शिवरायांचा आठवावा साक्षेप....

युवा विवेक    19-Feb-2022   
Total Views |

शिवरायांचा आठवावा साक्षेप....


shivaji maharaj 

हिंदवी स्वराज्यसंस्थापक, क्षत्रियकुलवंतस, सिंहासनाधीश्वर, सकळगुणमंडित, राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वगुणसंपन्न अशा व्यक्तिमत्त्वाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज! चरित्र आणि चारित्र्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराज! महाराष्ट्र घडवणारा राष्ट्रपुरुष म्हणजे शिवाजी महाराज! 'हे राज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा...' असं म्हणून शिवाजीराजे थांबले नाही; तर त्यांनी ते राज्य मिळवलं, राखलं आणि प्रस्थापित केलं. 'रयतेचा राजा' हा त्यांना तेव्हा, म्हणजे ४००-४५० वर्षांपूर्वी मिळालेला बहुमान आजच्या रयतेने आणि आजच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आदर्श घ्यावा असाच आहे.

 

केवळ एकामागे एक लढाया करत शत्रूला नामोहरम करणे हा एकच उद्देश शिवचरित्रात आपल्याला कधीच दिसत नाही... कारण 'शिवाजी' हे केवळ कुठल्या एखाद्या सेनापती किंवा सरदाराचं नाव नाही; पण म्हणून काहीही न करता केवळ आहे त्या ऐश्वर्याचा उपभोग घेत दिवस घालवावे असाही त्यांचा बाणा नाहीच....! राजांनी जेवढं महत्त्वाचं कार्य रणभूमीवर केलं, तेवढंच आणि त्याही पलीकडे जाऊन समाजासाठी केलं. रयतेसाठी केलं. कोणत्याही मोहिमेच्या वेळी आचरण करण्याची एक विशिष्ट नियमावली राजांनी घालून दिली होती. त्यावरून ती मोहीम म्हणजे केवळ लढण्याचा कैफ नव्हता, हे लक्षात येतं. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावरची स्वारी, कोंढाण्याची मोहीम अशा अनेक मोहिमांसाठी त्या त्या वेळेला आणि परिस्थितीला अनुकूल अशाच शिलेदारांची निवड राजांनी केली. योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी, योग्य तेव्हाच योग्य तो माणूस पोहोचला पाहिजे यातून ह्या कल्याणकारी राजाचं द्रष्टेपण दिसतं, गुणग्राहकता दिसते.

 

राज्य करणं म्हणजे केवळ जय नाही; तर त्यासोबत विजय मिळवलेल्या राज्याची पुढची घडी बसवणं, हा विचार राजांनी निश्चितपणे केलेला दिसतो. त्यामुळेच तोरणा विजयानंतर सापडलेल्या धनाचा उपयोग स्वराज्यासाठी, गडांच्या डागडुजीसाठी केला गेला. स्वराज्यातलं कोणत्याही प्रकारचं धन राजांनी खासगी मालमत्ता समजलं नाही. त्यामुळे स्वराज्यावर अनेक संकटं येऊनही रयतेपैकी कोणी आत्महत्या केल्याचे उल्लेख नाहीत.

 

राजांनी तोरण्याची डागडुजी करून घेतली, आपल्या मनातल्या योजना साकारून रायगड बांधला, अश्वशाळा उभारल्या, गड-कोटांवर देव-देवतांची मंदिरे बांधली, संत-सत्पुरुषांचा वेळोवेळी गौरव केला. समर्थांच्या कार्याला साह्य केले. व्यापारी वर्गासाठी बाजारपेठा बांधून दिल्या. सागरी किनाऱ्यावर वचक ठेवण्यासाठी आणि जलदुर्गांच्या रक्षणासाठी आरमार उभारलं, आर्यवर्तात म्लेंच्छसत्तेचा उच्छेद करून हिंदू राज्य स्थापित केल्यानंतर छत्रपतींनी रघुनाथपंडित यांच्याकडून राज्यकारभारासाठी राज्यव्यवहारकोश करवून घेतला. एक राजा त्याच्या राज्याचा किती चहुबाजूंनी विचार करू शकतो, हेच यातून दिसतं.

 

अफजलखानाला लिहिलेलं पत्र, मिर्झाराजे जयसिंगसोबत केलेला तह, जावळीच्या मोरेंवर बसवलेला वचक, आग्र्याहून सुटका अशा किती तरी प्रसंगातून त्यांची चातुर्यनीती, राजनिती आणि प्रसंगी माघार घेऊन नंतर सामर्थ्यानिशी झडप घालणं हा विचार दिसतो. परस्त्री मातेसमान मानणं, व्यसनांच्या आहारी न जाणं, रयतेला बटीक न समजणं, बेईमानी आणि कारभारात कसूर केल्यास तत्काळ शासन करणं, भ्रष्टाचार न करणं आणि तो सहनही न करणं....असे अनेक गुण राज्यांच्या ठायी दिसतात, शिवचरित्रात प्रकर्षाने जाणवतात.

 

आज शेकडो वर्षांनंतर शिवजयंती साजरी करताना यातला एक तरी गुण आजच्या तरुण पिढीने घ्यावा, शिवजयंती म्हणजे उन्माद न होता तो विचार आणि आचार आदर्श करण्याचा संकल्पदिन व्हावा, शिवाजी महाराजांचं नाव लावून मिरवणाऱ्या लोकांना त्या नावाची महती कळून स्वत:ची जागा ओळखता यावी, जाति-धर्मातला भेद मिटावा आणि ‘शिवरायांचे मावळे’ असं केवळ गाडीवर न लावता ते मनावर कोरावं हीच इच्छा आजच्या दिवशी आपण व्यक्त करू या.

 

समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहान्तानंतर छत्रपती संभाजी महाराजांना जे पत्र लिहिलं, त्यात त्यांनी म्हटलं की,

शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

आणि त्या पुढे सांगितलं की,

शिवरायांचा आठवावा साक्षेप/

भूमंडळी//

शिवरायांचे कैसे बोलणे/

शिवरायांचे कैसे चालणे/

शिवरायांची सलगी देणे/

कैसी असे//

आज यातला 'साक्षेप' साधणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. जरा काही खुट्ट झालं की, एकमेकांच्या अंगावर धावून जाणारी जनता आणि जनतेचा विचार न करता गुलाल उधळल्यासारखी चिखलफेक करणारे राजकारणी ह्यांना हा साक्षेप ज्या दिवशी साधेल... त्या दिवशी आपण शिवछत्रपतींना केलेला मुजरा पावन होईल, हे मात्र खरं...!

- मयूर भावे.