धागे

युवा विवेक    23-Mar-2022   
Total Views |

धागे


thread 

एका धाग्याला गाठ मारायला सुरुवात केली तर त्या गाठीमधूनच नवीन धागा तयार होतो. मग प्रश्न पडतो, सरळ चाललेल्या दोरीला गाठ मारायचीच कशासाठी? दोरीची लांबी कमी करायला? पण मग ती कापूनही कमी करता येते ना किंवा त्या बिरबलाच्या गोष्टीतल्यासारखं. एका रेषेखाली त्यापेक्षा जास्त लांबीची रेष मारली की, आधीची रेष आपोआपच कमी लांबीची ठरते. काही माणसं ही लांबी मोजण्यातच धन्यता मानतात, काही आखलेल्या रेषेवरून चालण्यात, तर काहींना चौकट मानवत नाही, तर काहींना चौकट सोडवत नाही. काहींचं नशीबच चौकटीतलं, पुन्हापुन्हा तिथंच येऊन अडकणारं, तर काहींची आयुष्यं एकाच बिंदूभोवती अखंड प्रदक्षिणा घालत घुमणारी. प्रत्येकाचे व्याप-ताप वेगळे, प्रत्येकाची सुख-दु:खं वेगळी, प्रत्येकाचा रंगढंग वेगळा! काळं-पांढरं ठरवायचं कसं आणि कोणी? आपण स्वतःकडे बघताना अनेक नजरांच्या कॅलिडोस्कोपमधून बघत असतो. प्रत्येक डोळ्यांत वेगळा रंग, प्रत्येक नजरेत वेगळी अपेक्षा! जसजशी नवीन नाती, नवी माणसं आपल्या परिघात प्रवेश करतात, तसतसा या रंगांचा, अपेक्षांचा गुंता वाढत जातो. पाय सुटता सुटत नाहीत आणि मग प्रश्न पडतो, या सगळ्यात आपण नेमके कसे आणि कोण आहोत?

 

परवा 'आहे मनोहर तरीही', वाचताना सुनीताबाईंचं एक वाक्य खूप खोल रुतलं.....'आपण म्हणतो की, आयुष्य सुंदर आहे किंवा सोपं आहे; पण कशापेक्षा? तुलनेला कायम दोन गोष्टी लागतात. आपल्याकडे समांतर असं दुसरं आयुष्य नसतं. 'मग तुलना करणार तरी कशाशी?' मग आपण म्हणतो, तुलना स्वत:शीच! त्या तुलनेची परिमाणंही एक तर आपणच स्वतः बनवलेली किंवा कोणी तरी अगदी नकळत्या वयापासून आपल्या मनात पेरून ठेवलेली.

 

कधी तरी आपलेच जुने फोटो बघताना किंवा एकांतात आपलाच माग काढताना स्वतःकडे नीट बघावं, मनातल्या विचारांचा, कल्लोळांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळी ते झालं असतं, तर मी असा नसतो, हा विचार हमखास मनात येऊन जातो आणि आपल्याच नकळत आपण स्वतःलाच स्वतःच्याच तराजूत तोलायला लागतो. कधी स्वतःवरच हसतो, कधी स्वतःवर नको त्या अपेक्षांचं ओझं लादतो, भरलेल्या जखमा पुन्हा पुन्हा उकरत राहतो, तर कधी नुसतेच स्वतःला जोखत राहतो स्वतःच्या आजच्या परिस्थितीनुसार. ही पण एक प्रकारची तुलनाच, पण शेवटी तीही निखळ तुलना न होता 'आपुलाची वाद आपणासी' इथेच येउन थांबते. आपलेच धागे आपल्याशीच जोडत बसण्याचा निष्फळ, अहेतूक खेळ!

 

आयुष्याशी जुळलेले अनाम, दृश्यादृश्य धागे जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत अखंड सोबत करतात. काही धाग्यांच्या गाठी चिवट असतात. सुटता सुटत नाहीत, काही धागे मात्र कधीच पूर्णपणे बांधले जात नाहीत, तरीही एकाच गाठीवर सगळं तोलून धरतात.

 

प्रेम, द्वेष, मत्सर, राग, लोभ, करुणा, आदर इत्यादी सगळ्याची शिदोरी आपण इथे येतानाच आपल्या बंद मुठींमध्ये घेऊन आलेलो असतो. जसजशा मुठी उघडतात तसतसं

'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे', हाच मंत्र आपण घोकत असतो.

 

शेवटच्या श्वासाला हात सुटे होतात. बोटं पसरतात, हातांवरच्या रेषा आणि बोटांमधल्या फटी स्पष्ट दिसू लागतात; पण आपल्याला नाही, इतरांना. हातांवरच्या रेषा बोटांमधून अलगद वाहत जमिनीवर पडतात आणि एक अस्पष्ट, अंधूक हाक येते. 'घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत.'

 

खेळ संपतो. रेषा संपतात. हात सुटतात. दोर तुटतात. धागे तेवढे मागे उरतात विस्कटलेले, लांबलचक धागे!

- अक्षय संत