प्रत्येक या शब्दावरी ‘शांताबाईं’चा ठसा...

युवा विवेक    06-Jan-2022   
Total Views |
प्रत्येक या शब्दावरी ‘शांताबाईं’चा ठसा...
 

sanmelan vrutta 
पुणे : नुक्कड कथाविश्‍व, विवेक साहित्य मंच आणि फर्ग्युसन महाविद्यालय आयोजित नुक्कड साहित्य संमेलन रविवारी (2 जानेवारी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘अ‍ॅम्फी थिएटर’मध्ये उत्साहात संपन्न झाले. ‘साहित्यसम्राज्ञी शांताबाई शेळके’ यांच्यावर आधारित आयोजित संमेलनात शांताबाईंचे साहित्य, आठवणी, लेखन आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न अभ्यासकांच्या सादरीकरणाने आणि रसिकांच्या साक्षीने घेण्यात आला.
 
 
संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी विवेक समुहाचे प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंगव परदेशी उपस्थित होते. संमेलनाचे बीजभाषण ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी केले. डॉ. मोरे म्हणाले, ‘शांताबाईंशी संवाद साधताना त्या आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत याचं दडपण कधीच वाटायचं नाही. त्या अतिशय सहज बोलायच्या. समोरच्याला सहज आपलंसं करायच्या. शांताबाईंनी साहित्याचे विविध प्रकार लीलया हाताळले. त्यांनी अगदी रहस्यकथासुद्धा लिहिल्या आहेत.’ मोरे यांनी या वेळी एक आठवणदेखील सांगितली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या नवलेखक अनुदान योजनेत मी माझ्या उमेदीच्या काळात एक काव्यसंग्रह पाठवला होता. त्याला अनुदान मिळाले आणि विशेष म्हणजे त्या काव्यसंग्रहाला शांताबाईंनी प्रस्तावना लिहिली होती. त्यानंतरही त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.’
 
 
संमेलनाच्या बीजभाषणात प्रतिभा रानडे यांनी शांताबाईंच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी शांताबाईंची कौटुंबिक पार्श्‍वभूमी, त्याचा लेखनावर झालेला परिणाम, लेखनातील वैशिष्ट्ये आणि आपल्याला लाभलेला सहवास अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘शांताबाईंना विविध भाषांचीदेखील आवड होती. त्यांनी इंग्रजीतून अनुवाद केले. संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांना संस्कृत उत्तम येत असे. मात्र, एकदा चक्क त्यांना चिनी आणि जपानी भाषेतून अनुवाद करण्याचं काम मिळालं. त्या वेळी तेदेखील त्यांनी त्या भाषेतील भावसृष्टी समजून घेऊन काही लोकांच्या मदतीने केलं. त्यांनी हायकूदेखील लिहिले.’ शांताबाईंच्या सोबत घालवल्या क्षणांचा उल्लेखही त्यांनी केला. विवेक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर यांनी संमेलनाची भूमिका स्पष्ट करून विवेक समुहाच्या काही उपक्रमांची माहितीदेखील दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक साहित्य मंचच्या संयोजक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी केले.
 
 
संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात ‘चतुरस्र शांताबाई’ हा परिसंवाद घेण्यात आला. ज्येष्ठ लेखिका, साहित्यिक डॉ. नीलिमा गुंडी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होत्या. फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. डॉ. रूपाली शिंदे यांनी शांताबाईंच्या कथांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘शांताबाईंनी कवितेप्रमाणेच कथालेखनदेखील उदंड केले. मात्र, त्या दृष्टीने त्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. आपल्या लहानपणी सामोरं आलेल्या अनुभवविश्‍व आणि जडणघडण याला केंद्रस्थानी ठेवून शांताबाईंनी कथालेखन केले. श्री.म. माटे यांच्या सूचनेनुसार त्या लिहीत होत्या. शांताबाईंनी स्वतःच निर्मळपणे कबुली दिली आहे की, माझी कथा साधी, पारंपरिक वळणाची आहे’, याचा उल्लेख करून शिंदे यांनी सांगितले की, ‘शांताबाईंच्या निवडक कथांचे संपादन होण्याची गरज आहे. तसे झाल्यास त्या कथा नव्या पिढीला सहज उपलब्ध होतील.’
लेखिका, ‘संवादसेतू’च्या कार्यकारी संपादक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी शांता शेळके यांच्या कादंबर्यांवर आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘फडके, खांडेकर आणि माडखोलकरांच्या लेखनाचा प्रभाव आपल्यावर आहे, असं शांताबाईंनी स्वतः म्हटलं आहे. त्याच प्रेरणेतून त्यांनी कादंबरीलेखन केलं. शांताबाईंच्या साधारण 8-9 कादंबर्या प्रकाशित झाल्या असून, त्यातल्या 5 कादंबर्या 1950-52 पर्यंत झाल्या. म्हणजे त्यांच्या वयाचा विचार केला तर, उमेदीच्या काळात सर्व प्रकारचं लेखन करून बघावं असं वाटत असतानाच त्यांनी कादंबरीलेखनही केलं.’ या वेळी त्यांनी शेळके यांच्या कादंबर्यांची मनोविश्‍लेषणात्मक मांडणीदेखील केली.
 
 
आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. वर्षा तोडमल यांनी शेळके यांच्या ललितलेखनावर विचार मांडले. त्या म्हणाल्या, ‘शांताबाईंच्या लेखनाची शैली चित्रदर्शी होती. त्यांच्या साध्या साध्या बोलण्यातही लालित्यपूर्णता होती. त्यामुळेच ती सहजता त्यांच्या लिखाणात उतरली होती. त्यांच्या ललितगद्यामध्ये आठवणीदेखील आहेत. त्यांनी गद्याचे विविध प्रकार सहज हाताळले. समजावून देणं आणि समजावून घेणं हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य होतं.’
कवियत्री मानसी चिटणीस यांनी शांता शेळके यांच्या अनुवादित साहित्याचा वेध घेतला. त्या म्हणाल्या, ‘शांताबाईंच्या अनुवादित साहित्यातही त्यांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीचा अविष्कार दिसतो. प्रतिमा, रूपकं यांची एका स्त्रीच्या नजरेतून झालेली मांडणी त्यांच्या लिखाणात दिसते. त्यांच्यातली संवेदनशील लेखिका आणि कवयित्री अनुवादातही दिसून येते.’
परिसंवादाच्या अध्यक्ष डॉ. नीलिमा गुंडी यांनी सर्व वक्त्यांच्या मनोगताचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, ‘शांताबाईंच्या चिंतनाची धार त्यांच्या शब्दातून कळते. एखादा क्षण घेऊन त्यांची भंगुरता आणि त्याची घनता यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. शांताबाईंकडे चार शक्ती होत्या आणि त्याच्या जोरावर त्यांनी उदंड लेखनाविष्कार केला. प्रतिभाशक्ती, स्मरणशक्ती, निरीक्षणशक्ती आणि बुद्धिमत्ता या त्या चार शक्ती होत्या.’ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य डॉ. सविता केळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन संजीवनी शिंत्रे यांनी केले.
 
 
तिसर्‍या सत्रात ‘आठवणींचा बकुळगंध’ ही काव्यमैफल सादर झाली. मैफलीचे निवेदन नेहा लिमये आणि मयूर भावे यांनी केले. त्यांना स्नेहल सुरसे, मनस्वी पेंढारकर आणि मयूर सरकाळे यांनी साथ दिली. शांता शेळके यांच्या अप्रचलित, अंतर्मुख करणार्‍या आणि आत्मनिवेदनपर कविता सादर करण्यात आल्या. मैफलीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे होते. ‘कविता हे शांताबाई शेळकेंना लाभलेलं देणं होतं. आजची पिढी शांताबाईंच्या कविता वाचते, सादर करते हे खूपच आशादायी व सुखावणारं आहे, असं त्यांनी सांगितलं.’ या वेळी त्यांनी शांताबाईंवर केलेली स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विवेक समुहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबळेकर यांनी म्हात्रे यांचे स्वागत केले; तसेच पु.ना. गाडगीळ अँड सन्सचे अजित गाडगीळ यांचे स्वागतही करंबळेकर यांनी केले.
‘तरी असेल गीत हे...’ या गीतगायनाच्या सत्राने कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला. चैत्राली अभ्यंकर आणि केतन अत्रे यांनी शांताबाईंची गाजलेली गीते सादर केली. भावगीतांपासून लावणीपर्यंतची अनेक गीते त्यांनी सादर केली. त्यात अनेक गीतांना रसिकांनी ‘वन्स मोअर’ची दाद दिली. त्यांना डॉ. नरेंद्र चिपळुणकर (हार्मोनियम), ओंकार पाटणकर (की-बोर्ड) आणि ऋतुराज कोरे (तबला, ऑक्टोपॅड) यांनी साथ दिली. डॉ. सुजाता शेणई यांच्या संवादी निवेदनाने कार्यक्रमात रंगत भरली.
पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी गायक, संगीतकार कौशल इनामदार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य डॉ. आनंद काटीकर, महेश पोहनेरकर, डॉ. सविता केळकर यांच्या हस्ते नुक्कड कथा विश्‍वअंतर्गत घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ‘नुक्कड’चे हेमंत कोठीकर यांनी परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कौशल इनामदार यांनी संमेलनाचा समारोप करताना उपस्थितांशी हृद्य संवाद साधला.
इनामदार म्हणाले, ‘कारागिरी ते कलाकारीपर्यंतचा प्रवास करणं खूप अवघड असतं. ते सगळ्यांनाच जमेल असं नाही. शांताबाईंचं लिखाण साधं, सहज आहे. ते सर्वांना साधेलच असं नाही. कविता किंवा गीत हे मुळातच प्रवाही शिल्पासारखं असंत. त्यामुळे तो एक क्षण पकडणं हे खूप अवघड असतं. आज शांताबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम होत असताना असं सांगावसं वाटतं की, असाच कार्यक्रम आणखी 100 वर्षांनी होईल. द्विशताब्दी होईल इतकं शांताबाईंचं साहित्य चिरंतन आहे.’ या वेळी त्यांनी शांताबाईंच्या गाण्यांवर केलेल्या अल्बमच्या आठवणी सांगितल्या.
 
 
संपूर्ण संमेलनाचे थेट प्रक्षेपण विवेक साहित्य मंचच्या फेसबुक पेजवर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राची लांडगे, मयुरी मालुसरे, सायली शिगवण, शुभम चव्हाण, मानसी झोरे, चेतन मॅडम, सिद्धी मेंगडे, तेजश्री चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
 
 
(शब्दांकन ः मयूर भावे)