छोटी बहू

युवा विवेक    15-Mar-2022   
Total Views |

छोटी बहू

 
chhoti bahu

भारतीय सिनेमाच्या इतिहासात काही व्यक्तिरेखा रजतपटावर अशा काही सादर झाल्यात की, त्यांना अभिजाततेचा दर्जा आपोआपच प्राप्त झाला. 'दो बिघा जमीन'चा शेतकरी, 'प्यासा'चा विजय, 'शोले'चा गब्बरसिंग ही काही प्रातिनिधिक उदाहरणं! याच मांदियाळीतलं एक तेजोमय नाव म्हणजे मीनाकुमारीची 'छोटी बहू'!गुरूदत्त निर्मित आणि अब्रार अल्वी दिग्दर्शित 'साहिब बीवी और गुलाम' या चित्रपटातली ही अत्यंत गाजलेली आणि गुंतागुंतीची व्यक्तिरेखा. बिमल मित्र यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडे बंगालमधील जमीनदारी संस्कृतीच्या होत गेलेल्या ऱ्हासाचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळालं. आपल्यापैकी बहुतेकांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. यातील 'छोटी बहू'च्या व्यक्तिरेखेचा हा आलेख!

 

हमसा मजबूर ज़माने में ना होगा कोई

बात रोने की है और हमको हंसी आती है...

 

काळोखाचा निबिड डाग हवेलीच्या खिडक्यादारांना गच्च विळखा घालून बसलाय.... समोरच्या मैदानात नाचणारं कारंजही मलूलपणे पडलंय.... सगळ्या वाड्यावरच कसलीशी आर्त शोककळा पसरलीय.... एरवी दिवसभर गडी-नोकरांनी, माणसांनी आणि मोहिनी सिंदूराच्या लालीनं भरून येणारी हवेली रात्रीच्या वेळी मात्र एखादया स्मशानासारखी निःशब्द, नि:स्तब्ध होऊन जाते.

 

अशा वैराण शांततेवर चरे उमटवत जाणारे तिचे गूढ स्वर... तिच्या प्रत्येक सुरावर हवेलीचं काळीज चरचरून उठतं. तिचा भयाण एकटेपणा गडद होत जातो. त्याच वेळी तिकडे कोठीवर पेटी-तबल्याच्या आवर्तनांना ऊत आलेला असतो. छुमछुम वाजणारी पैंजणं आणि झुळझुळ वाहणारी शराबियत माहौल आणखी धुंदकुंद करत असते. रात्र जवान होत जाते नायकिणीच्या एकेका पदन्यासानं आणि आलापीच्या एकेका फिरकीनं..

 

साक़िया आज मुझे नींद नही आयेगी

सुना है तेरी महफ़िल में रत जगा है

 

जमीनदारांची ऐय्याशी क्षणाक्षणानं नवा रंग उधळत असते. हवेलीतल्या आपल्या बायका, त्यांची विस्कटलेली आयुष्यं आणि घुसमटलेली मनं यांचा मागमूसही त्या कैफाच्या आड येत नसतो. सगळं वातावरण नायकिणीच्या अदांनी धुंद झालेलं असतं.

हवेलीतल्या एका खोलीत बसलेली ती! तिचे अलता लावलेले गोरे पाय जमिनीवर अजागळपणे खात बसलेल्या भूतनाथच्या नजरेस पडतात आणि त्याच्या हातातला घास हातातच अडकून बसतो. पायांकडून वळत वळत त्याची नजर तिच्या राजहंसी डोळ्यांवर स्थिरावते.

 

'काय नसतं त्या डोळ्यात?' त्या हवेलीसारखंच काळंकुट्ट एकटेपण आणि त्यात दडलेली अनेक अनाम रहस्यं! क्षणभर असं वाटतं की, ती हवेलीच तिचं रूप घेऊन भूतनाथला सामोरी आलीय.

बिचारा भूतनाथ तिच्या सौंदर्यानं आणि लाघवानं गांगरून जातो; पण अजूनही तो तिच्या दुःखाशी अपरिचित आहे.

 

तिचं दुःख! गेली अनेक वर्षं रोज रात्री तिचा जमीनदार पती तिला सोडून जातो आणि ती त्याची वाट पाहत रात्ररात्रभर हवेलीच्या खांबांशी बोलत फिरते..... रीतच आहे तशी....

पण तरीही तिच्या आवाजातलं मार्दव आणि नजरेतली अपार करुणा कणभरही कमी झालेली नाही.....

 

रोते रोते शाम हुई है, कब तक अश्क़ बहाऊँ

बहते बहते थमते है दरिया, आँखें भी थम जायेगी

 

सकाळच्या वेळी रात्रीची ही सगळी धूळ वाऱ्यावर उडून जाते आणि पुन्हा एकदा हवेली गजबजते. त्या गर्दीत तिचं रितेपण कुठंतरी हरवून जातं; पण संध्याछाया उतरू लागतात, तशी तीही हळूहळू गडद होत जाते. भांगात रेखलेली मोहिनी सिंदूराची लाली अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी भळभळू लागते आणि एक दिवस सगळी लाजलज्जा सोडून, सगळे मानपमान पचवून ती भूतनाथकडे वारुणीच्या पेल्याची मागणी करते. भूतनाथ खूप प्रयत्न करतो तिला समजावायचा, पण ती त्याचं ऐकत नाही. त्या रात्री आपल्या पतीला रिझवण्यासाठी ती पहिल्यांदाच मदिरेचा प्याला हाती घेते. तरीही तिचा पती तिला धुडकावून निघून जातो. हलाहलाच्या घोटाघोटानं आयुष्य रिचवणारी ती शेवटी नियतीच्या हातातलं खेळणं होत जाते. हवेलीच्या अंताची ही सुरुवात असते.

 

न जाओ सैय्या, छुड़ाके बैय्या

कसम तुम्हारी, मैं रो पड़ूँगी

रो पड़ूँगी

 

डोळ्यांतल्या अश्रूंमध्ये मिसळलेला इश्काचा हा जहरी प्यालाच तिचा सगळ्यात एकनिष्ठ सोबती बनतो आणि सगळ्यात मोठा शत्रूही....

हवेलीचा एकेक चिरा कोसळत जातोय. तिचा पती अर्धांगानं लुळा होऊन घरात पडलाय. बाकीचे दीर हवेली घशात घालण्यासाठी श्वापदांसारखे फुसफुसतायत..... त्यांच्या स्वाभिमानशून्य बायका हिच्या करुण अवस्थेची कीव करताहेत. भूतनाथही आता हवेली सोडून शहरात निघून गेलाय. आणि अशातच एक दिवस ती आपल्या पतीच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी हवेलीबाहेर पडते आणि वाटेतच तिचा गळा दाबून खून होतो. हवेलीचा शेवटचा चिरा कोसळतो.

 

अनेक वर्षं जातात..... पडक्या हवेलीच्या ढासळलेल्या मातीत कितीतरी रहस्यं तशीच दफन होऊन पडलेली आहेत.

एक दिवस भूतनाथ त्या रहस्यांच्या शोधात हवेलीत परत येतो. एके ठिकाणी जमीन उकरताना त्याला तिचा सांगाडा सापडतो. ज्या हवेलीच्या अंधारात तिनं आपल्या सर्वस्वाची आहुती दिली, त्याच हवेलीत तिला अंतिम मोक्ष मिळाला. तशीही ती केव्हाच मेली होती. आता फक्त अवशेष सापडले, इतकंच.....

 

रुख़ के सिर सो गये हम आतिशी रुख़सारों पर

दिल को था चैन तो नींद आ गयी अंगारों पर

- अक्षय संत