गांधीजी आणि मी

युवा विवेक    01-Feb-2022   
Total Views |

गांधीजी आणि मी

 
gandhiji

एक छोटं अर्धवर्तुळ.... त्याखाली एक मोठं अर्धवर्तुळ आणि त्याच्या एका टोकावर झेंड्याच्या काठीसारखा डकवलेला बारीकसा चौकोनी तुकडा. झाले गांधी तयार..... म्हणजे, गांधींचं अर्कचित्र तयार. मुद्दाम अर्कचित्र म्हटलं कारण गांधींचं तर्कचित्र ते स्वतः सोडून इतर कोणालाच रेखाटता येणं शक्य नाही.

 

शाळेत असताना गांधीजींचं असंच चित्र आम्ही काढायचो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकंच त्यांचं अर्कचित्रही फार साधं-सोपं होतं काढायला.... इतिहासाच्या पुस्तकात गांधीजींचा एक हसरा फोटो असायचा आणि खाली सनावळ्यांची जंत्री. ती पाठ करताकरताच इतका वैताग यायचा की, मूळ गांधीजी होते कसे, हे समजून घेणं राहूनच गेलं. त्याचे परिणामही किती भयंकर होते, हे कालांतरानं जाणवलं.

 

दहावीत असताना शाळेतल्याच एका शिक्षिकेच्या घरी मी आणि माझा एक मित्र गणिताच्या अभ्यासाला जायचो. त्यांची मुलगीही आमच्याच वर्गात असल्यानं साहजिकच त्या नुसत्या शिक्षिका न राहता मावशी झाल्या होत्या. एक दिवस आम्ही तिघे जण अभ्यास आटपून गप्पा मारत असताना गांधीजींचा विषय निघाला. आमच्या मित्राने बाहेर जे काही गांधीजींबद्द्ल ऐकलं होतं, त्यावरून मुक्ताफळं उधळायला सुरुवात केली. अधूनमधून त्याच्या भाषेचा तोलही घसरत होता. मग काय, त्याचं ऐकून मीही त्याची 'री' ओढत तावातावानं शाठ्यं प्रतिशाठ्यं म्हणून वगैरे ऐकीव मुद्दे बरळू लागलो. आमची मैत्रीण आम्हाला समजावायचा प्रयत्न करत होती, पण तीही आमच्याच वयाची असल्यामुळे तिचाही बोलताना गोंधळ उडत होता. हा सगळा वादविवाद रंगात आलेला असताना एकदम मागून आवाज आला, 'तुम्हाला माहीत आहे का, गांधीजी कोण होते, कसे होते ते.... ?' मागे बसलेल्या मावशीनं आमचं सगळं बोलणं ऐकून शेवटी संभाषणात भाग घेतला आणि त्यानंतरचा एक तास ती आमच्याशी 'गांधीजी' या विषयावर बोलत होती.

 

आज एकवीस वर्षांनीही मी माझ्या आयुष्यातला तो एक तास विसरू शकलेलो नाही आणि कधी विसरेन असं वाटतही नाही. पुस्तकांतले, चित्रांमधले, कथा कादंबरीतले गांधीजी आणि त्या एक तासात आम्हाला दिसलेले गांधीजी, यांच्यात जमीनअस्मानाचं अंतर होतं.

 

गांधीजी या व्यक्तिमत्त्वाला आपण नेहमीच महात्माबनवून एका चौकटीत बंदिस्त करून ठेवलं. मात्र, त्यांना भारतीय माणूस जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? हा प्रश्न मला त्या दिवशी पहिल्यांदा पडला. गांधीजींचा आधुनिकतेला विरोध नव्हता. त्यांचा विरोध होता तो या आधुनिकतेच्या रेट्यातून उभ्या राहणाऱ्या अराजकाला. त्यातून उत्पन्न होऊ शकणाऱ्या असंख्य प्रश्नांना!

 

आज एकविसाव्या शतकात आपल्याला दिसत असलेले शहरीकरणाचे भीषण परिणाम त्यांनी केव्हाच ओळखले होते. प्रगतीच्या नादात खेड्यांकडून शहरांकडे जाणारे माणसांचे तांडे, खेड्यांमधली लुप्त होत चाललेली स्वयंपूर्णता आणि शहरांना झोंबून चिकटलेल्या असंख्य माणसांचे हाल, हे सगळं त्यांना दिसलं होतं आणि म्हणूनच त्यांनी खेड्याकडे चलाहा मंत्र देशभर रूजवला.

 

सत्य, अहिंसा या गोष्टी भारतात पूर्वी नव्ह्त्या का? होत्याच की! धर्मराज युधिष्ठिराच्या आणि राजा हरिश्चंद्राच्या सत्यनिष्ठेच्या गोष्टी पिढ्यांपिढ्या सांगणारा आणि ऐकणारा हा देश. गांधीजींनी या सत्याला स्वाभिमान आणि निर्भयतेचं अधिष्ठान दिलं. गांधीजींकडे आलेला प्रत्येक जण त्यांच्याकडून काही ना काही प्रेरणा घेऊन पुढं गेला. मग ती त्यांची साधी राहणी असेल, त्यांचं लघुउद्योगांना असलेलं प्रोत्साहन असेल, त्यांची सत्यनिष्ठा असेल किंवा अगदी त्यांचा वेष असेल. आज महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात काम करणारे अनेक कार्यकर्ते गांधीजींच्या विचारांवर काम करतात. खेड्यातली जीवनशैली एकंदरीतच शहरांपेक्षा निसर्गाच्या जास्त जवळ जाणारी. त्यात आपल्या भारतीय मातीचा आत्मा मिसळला, तर एक देश म्हणून भारत जगाच्या नकाशावर एक अद्वितीय चमत्कार असेल.

 

गांधीजी नेहमी म्हणायचे, ज्या दिवशी प्रगत सुखसोयींचा लाभ देशातल्या सगळ्यात तळाशी असलेल्या माणसाला घेता येईल, त्याच दिवशी मी हा देश प्रगत झाला, असं म्हणेन. त्यांना वैयक्तिक प्रगतीपेक्षा सामूहिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये जास्त रस होता. भारतासारख्या विविध भाषा-संस्कृती-संस्कार यांना सामावून घेणाऱ्या देशातला प्रत्येक माणूस खऱ्या अर्थानं प्रगत असणं, हे आता अशक्यप्राय स्वप्न वाटत असलं तरीही गांधीजी आणि त्यांच्या अनेक सच्च्या अनुयायांनी हे स्वप्न उराशी बाळगूनच आपली आयुष्यं समाजासाठी वाहून घेतली होती.

 

या सगळ्या अनुषंगानं गांधीजींचं ते अर्कचित्र खूप प्रतीकात्मक वाटतं. एका उदात्त विचारावर चढवलेली त्याची खुजी सावली आणि त्याला टेकू देऊन उभा असलेला 'गांधीवध की गांधीवाद?' हा चौकटीत अडकलेला सनातन प्रश्न! स्वातंत्र्य चरखा चालवून मिळालं की बंदूक, यांसारख्या मुद्द्यांवर चालणाऱ्या आमच्या लोकशाहीत 'स्वातंत्र्यानंतर काय मिळालं?' हा प्रश्न अनेक सरकारी फायलींसारखा कुठल्यातरी कोपऱ्यात धूळ खात पडला आहे.

 

गेल्या शतकात जगानं दोन महायुद्ध भोगली आणि भारत स्वातंत्र्यानंतर चार वेळा युद्धाला सामोरा गेला. पण तरीही युद्ध की बुद्ध?’ हा सनातन प्रश्न दर काही वर्षांनी डोकं वर काढतच असतो.

 

'मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस या पृथ्वीवर अस्तित्वात होता, यावर पुढच्या पिढयांचा विश्वास बसणार नाही,' असं गांधीजींच्या निधनानंतर अल्बर्ट आईनस्टाईन त्यांच्याबद्दल म्हणाला होता. आम्ही त्याचं हे विधान त्याच्या रिलेटिव्हीटीच्या थिअरीइतकंच खरं करायचा प्रयत्न करत राहणार असू, तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच, असं खेदानं म्हणावं लागेल. 

- अक्षय संत