मोहमयी दुर्बोध

युवा विवेक    19-Mar-2022   
Total Views |

मोहमयी दुर्बोध


grace19

चंद्र

मठात पाऊस नक्षत्रांचा, किनारलेल्या छाया

धुक्यात लपुनी बसे डहाळी पिकलेले फळ न्याया.

शब्दकळीवर कशास धरिशी सुन्न नभाचे भान?

माझा रावा भुलला कोठे त्याला शोधुन आण

शिल्प घडावे पुन्हा ढळावे पाषाणाच्या लहरी कृष्णकातळी झऱ्यात मेल्या घट भरताना पोरी.

ठार झडीची मळवट भरता भांग आडवा पडे

टिंबांच्या यात्रेतुन गळते शिवार नसले खेडे

कडेकपारीतून नाद ये टपटप जाई टांगा

भिंती हलता कळे न बिलगे कोण कुणाच्या अंगा

अस्थिवरचा केशर वारा नुपुर चांदणे मळके

मला कोवळी निद्रा देउन अंतराळ हो परके

तुझी पाकळी मिठी मोकळी दिठी धरी ना तोल

की दुःखाला चंद्र बोलवी मरणदरीतुन खोल...?

- ग्रेस

**

पावसाचं वर्णन नाहीये हे....! असं वाटेल कोणालाही. मात्र, 'पाऊस' म्हणून ज्या उत्साहाकडे, निसर्गाच्या प्रसन्न, ओलेत्या रूपाकडे आपण बघतो, त्याचं वर्णन हे नाहीच. हे आहे पावसासारख्या कोसळणाऱ्या, विरघळलेल्या नभाचं वर्णन... हे आहे 'गावं' म्हणून मिरवू न शकलेल्या एखाद्या वस्तीची खंत... हे आहे मिठीचा हक्क कायमस्वरूपी नाकारल्यानंतरच्या एखाद्या प्रियकराचं शल्य... त्याचं शीर्षक चंद्र आहे. कारण कदाचित, त्या चंद्रापाशीच तो भरून आलेला घनगोल रिता झाला असावा...! या अर्थाने या कवितेकडे पाहिलं जावं असं मला वाटतं...!

 

पाऊस बागेत, रस्त्यावर, आडोशाला, शेतात असा कुठेही नसून वैराग्याची साधना होणाऱ्या, 'इदं न मम'चा घोष करणाऱ्या मठात होतोय... मठ तो पाऊस अनुभवतोय. हा मठ आकाश समजला, तर त्यातून स्वयंसिद्ध होऊन, परिपूर्ण होऊन बाहेर पडलेलं ते परिपक्व फळ म्हणजेच तो चंद्र.... जो नेण्यासाठी धुक्यात लपून बसलेली डहाळी म्हणजेच रात्र आतूर झालीय...! मात्र, त्या क्षणी माझा चंद्र जाणार म्हणून आकाश उदास होतं... त्याची रात्र समजूत काढते... या अर्थाने आहे शब्दकळीवर कशास धरिशी सुन्न नभाचे भान? सुन्न होऊनही आकाशाने भान सोडलेलं नाही.

 

पाषाणाच्या 'लहरी' यात लहर म्हणजे हुक्की आणि लहर म्हणजे कंपन असे दोन अर्थ दिसतात. दोन्ही अर्थांनुसार दगडाची इच्छा जोवर नसते किंवा त्याच्यात ती कंपनच नसतात तोवर शिल्प घडणं-बिघडण्याचा खेळ सुरू राहणार. पावसाचा खेळ असाच तर आहे.. जो घडवतो आणि बिघडवतोही. पावसाचं असंच एखादं बिघडलेलं शिल्प म्हणून जन्माला आलेल्या झऱ्याकडे पाहून मुलींनी आकर्षित होऊ नये.... असं कसं होईल? मात्र, प्रवाहाच्या मोहात पडून पुढे गेल्यास मृत्यू अटळ म्हणून... मेल्या घट भरताना पोरी.

 

या पावसाची झड चैतन्यदायी, सुखद नाही.. म्हणून तिला म्हटलंय 'ठार झड' तिचं मळवट कोणी हो भरायचं?? ज्या कागदावर टिंबही नाही.. तिथे गाव निर्माण होईल, अशी आशा कशी करायची?? या टिंबाची यात्रा एकट्याचीच आहे....

 

भिंती हलता कळे न बिलगे कोण कोणाच्या अंगा...

ही ओळ मी काही वेळा गुणगुणली...? काय अभिप्रेत असेल? 'भिंती हलता' इथे मेख आहे... भिंती केव्हा हलतात हो... भूकंप किंवा पावसाचा जोरदार तडाखा किंवा तत्सम जबरदस्त आघात. त्या क्षणी कोण कोणाचा आधार घेतंय... कोण कोणाला धरतंय किंवा सोडतंय.. याचं भान कोणालाही नसतं. त्यामुळे 'बिलगणं' यात जरी मोह असला... ओढ असली तरी ज्या भिंतीच्या आडोशाला तिला मिठीत घेतलं होतं... उद्या तो आधार नसल्यावर, निखळल्यावर कदाचित स्थिती वेगळीही असेल. याला आत्मभान देणं म्हणावं का?

 

मृत्यूचा गंध ज्याला स्पर्शून गेलाय आणि ज्याने तो सहजपणे स्वीकारलाय त्याच्या अस्थींनाही केशर वारा आहे.. त्याच्यासाठी चांदणेही मळकेच असेल कारण आता तो या विश्वाशी जोडलेला नाहीच. समस्त अंतराळाला परकं करून शांत झोपणाऱ्या ताऱ्यासारखा तेजस्वी तो झालाय....!

 

अशा संपूर्ण विचित्र, व्यामिश्र आणि काहिशा संदिग्ध अवस्थेतही माझा तोल तेवढा गेला नाही... जेवढा तुझ्या मिठीत गेलाय.... तुझ्या उबदार मिठीत मी ती भिंत हलताना पाहिलीय.... टिंबातून निर्माण होऊ न शकलेल्या गावाची खंत मी तिथेच अनुभवलीय... मेल्या पोरी माझ्याकडे 'फसला फसला' असं बोट दाखवून हसताय असं मला वाटलंय... माझ्य अंगात एक 'ठार झड' खोलवर जाते, असं वाटलंय....

 

म्हणून...म्हणून आणि म्हणूनच सखये, माझ्या या दु:खाला तुझ्या मिठीचा चंद्र क्षणिक सुखाची शीतलता देण्यासाठी जरी पुन्हा पुन्हा खुणावत असली तरी... अता मलाच ती नकोय..... कारण, मला कळलंय...

 

मरणदरीतून खोल.... याचा अर्थ काय असतो ते....!

- मयूर भावे, पुणे