेल्या...' जवळजवळ प्रत्येक वर्तमानपत्राने आणि न्यूज पोर्टलवर ही बातमी ठळकपणे झळकते आहे. वय, ऐश्वर्य, सामाजिक प्रतिष्ठा या पातळ्यांवर विविध स्तरांवर असलेले लोक सिंधूताईंबद्दल अत्यंत आपुलकीने व्यक्त होताहेत, अनेकजण त्यांच्याबरोबरचे फोटोजही सोशल मीडियावर टाकतायत. सिंधूताई सेलिब्रिटी होत्या का? कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्या होत्या? कुठल्या सिनेमानाटकाच्या नायिका होत्या? खेळाडू, उद्योजक किंवा कुठल्या कार्यकारिणीच्या पदसिद्ध अध्यक्षा होत्या? यांपैकी काहीही नसलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनाबद्दल सामान्य माणसांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांनी दु:ख व्यक्त करणं, आतून फुटून काही लिहिणं ही खरंच आश्चर्याची आणि आदराची गोष्ट आहे.

 

काही अपवाद वगळता, गेली अनेक वर्षं सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत आपला दृष्टीकोन फार उथळ आहे. महाराष्ट्रात असंख्य लोक सामाजिक क्षेत्रात गेली बरीच वर्षं जिद्दीनं आणि झोकून देऊन काम करतायत. कोणी आदिवासी लोकांसाठी, कोणी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी, कोणी कर्करोगग्रस्तांसाठी अनेक पातळ्यांवर अफाट काम सुरू असतानाही बहुसंख्य लोकांना बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा अण्णा हजारे यांपलीकडे नावं आठवतील की नाही, शंका आहे. सिंधुताई आयुष्यभर अनाथ मुलांची आई म्हणून जगल्या. स्वत:च्या जन्माच्या वेळी चिंधीम्हणून गणली गेलेली मुलगी शेवटच्या क्षणी अनाथमाताम्हणून निघून जावी, हा नियतीचा विचित्र खेळ म्हणून सोडून देता येणार नाही. या सन्मानाच्या पदवीमागे असलेली तपश्चर्या, दिवसरात्रीची वणवण आणि हृदयात अखंड वाहणारा वात्सल्याचा, करुणेचा झरा, यांची छोटीशीही जाणीव ज्यांना आहे. ते या गोष्टीला निव्वळ योगायोग किंवा काव्यन्याय म्हणूच शकत नाहीत. उन्हातान्हातून झपझप चालत जाणारी सिंधूताईंची मूर्ती ज्यांनी पाहिलीय, त्यांच्या मनात या वात्सल्यसिंधूची हीच प्रतिमा कायमची कोरली गेलेली आहे.

 

वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आपल्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न होणं, वयाच्या विशीत पदरात एका मुलीशिवाय काहीही नसणं आणि त्या महाप्रलयी काळातही मनातली कणव, करुणा रेसभरही कमी न होणं, हे येरागबाळ्याचे काम नोहे!

 

रेल्वे स्टेशनवर भेटणाऱ्या अनाथ मुलांना नुसती माया देऊन न थांबता त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी झटणाऱ्या सिंधूताईंचं त्यावेळी ना कुठल्याही सामाजिक संस्थेशी टाय अप होतं, ना कुठल्या कार्यक्रमात भाषण ठोकण्याची सुप्त इच्छा होती, ना कुठल्या पुरस्काराची आच होती. ध्यास, श्वास, तळमळ होती ती एकाच गोष्टीची, त्या मुलांना आईची माया लाभावी! ताई आपलं काम करत राहिल्या. बघताबघता ७०० च्यावर पुरस्कार त्यांच्या नावावर जमा झाले आणि त्या पुरस्कारांमधून मिळालेली रक्कम उदास विचारे पुन्हा एकदा मुलांसाठीच खर्च होऊ लागली. प्रवाहाचं पाणी पुन्हा प्रवाहातच विलीन होत होतं, प्रत्यक्ष नदी मात्र कुठल्याही पूजा-अर्चेची अपेक्षा न ठेवता निरलसपणे वाहत राहिली. तिला प्रतिष्ठेची झूल नको होती, मानमरातबाच्या शाल-श्रीफलाचा लोभ नव्हता, तिचा जीव शेवटपर्यंत तिच्या लेकरांमध्येच गुंतलेला होता. त्या लेकरांनीही आपल्या आईची साथ कधीच सोडली नाही. म्हणूनच शेवटच्या क्षणीसुद्धा, रक्ताच्या माणसांनी नको असलेली मुलगीम्हणून अव्हेरलेल्या आणि जेमतेम चौथीपर्यंतच शिकू शकलेल्या, या आईचं कुटुंब जवळजवळ १५०० मुलं, ३८२ जावई आणि ४९ सुना एवढं प्रचंड होतं. एवढंच नाही, तर त्यांच्या कार्याचा आदर करणारे, त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे आणि त्यांना आपल्या आईच्या, आजीच्या, गुरूच्या स्थानी मानणारे असंख्य लोक आज सिंधूताई सपकाळ गेल्या’, या तीन शब्दांनी पोरके झाले.

 

नुसत्या रस्तादुरुस्तीच्या कामासाठीही आपल्या वाढदिवसांचे पोस्टर्स चौकात लावणारे अनेक स्वयंघोषित समाजसेवक आपण आपल्या आजूबाजूला रोज बघतो. खरं तर या काजव्यांमुळेच डॉ. बाबा आमटे, मेधा पाटकर, रेणूताई गावस्कर किंवा सिंधूताई सपकाळ या दीपस्तंभांची उत्तुंगता अधिक जाणवते. सिंधूताईंना आपल्या कामाचा बॅनर चौकाचौकात लावायची कधीच गरज पडली नाही. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स लागल्याचंही कधी ऐकण्यात नाही. पण तरीही आज प्रत्येक सामाजिक भान आणि संवेदनशीलता असलेला माणूस सिंधूताईंच्या निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त करतोय. कुठून येतो हा इतका साधेपणा, इतकी करून, इतकी कार्यनिष्ठा?? समाजशास्त्राच्या पुस्तकांमधून फार तर शास्त्र समजेल, समाजाची समज यायला माणसंच वाचावी लागतात आणि सुदैवानं ममत्वाचा कोर्स अजून कुठल्याही शाळा कॉलेज किंवा विद्यापीठात उपलब्ध नाही. ते आतूनच यावं लागतं.

 

सिंधूताई चिखलदरा येथे आदिवासींच्या पुनर्वसनासाठी लढा देत होत्या, त्या वेळची गोष्ट! तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी चिखलदरा व्याघ्रप्रकल्पाच्या उद्घाटनासाठी चिखलदऱ्याला आल्या होत्या. सिंधूताई त्यांना भेटायला गेल्या आणि अस्वलांच्या हल्ल्यात आपले डोळे गमावलेल्या एका आदिवासी माणसाचे फोटोज त्यांनी इंदिराजींना दाखवले आणि विचारलं, 'जर जंगली प्राण्याकडून एखाद्याची गाय किंवा कोंबडी मारली गेली, तर वनविभागाकडून त्या व्यक्तीला भरपाई दिली जाते, तर हाच नियम माणसांच्या बाबतीत का लागू होऊ नये?' इंदिराजींनी तिथल्या तिथं त्या माणसाला भरपाई देण्याचे आदेश दिले..

 

आणखी काय सांगू? आयुष्यभर खूप वणवण केलीत. आता तरी विश्रांती घ्या. आज तुमची लेकरं डोळ्यातलं पाणी पुसत तुम्हाला हेच सांगत असतील की, या प्रेमस्वरूप वात्सल्यसिंधू आईला श्रद्धांजली!

 

- अक्षय संत