मिठी

युवा विवेक    15-Feb-2022   
Total Views |

मिठी

 
hug 

व्होडकाची मंद लय अजून गुणगुणतीय डोक्यात..... तिला शब्द नाहीयेत, पण कुठलीतरी अनामिक हुरहुर आहे फक्त... तिच्या मंद श्वासांची..... एखादी रात्र नुसतीच सरकून जाते आणि कळतच नाही हो, केव्हा दिवस उजाडला आणि केव्हा ते रात्रीचं संगीत डोक्यात पहाटेच्या कुंद हवेसारखं तरळायला लागलं.... कळतच नाही.

 

दुसऱ्या दिवशी व्हॅलेन्टाईन डे होता. ती फक्त माझ्यासाठी दोन दिवसांची सुट्टी घेऊन नागपूरहून पुण्यात आली होती..... आदल्याच दिवशी माझ्या नाटकाचा प्रयोग तुफान रंगला होता. त्यात ती आलेली, त्यामुळे तर काय, 'आनंद पोटात माझ्या माईना' अशी अवस्था होती आमची..... प्रयोग संपल्यावर माझं होणारं कौतुक ती एका कोपऱ्यात शांतपणे बसून ऐकत होती. लोकांच्या गराड्यात उभं राहूनही मला त्यांचे आवाज ऐकूच येत नव्हते, कारण तिचं त्या कोपऱ्यातलं मूक आक्रंदन टोचत होतं मला आत कुठेतरी. काही मित्र, जे अशा वेळी समीक्षक बनतात, ते ताजी ताजी चर्चा करण्यासाठी आसुसले होते. काही समीक्षक, जे मित्रही नव्हते, ते मला सपष्ट ऐकू येईल, अशी काळजी घेत आपापसात कुजबुजत होते. हळूहळू, कसाबसा ह्या सगळ्यातून मी तिच्यापर्यंत पोचलो आणि तिच्यासमोर उभा राहिलो. तिच्या चेहऱ्यावर रुसव्याचं मळभ साचलं होतं. मी तिचा हात हातात घेणार इतक्यात, "मिळाला वेळ शेवटी??? पण आता मला वेळ नाहीये, सो बाय...' असं म्हणून ती निघूनही गेली. डोकंच फिरलं माझं. हे काय वागणं झालं?? एवढे सगळेजण माझं कौतुक करतायत अन हिचा काय माज आहे फुकट?? मग मी ठरवलं, आता हिला दाखवायचंच.

 

मग काय, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मस्त सरप्राईज डेट प्लॅन केली मॅडमसाठी.... गुलाबाचं फूल, गजरा, टकाटक डिनर, नंतर राईड.... बाई खुश..... मीही खुश होतो, पण आदल्या दिवशीचा तिचा attitude काही गेला नव्हता डोक्यातून, रादर, डोक्यात गेला होता..... मीही ठरवलं होतं, आता बास, हिला कडक शब्दांत समज द्यायची..... म्हणजे बघा ना, नाटक बघायला इतक्या लांबून येऊनही अजूनपर्यंत नाटकाबद्दल एका शब्दानंही बोलणं झालं नव्हतं.

 

मी ड्राईव्ह करता करता डोक्यात त्या कडक शब्दांची जुळणी करत होतो आणि एकदम मागून आवाज आला, "व्होडका हवीय, राव..... कडक मूड आलाय आज.... काय बोलतो??" अरे देवा..... म्हणजे आज ही सगळं ठरवूनच आली होती का..... तसंच असावं बहुतेक.... मला वाटलं, निदान व्होडका घशाखाली उतरल्यावर तरी कालच्या प्रयोगाबद्दल चार बरेवाईट शब्द बोलेल, तेव्हा तू म्हणशील तसंतत्वावर पार्टीची साग्रसंगीत सिद्धता करूनच आम्ही माझ्या रूमवर आलो.

 

रात्रीचा शांत वारा अजून डोक्यात भिनभिनत होता आणि त्यावर व्होडका..... हे म्हणजे, आता वसंतराव मारवा गाऊन उठलेत आणि भीमण्णा मुलतानीचे तंबोरे लावायला लागले पण.... अहो, श्वास तर घेऊ द्याल की नाही.

 

पहिला पेग भरला... दुसरा.... तिसरा.... तिनं फोनवर कुमारांचं ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठीलावलं. आमचं दोघांचंही अत्यंत आवडतं गाणं, मग कुमार, भीमसेन, वसंतराव, किशोरीताई असं करत गाडी मेहंदी हसन आणि भूपिंदरवर पोहोचली. बाकी या चोविशीच्या पोरीला बादशाहपेक्षा भूपिंदर आवडतो, हा पहिल्या भेटीत बसलेला शॉक अजूनही माझ्या डोक्यात कायम आहे, तर रात्र चढत गेली तशी व्होडकाच्या लयीवर आम्हीही समेवर आलो.... दोघांच्याही डोळ्यांवर धुंदी रेंगाळू लागली. तिनं हलकेच माझा हात हातात घेऊन तळव्यावर ओठ टेकले. त्या वेळी भूपिंदर 'मीठे बोल बोले' आळवत होता.

 

रात्र फुलत गेली. गुलाबाच्या पाकळ्या उशीजवळ विस्कटून पडल्या. गजऱ्यातला मोगरा अजून हिंदकळतोय त्या तिथे, त्या रिकाम्या ग्लासशेजारी आणि तिचा फोन केव्हा कोमात गेला, कळलंही नाही....

 

पहाटे कधीतरी ती आळसावत, केस सावरत उठली. तिच्या चाहुलीनं मलाही जाग आली. आजच्या रात्रीत माझ्या रूमचा बगीचा झाला होता.... आधी गुलाब, मग मोगरा आणि आता समोर रातराणी फुलली होती....

 

मी तिच्याकडे एकटक पाहात राहिलो आणि ती माझ्या मिठीत कोसळली.... माझी बोटं यंत्रवत तिच्या केसांत गुंतली.... आणि तिचे शब्द माझ्या मनात.... 'काल किती वाट पाहिली रे याची' आणि काय सांगू हो.


मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले'

ह्याचा अर्थ तेव्हा समजला.... ती गेली निघून परत आणि मी बसलोय इथे, ती पुन्हा भेटायची वाट बघत व्होडकाची ती मंद लय अजून गुणगुणतीय डोक्यात.... तिला शब्द नाहीयेत, पण कुठली तरी अनामिक हुरहुर आहे फक्त. तिच्या मंद श्वासांची आणि एका चिंब मिठीची मिठी....

 

कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी

कळले मला न केव्हा, निसटून रात्र गेली

- अक्षय संत