दुमडलेल्या पानापाशी

युवा विवेक    05-Feb-2022   
Total Views |

दुमडलेल्या पानापाशी

आहे हे असं आहे

लेखिका - गौरी देशपांडे


ahe he asa aahe 

छोट्या साइजच्या १६७ पानांमध्ये लिहिलेल्या २४ कथांमधून तुम्ही असं कितीसं वेगळं सांगू शकाल? ३-४ पानांच्या प्रत्येक कथेत काय वेगळं मांडू शकाल? कोणताही आविर्भाव नाही.... कोणताही अभिनिवेश नाही... भाषेला कुठेही उगाच जड, अवघड केलेलं नाही आणि कुठेही बंध उगीचंच सैल केलेलं नाही. तरीही... तरीही तुम्ही हरखून जाता... 'एका वेगळ्या दुनियेत जाता...' असं मी अजिबात म्हणणार नाही; कारण, 'तिला' तुम्हाला वेगळ्या दुनियेत न्यायचं नाहीच आहे. तिला याच दुनियेतलं वेगळं काही तरी तुम्हाला दाखवायचं आहे. मात्र, ते दाखवतानाही 'हे मी शोधून आणलं.. हे तर इथे नव्हतंच....' असा तिचा अट्टहास नाही. तर, दुपारी चार वाजता चहा पीतपीत गप्पा मारत बसावं... सहज म्हणून मित्राला, मैत्रिणीला, बहिणीला, एखाद्या नातेवाइकाला काही तरी मनातलं बोलून जावं... त्याने ते ऐकून क्षणात काही तरी तोडगा काढावा किंवा सहज त्याची दुसरी बाजू सांगावी.... 'अरे हे आपल्याला कसं सुचलं नाही..' असं मनाशी म्हणत आपण त्याच्याकडे पाहत राहतो आणि तो मात्र खांदे उडवून हसून पुन्हा दुसरं काही बोलू लागतो..... हे पाहिल्यावर आपण चारच शब्द म्हणतो... 'आहे हे असं आहे'....!

 

गौरी देशपांडे यांनी लिहिलेलं 'आहे हे असं आहे...' पुस्तक म्हणजे रूपकात्मक आणि प्रतीकात्मक लेखनाचा अत्युत्तम नमुना आहे. 'बीटविन द लाइन्स'चा जबरदस्त वापर त्यांनी केलाय. मात्र, असं त्या जाणूनबुजून करत नाही, तर त्यांची शैली आहे, हे आपल्याला वाचताना कळत जातं. आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे... हे मांडत असतानाच समोरच्याला असंही वाटू शकतं, याचाही विचार त्या त्याच क्षणी करतात. त्यामुळे त्यांच्या या कथा कुठेही बोअर किंवा एकांगी होत नाही. कुठेही लांबड न लावता त्यांनी केलेलं हे लेखन आटोपशीर असूनही बंदुकीच्या गोळीसारखं थेट लक्ष्यभेद करतं.

 

१९८६ मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली. आजवर पुस्तकाच्या ७-८ आवृत्त्या निघाल्या आहेत. याचं कारण... गौरी देशपांडे यांनी निवडलेल्या कथा म्हणजे खरं तर अनुभव हे अत्यंत तुमच्या-माझ्या आणि सामान्यांच्या पातळीवरचे आहेत. त्या कुठेही 'दिव्य' काही तरी मी दाखवते आहे.. असा दावा करत नाही. उलट अनेकदा आपल्या स्वभावातील, वागण्यातील विसंगती त्या सहजपणे उलगडतात. स्वत:च्या स्वभावातल्या तिरकेपणावर बोट ठेवून सहज पुढे जातात. लेखक म्हणून हवी असलेली निर्लेप वृत्ती आणि लेखक म्हणून एखाद्या गोष्टीला धरून ठेवण्याची क्षमता यांचा अनोखा मिलाफ त्यांच्या लिखाणात आढळतो. या कथांमध्ये काय नाही? स्त्री म्हणून आणि माणूस म्हणून आलेले अनुभव.... प्रेम, राग, कौटुंबिक जबाबदारी, स्वतंत्र स्त्री, स्त्रीमुक्ती, समाज, सामाजिक धारणा, पालकांची भूमिका, पालक-पाल्यसंवाद... अशा अनेकअनेक कवडशांमधून ही कथा अंगावर घेता येते.. मग प्रश्न वाचकाला असतो की, त्याने कोणता किरण हाती धरून आपला प्रकाश शोधायचा. 

 

संग्रहातली अगदी पहिलीच कथा म्हणजे 'कावळ्या-चिमणीची गोष्ट!' शेणाचं घर असलेला कावळा मेणाचं घर असलेल्या चिऊताईकडे जातो आणि 'चिऊताई चिऊताई दार उघड', असं म्हणतो... ही गोष्ट आपण लहानपणापासून हजारदा ऐकलीय. मात्र, त्यात एका स्त्रीची हतबलता, एका पुरुषाचा स्वैराचार आणि स्त्रीने पुन्हा केलेला संघर्ष कसा दाखवता येईल.. याचा विचार आपल्याला अतर्क्य वाटेल.. मात्र तो या कथेत अतिशय सुसंगत वाटतो. अगदी असंच काहीसं मग काय झालं?, ओहोटी, जावे त्याच्या वंशा, कुणास ठाऊक अशा काही कथा वाचतानाही होतं. त्यामुळे त्या कथा 'आपल्या' वाटतात.

 

या कथा वाचताना माझी पहिली प्रतिक्रिया होती... 'मला यांना भेटायचं आहे...' इतकं सोपं कसं कोणी लिहू शकतं? सोपं; पण प्रभावी आणि कोणत्याही विशेषणांच्या मांदियाळीत न बसवता येणारं आणि तरीही आपलं वेगळेपण असलेलं असं काही वाचायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा. शांत व्हाल.. स्वस्थ व्हाल.. अस्वस्थ व्हाल... कदाचित तुम्हीही म्हणाल की.. 'मला ह्यांना भेटायचं आहे...' आणि ते आता शक्य नाही हे कळल्यावर तुम्हीच स्वत:शी म्हणाल 'आहे हे असं आहे...'!

- मयूर भावे