प्राक्तनाचे संदर्भ

युवा विवेक    08-Jan-2022   
Total Views |

प्राक्तनाचे संदर्भ

दुमडलेल्या पानापाशी


praktanache sandarbha 

शब्दांची गंमत कशी अद्भूत असते बघा न! 'प्राक्तन' आणि 'संदर्भ' हे दोन्ही शब्द किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या दोन्ही शब्दांच्या चिंतनावर जीवन व्यतीत व्हावं, एवढी त्यांची व्याप्ती. हो, व्याप्तीच! ताकद वगैरेपेक्षाही 'व्याप्ती'च शब्द योग्य वाटतो. मग हे दोन्ही शब्द एकत्र होऊन जेव्हा हाती 'प्राक्तनाचे संदर्भ' येतात, तेव्हा ते उलगडायला हात लागतात ते धामणस्करांचेच! संवेदनशीलतेचे संदर्भ उलगडून प्राक्तनाची रांगोळी काढणारा हा हळवा कवी वाचताना आपण अलवार होतोय का... असं वाटत जातं.

 

द. भा. धामणस्कर यांचा 'प्राक्तनाचे संदर्भ' हा काव्यसंग्रह वाचत होतो. १२० पानांच्या या संग्रहात १०२ वगैरे कविता आहेत. त्यापैकी बहुतांश कविता चार, पाच किंवा आठ ते दहा ओळींच्या. त्यामुळे वाचायला बसलोच, तर एक तासातही पुस्तक वाचून झालं असतं... संपलं असतं...! पण नाही.... पण नाही.. तसं होत नाही. मध्येच कोणतीही कविता काढायची आणि वाचायची, एक कविता वाचून झाल्यावर वाटलंच तर दुसरी आणि मग पहिली आणि दुसरीचा संबंध जुळत असेल तर, ते चित्र रंगवणं... नव्या शब्दांशी मनातल्या मनात खेळणं... दोन ओळींमधलं वाचणं... इतकंच नाही तर कवितेच्या फॉन्टशी आणि त्या फॉन्टच्या रूपाचाही अन्वयार्थ कवितेत शोधणं.... अशा असंख्य विचित्र सवयींमुळे कोणताच काव्यसंग्रह माझा पूर्ण वाचून होत नाही. येता-जाता अनेकांचं वाचन सुरू असतं. हक्काचे मित्र, मैत्रिणी यांच्या गप्पा संपत नसतातच न... तसंच काहीसं...

 

आणि मग एक दिवस 'प्राक्तनाचे संदर्भ' सापडले. एखाद्या चाळिशीतल्या पुरुषाने एखाद्या संध्याकाळी आकाश पाहत तासंतास बसावं... फक्त बसलेलं असावं.... आकाश बघताना ते त्याच्या डोळ्यांत, नजरेत, मनात, उरात, भावनांमध्ये उतरावं आणि चढत जावं ते भारलेपण! त्या भारलेपणातून तो जे लिहिल न ते धामणस्करांनी लिहिलंय... मी संध्याकाळचा उल्लेख केला. मात्र, ग्रेसांची गूढता धामणस्करांमध्ये नाही. त्यांच्याकडे आहे ती खोलवर वार करणारी, आतपर्यंत पिळवटून टाकणारी संवेदनशीलता आणि त्या संवेदनशीलतेला व्यक्त करू शकणारी सहजता. तुम्ही केवळ संवेदनशील असून चालत नाही. तर, ती संवेदनशीलता सहजपणे व्यक्तही करता यायला हवी. सामान्यांचा निचरा त्यातून होतो, असामान्यांना त्यात 'क्रिएटिव्हिटी' सापडते, कवीला कविता दिसते आणि धामणस्करांना दिसतात प्राक्तनाचा लेखाजोखा मांडणारे संदर्भ...!

 

प्रचंड लिहिण्याची इच्छा आणि कंटाळा असं दोन्ही मला हा काव्यसंग्रह देतोय. इच्छा का ते सांगायला नको. मात्र, कंटाळा तो हा की, हे वाचताना जे जाणवतंय ते शब्दांत हवंच असं वाटतंही आणि नाही पण. ही 'आहे-नाही'ची अवस्था येते.

'उष:सूक्त' नावाची मोजून चार ओळींची आणि १३ शब्दांची कविता. त्यात म्हटलंय...

कालचे सर्व गंगेचे

गंगेत सोडुनी दिधले

पात्रात निरामय नूतन

दे भोग आजचे सगळे

दहा सेकंदाच्याही आत या चार ओळी वाचून आल्या. आता? आता उसवत बसा स्वत:ला आतल्या आत. लढाई काही क्षणांची असते. वार एका क्षणात होतो. जखम भरायला वेळ लागतो, हेही तसंच आहे.

कालचे सर्व गंगेचे

गंगेत सोडुनी दिधले

म्हणताना... गंगा कालातीत आहे आणि कालातीत प्रवाही आहे, हे विसरून चालत नाही. तरीही, तिने जे वाहून आणलंय ते ठेवून घेता येत नाही. कारण हेच की, ती अखंडित आहे. ठेवून काय घेणार? अशाही अवस्थेत जे ठेवून घेतलं... म्हणजे जे काय उरलं होतं, तेही आता सोडून दिलंय. सर्व सोडून दिलेल्या या रिक्त पात्रात आता फक्त भोग दे... कारण ते वाहून न्यायला पुन्हा गंगा येईलच न? म्हणून पुढे आहे की,

पात्रात निरामय नूतन

दे भोग आजचे सगळे

हे 'प्राक्तनाचे संदर्भ' इतक्या लवकर पुसले जाणार नाहीतच. असह्य झालं की, लिहीनच. तूर्तास...... माझा भोग मला भोगू दे...!

- मयूर भावे, पुणे