कलाकारनामा

युवा विवेक    01-Mar-2022   
Total Views |

कलाकारनामा


artist 

सटवाईनं बघताक्षणी भाग्याची रेषा ओढायला लागावी असं भव्य कपाळ, एखाद्या चित्रकाराची किंवा वादकाची असावीत तशी निमुळती, लांबसडक बोटं, दिसायला अगदी मर्दानी वगैरे; पण तो ना चित्रकार होता ना वादक! हां, आता लोकांनी त्याची कला पार पाळण्यापर्यंत वगैरे नेऊन पोचवली होती, पण असं काही नसतं हो!जन्माला येतो तो माणूस आणि फक्त हाडामांसाचा एक माणूस. कलावंत जन्माला येत नसतात, ते पुढे जाऊन कलावंत होतात; पण हे असलं काही तो लोकांना सांगण्याच्या फंदात पडला नाही, कारण तशी वेळच आली नाही कधी! हां, आता काही लोकांनी चढवला त्याला उगीचच, काहींनी मुळंही उकरली त्याची त्याच्या कलेमधून, पण अशा वेळी फक्त हसायचा तो.

 

अगदी गोड हसून आकाशाकडे बोटबिट दाखवायचा. इतपत अभिनय यायलाच हवा प्रत्येक कलावंताला, असं म्हणायचा मनातल्या मनात; पण त्याला सगळ्यात जास्त कीव यायची ती याच असीम भक्तिभावाची. माणसाला माणूस म्हणून टिकू न देणारा, कलावंत म्हणजे कोणीतरी देवाच्या लेव्हलची असामी आहे, असं मन:पूर्वक मानणारा हाच तो पथेटिक भक्तिभाव. पत्रं, मेसेजेस, फोनकॉल्स, वशिले लावण्यासाठीची धडपड आणि यासगळ्यात डोंबाऱ्यासारखं चाललेलं त्याचं काम, त्याचं आयुष्य! माणूस जिवंतपणी उरतो तो फक्त आणि फक्त त्याच्या समाजमान्य चाकोरीबद्ध वर्तनानं आणि 'इमेज' नामक एका तद्दन फसव्या मृगजळानं, हे त्याला खूपच लवकर कळलेलं असल्यामुळे तो एकूणच पापभीरु वगैरे नव्हता.

 

जितका जास्त पापभीरू, तितका जास्त लोकप्रिय. 'कलेक्टिव्ह सायकॉलॉजी' नावाच्या प्रकाराची जडणघडणही असल्याच लोकांमधून होत असते. अगदी आपल्या प्रतिस्पर्धी कलावंताला समाजात असताना नावाजण्यापासून ते रूढ मूल्यांची जीवापाड जपणूक करण्यापर्यंत काहीही. अर्थातच, ही फक्त कलावंताची किंवा वलयाच्या आड लपलेल्या मुखवट्यांचीच जबाबदारी, कारण त्यांचा 'आदर्श' लोक घेणार ना! त्याला या आदर्श प्रकाराचा मनस्वी तिटकारा होता. तो माणूस होता हो आधी, मग कलावंत वगैरे म्हणजे त्याला चुकायला संधीच नाही. हा कुठला अजब न्याय आहे? प्रत्येकाची त्याची त्याची एक गोष्ट असते. प्रत्येकाचं त्याचं त्याचं एक चरित्र असतं, एक बायोपिक असतं.

 

कोणाचं प्रसिद्ध होतं, बाकीच्यांचं अंधारात विरून जातं..... ज्याच्या चुकाही आदर्शवाद उभा करू शकतात, तोच खरा चरित्रनायक! तोही चुकत गेला, रूढ होतं ते सगळं झुगारत गेला, त्याला पटलं तेच करत गेला, असं करत करत एक दिवस असाच मेला अन काही वर्षांतच त्याच्या घरापुढे रांगा लागल्या. 'बायोपिक करायला परवानगी मिळेल? पुतळा उभा करायचाय, कसं करायचं? त्यांचं चरित्र आलं नाही अजून, कधी येणार?' आणि बरंच काही! अरे हो, त्याला सुखानं श्वास सोडू द्या तरी, तसाही शेवटचाच आहे.

 

पण बरं झालं, तो लवकर मेला ते! जिवंतपणी शाप होण्यापेक्षा मरून वरदान होणं केव्हाही चांगलं, निदान, आपण काय होतो, हे आपल्यालाच कळल्यामुळे भोंदूपणाचे भोग सहन करण्यातून तेवढीच सुटका मिळते.

 

बाकी कलावंताचे आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात यावर ठाम श्रद्धा असणाऱ्या अनेक लोकोत्तरांना सादर नमन ! काळ कोणासाठी थांबत नाही, पण माणसंही थांबली नाहीत तर 'प्यासा'चा विजय काही अगदीच कालबाह्य म्हणता येणार नाही. सुज्ञास अधिक सांगणे न लगे!

- अक्षय संत