सफरनामा

युवा विवेक    22-Feb-2022   
Total Views |

सफरनामा


safarnama 

हे दुःख राजवर्खी, हे दुःख मोरपंखी

जे जन्मजात दुःखी, त्यांचा निभाव नाही

 

इम्तियाज अलीचा 'तमाशा' कितीही वेळा पाहिला तरी, सुरेश भटांच्या या राजवर्ख दुःखाची वीण पूर्ण उलगडत नाही. एकेक तागा उसवत जातो फक्त. चौकटीत रमणाऱ्या साध्या माणसांची दुःखंही साधीच असतात; पण जोवर त्यांना पिसाटाचं वारं शिवत नाही तोवरच.

 

२३ ला शिक्षण, २५ ला नोकरी, २८ ला लग्न, ३० ला मुलगा, ३२ ला मुलगी, ३५ ला प्रमोशन, ४० ला सेटलमेंट, ५३ ला मुलाचं शिक्षण, ५५ ला मुलीचं शिक्षण, ५६ ला मुलीचं लग्न, ५८ ला मुलाचं लग्न, ६० ला रिटायरमेंट, ६१ ला नातू, ६२ ला नात, ६५ ला ब्लडप्रेशर, ७० ला ज्ञानेश्वरी, ७२ ला दासबोध, ७५ ला आयुष्याचं सार्थक म्हणून कृतज्ञता सन्मान सोहळा वगैरे आणि ७८ ते ८० च्या मध्ये शांत, कृतकृत्य मृत्यु..... मध्ये एखाद-दुसरा किरकोळ अपघात, एखादं छोटं-मोठं ऑपरेशन किंवा भांडण.

वर्षानुवर्षं न बदलणारी ही ठिपक्यांची रांगोळी पुन्हापुन्हा गिरवत राहणं म्हणजेच जगण्याचं सार्थक होणं; पण काही माणसांचा स्वभावच जन्मजात दुःखी असतो, त्यांचा निभाव लागायचा कसा? ज्यांना करमत नाही चौकटीच्या कोंदणात, त्यांनी काय करायचं??

 

साधारण बारा-तेरा वर्षांपूर्वी कॉलेजमधून पास आऊट झालो.... कॉलेजमध्ये फार दिवे लावलेले नसल्यामुळे भविष्यातला अंधार गडद होताच, पण त्या वयातल्या माय लाईफ, माय रूल्सच्या भुतावळी डोक्यावर थैमान घालत होत्या, त्यामुळे आपण अगदीच 'हे' नाही आहोत, होईल बरं आपल्याही हातून काहीतरी, रादर, आपण करूच, ही रग आणि धग होती; पण लेखक होऊन जगाला आपल्या शब्दांनी घायाळ करण्याच्या स्वप्नाला पहिला सुरुंग लागला तो पहिल्या नऊ ते पाचच्या नोकरीनं. डोक्यात शेक्सपिअरपासून शंकर पाटलांपर्यंत सगळ्यांना घुमवत दिवसभर दारोदार फिरायचं आणि सिमकार्डस विकायची, असा दीनवाणा दिनक्रम सुरू झाला..... ॲड आणि पीआरमध्ये स्पेशलायझेशन केल्याचे हे भोग होते. बरं, निदान आपलं नऊ ते पाचचं काम तरी धड जमावं, पण तेही नाही..... दिवसांत सोडा, आठवड्यात तीन कार्डस विकली जायची नाहीत.... प्रचंड निराशा, अमाप फ्रस्ट्रेशन, जे मनापासून करायचं होतं त्यातून पैसे मिळणार नव्हते आणि जे पैसे मिळवायला करत होतो, त्यात मन रमत नव्हतं, पण मनाचे चोचले परवडणारे नव्हते कारण चौकट मोडायचं धाडस नव्हतं.

 

एकदा असाच दिवसभर वणवण फिरून संध्याकाळच्या वेळी एका दुकानाच्या कट्ट्यावर बसलो होतो. नेहमीप्रमाणेच दिवसभराचा सेल शून्य होता. एका पॉईंटला सगळंच अनावर झालं आणि मी बसल्याबसल्या आक्रंदून रडायला लागलो. आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि कोणी असतं तरी, तेव्हा मला पर्वा नव्हती कोणाची. सगळा राग, सगळं फ्रस्ट्रेशन, सगळी भडास त्या काही मिनिटांत बाहेर निघाली.

 

दुसऱ्याच दिवशी तो जॉब सोडला; पण प्रश्न होताच, पुढं काय? आईवडील बोलत होते, पण सपोर्टही करतच होते ना; पण किती वर्षं त्या जीवावर जगायचं?

 

काही काळानं वाटा मोकळ्या होत गेल्या, स्ट्रगल अजूनही आहे, पण त्याची धग काहीशी थंडावलीय आता. मुळात माझिया जातीचे अनेक वेडे या प्रवासात मला भेटत गेले. इंजिनिअरिंगची डिग्री सोडून तोंडाला रंग फासणारे, रिसर्च असोसिएट किंवा तत्सम भारदस्त नावाचं आणि पगाराचं माहात्म्य नाकारून खेड्यापाड्यात आनंदानं काम करणारे, डॉक्टरकीची उत्तम चाललेली प्रॅक्टिस सोडून लोकांना तालसुरांची इंजेक्शन्स देत फिरणारे, असे अनेक सुखात्मे मला या वाटेवर नाचत गात फिरताना दिसले; पण तो कट्टा आणि ती संध्याकाळ मात्र अजूनही अनेकदा माझ्या आयुष्यात येते. दर वेळी नवं रूप, नवीन गोष्ट घेऊन...

 

खूपदा माझा वेद होतो 'तमाशा'मधला. सगळं सोडून कॉर्सिकाच्या किनाऱ्यावर जाऊन डॉनसारखं मोनाची वाट पाहत थांबावंसं वाटतं किंवा कोणत्या तरी गोष्टी सांगणाऱ्या बुढ्याबाबाला गाठून माझ्या गोष्टीचा शेवट विचारावासा वाटतो. काठावर आडवं पडून आणि तळ्यात तोंड बुडवून प्राण्यांसारखं पाणी प्यावंसं वाटतं. ताराची सुंदर साथ असूनही उगीचच सार्थक निरर्थकाची धुळाक्षरं पुन्हा नव्यानं गिरवावीशी वाटतात आणि ती राजवर्खी दुःख पुन्हा एकदा डोक्यावर घेऊन मिरवावीशी वाटतात. आपलीच गोष्ट नव्यानं सांगावीशी वाटते. तीच कहाणी पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटते; पण शेवटी सगळं येऊन थांबतं ते एकाच वेशीजवळ.

 

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

तमाशा..... एक न संपणारा सफरनामा...... सफरनामा सवालोंका....

- अक्षय संत