रुहदार

युवा विवेक    08-Feb-2022   
Total Views |
रुहदार
 

irfan khan 
 
कई चेहरें है इस दिल के
न जाने कौनसा मेरा....
सुरेख बदकं आणि कुरूप पिल्लू यांच्याबाबत आपली एक विचित्र थियरी आहे.... सुरेख बदकांच्या तळ्यात एकच कुरूप पिल्लू असतं आणि ते कायम वेडंच असतं.... का असं? बदकं सुरेख आहेत हे सांगणारं आणि त्यावरून एकाच पिल्लाला कुरूप आणि वेडं ठरवणारं पॅरामीटर नक्की सेट केलं कोणी? आपणच ना! दिसायला देखणा, एकाच वेळी पंधरा वीस जणांना धुवून रक्तहीन क्रांती घडवत तितक्याच देखण्या हिरॉईनला बगलेत घेऊन पळणारा आमचा चंदेरी सोनेरी रॉबिनहूड म्हणजे सुरेख बदक..... का? कारण जे आपल्याला हवं असून अप्राप्य आहे तेच आपण या स्वप्निल दुनियेत शोधतो ना.... हृतिक रोशन आणि कतरिना कैफ ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमधल्या सुंदर पर्वतराजीत गाणं म्हणत रोमान्स करताना पाहून आपली तबियत बहलते तशी नवाजुद्दीन किंवा केके मेननला पाहून बहलेल का हो.... अर्थातच, नाही!
 
 
इरफान खान....... याच कुरूपवेड्या पिल्लाच्या सिंड्रोमचा एक शापित अंश. इरफान किती ग्रेट अभिनेता होता हे मी वेगळं सांगायची गरज नाही, पण तरीही तो कुरूप पिल्लूच होता. त्याच्या सिनेमानं कोटीच्या कोटी उड्डाणे केल्याची फार कमी उदाहरणं असतील, पण आपल्याकडच्या बहुसंख्य नाही रे गटाचा तो सन्माननीय प्रतिनिधी नक्कीच होता. तो कधीच ब्रँडेड कपडे घालून ट्युलिप्सच्या बागांमध्ये फिरला नसेल, पण रापलेला चेहरा आणि कमालीचा अभिनय यांतून त्यानं पान सिंग तोमर आणि मदारीसारखे रोल्स जिवंत केले.
 
 
आपल्यासारखं दिसणारा, आपल्यासारखं बोलणारा, अगदी आपल्यातला वाटावा असा हा अभिनेता, पण दुःख या गोष्टीचं वाटतं की, आपल्या रॉबिनहूड कल्चरनं त्याला त्याचा योग्य ड्यू नाही दिला.. त्यानं इथं त्याचं स्वतःचं निश्चित असं स्थान निर्माण केलंच, पण आज विकी कौशल किंवा आयुषमान खुराना यांच्या वाट्याला येणारं क्लास आणि मास या दोन्ही स्तरांतलं अपील इरफानच्या वाट्याला नाही आलं. तो सर्वसामान्यांना आपला वाटणारा असूनही अभिनेता म्हणून खूपदा साईडलाईनवरच राहिला; पण आज या गुणी तरुणाईच्या वेगळेपणाला मिळणाऱ्या कौतुकाच्या, ग्लॅमरच्या मागे नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, केके मेनन, मनोज बाजपेयी ही नावं आणि त्यांचे संघर्ष पाय रोवून घट्ट उभे आहेत. अर्थात, एक गुणी, सशक्त अभिनेता म्हणून इरफाननं इंडस्ट्रीला त्याची दखल घ्यायला भाग पाडलं, हे मात्र खरं!
 
 
इथल्या वादविवादांपासून, गॉसिप मॅगझिन्सच्या चक्रव्ह्यूहापासून कायम अलिप्त राहूनही पिकू, जजबा किंवा न्यूयॉर्कसारख्या सिनेमांमध्ये त्यानं बच्चन, दीपिका, ऐश्वर्या, कतरिना यांच्यासमोरही ताठ उभा राहून आपलं नाणं खणखणीत वाजवलं. त्याच्या दिग्दर्शकांच्या यादीवरूनही त्याची अफाट विविधता लक्षात येते. मीरा नायर, कबीर खान, संजय गुप्ता, शुजित सरकार, तिग्मांशु धुलिया, अनुराग बसू, सुधीर मिश्रा, रजित कपूर, विशाल भारद्वाज, निशिकांत कामत, मधुर भांडारकर, अली अब्बास जफर आणि इतर अनेक जण.
 
 
लाईफ इन अ मेट्रोमध्ये तो एका सीनमध्ये कोंकणा सेनला म्हणतो, 'गाडी निकालो.... शहर के सारे सिग्नल्स ग्रीन हो, तभी मै गाडी निकालूंगा, डोन्ट वेट फॉर दॅट.' हे तो नाही, त्यानं स्वतः जगलेलं तत्त्वज्ञान बोलतं, तरीही आजपर्यंत त्याला त्याच्या पूर्ण क्षमतेचा रोल आपल्या इंडस्ट्रीकडून मिळू शकला नाही, ही खंत वाटत होतीच आणि तेवढ्यात तो सगळंच सोडून गेला.
एक मात्र खरं, हा माणूस योद्धा होता! मीरा नायरच्या सलाम बॉम्बेपासून पहिला लॉकडाऊन सुरू होण्याआधी आलेल्या अन्ग्रेजी मिडीयमपर्यंतचा प्रवास त्यानं स्वबळावर केला होता. कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देणं काय असतं, हे मी खूप जवळून पाहिलंय. त्याच्या या झुंजारराव वृत्तीमुळेच तो चिकनाचुपडा नसूनही नेहमी चार्मिंग वाटत आला.
 
 
थिएटरच्या जगातून सिनेमात आलेला हा कलंदर अवलिया आपला परफॉर्मन्स दाखवून दोन वर्षांपूर्वी पुन्हा विंगेत परतला.... काळाचे पडदे मोठे विलक्षण असतात, एकदा मिटले की पुन्हा उघडत नाहीत, पण सच्चे कलावंत मात्र त्या पडद्यांमागूनही स्मृतींमध्ये अजरामर होतात....
 
 
तळ्यात कितीही सुरेख पिल्लं असू देत, एका कुरूप वेड्या पिल्लाचंच गाणं होतं.....
बेचारा कहाँ जानता है, खलिश है ये क्या खला है
शहरभर की खुशी से ये दर्द मेरा भला है
जश्न ये रास ना आये, मज़ा तो बस गम में आया है
 
 
इरफान.... दोन वर्ष होत आली तरीही लिहिताना बोटं अडखळतायत, पण तुला भावपूर्ण श्रद्धांजली....
जाने तेरे शहर का क्या इरादा है
आसमान कम, परिंदे ज्यादा है.....
 
- अक्षय संत