ती आई होती म्हणुनी....

युवा विवेक    29-Mar-2022   
Total Views |

ती आई होती म्हणुनी....

 
alfred hitchcock

ते तुटके भग्न महाल,

ती अधुरी सांजविराणी

तो चंद्रही अविरत गाई,

भेसूर तमाची गाणी

 

तुटत जाणाऱ्या मनाचे आचके आणि लचके, दोन्ही भेगाळच! कुठे एखादा तुकडा लोंबतोय, कुठे एखादी गाठ विस्कटून पडलीय आणि या विच्छिन्न अवस्थेतलं मन रात्रीमागून रात्री एखाद्या कोसळत्या धबधब्यातल्या ओंडक्यासारखं वाहत रहातंय दिशाहीन!

 

काय असतं हो हे मन? कुठे असतं, कसं दिसतं, का असतं हे मन?? आईच्या कुशीत निजलेलं असतं? की, देहाच्या मुशीत थिजलेलं असतं? कधी पान्हयाला चिकटून उदास बसतं, कधी चार भिंतीत एकटून खदाखदा हसतं!

 

अंधारा वाडा चिरेबंदी.... भोवती रात्रीची तटबंदी..... एक दिवा जळत राहातो भगभगत्या खिडकीत, एक सैतान फिरत राहातो काळोखाच्या वेशीत. सैतान तरी कसं म्हणावं त्याला, आईच्या दुधानं अजून ओलावलेली जीभ, काळोखाच्या फांदीवरची अनवट एक तिरीप उसवत जाते रात्रीसारखीच एकेक मनाची वीण, अर्घ्य मागत फिरते तिथेच पिशाच्च, रोज नवीन.

 

काय झालंय त्याला, कसला अघोरी शोध, मन शोधतोय तो, मन अज्ञात, दुर्बोध! आईच्या असण्यात त्याचं मन आहे की, मनाच्या नसण्यात त्याची आई?

 

आई..... मन..... घर.... कोपरे..... पाण्यात विहरणारे मासे..... शॉवरमधलं रक्ताळ पाणी....अधुरी त्याची कहाणी..... मनकवडी एक कहाणी..... मन आणि आई.... आई आणि मन!

आल्फ्रेड हिचकॉकचा 'सायको' माणसाच्या मनाची गोष्ट सांगतो.... १९६० साली आलेला हा सिनेमा अनेक कारणांनी गाजला..... हिचकॉकनं अनेक छोटी-मोठी प्रतीकं या कथेत मोठ्या खुबीनं पेरली आहेत. शहरापासून दूर असलेलं, कधी एखाद्या रहस्यमय गढीसारखं, तर कधी ढासळून पडलेल्या खंडहरांमसारखं भासणारं ते एकाकी मॉटेल आणि त्यात राहणाऱ्या नॉर्मन बेट्सची ही गोष्ट! मनातल्या अतृप्त, अव्यक्त वासनांची, कित्येक दिवस-रात्री-महिने-वर्षं मनात कोंडून ठेवलेल्या हिंसेच्या वाफेची गोष्ट !

 

नॉर्मन बेट्सचं गूढ मॉटेल त्याचं जग आहे. त्याचा भयाण एकटेपणा त्याच्या बालपणाचे मागे उरलेले अवशेष, त्याचं त्याच्या आईशी असलेलं विचित्र नातं आणि ऑफिसचे पैसे चोरून पळता पळता त्याच्या जगात अचानक अडकलेली मॅरियन. एकाच जगाची दोन विरुद्ध टोकं. शॉवर घेत असताना मॅरियनचा एका गूढ व्यक्तीकडून अत्यंत निर्घृण खून होतो (आजही थरकाप उडवणारा सिनेमाच्या इतिहासातला एक क्लासिक मर्डर सिक्वेन्स) आणि तिथून कथेला वेगळाच टर्न मिळतो.

 

वरवर बघता एका खुनाची वाटणारी ही गोष्ट बघताबघता माणसाच्या मनाची गोष्ट होते. नाळेपासून देहाशी जुळलेली आई जेव्हा सगळं सोडून निघून जाते, तेव्हा तिचं वाट चुकलेलं हे लेकरू तिच्या नाळेलाच चिकटून बसलेलं आहे. ती नाळ तुटू नये म्हणून तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अगदी एखाद्याच्या थंड डोक्यानं केलेल्या खुनापर्यंत.

 

बाथरूममध्ये सांडलेलं मॅरियनचं रक्त पुसणाऱ्या नॉर्मनचा थंडावा आपलंच रक्त गोठून काढतो, पण शेवटी त्याच नॉर्मनबद्दल आपल्याला करुणा वाटते. त्याच्या घरातली एकेक वस्तू, ग्रामोफोन डिस्क्स, बाहुली आणि आईचा तो भयाण सांगाडा.... वर्षानुवर्षे जपून ठेवलेला. त्याच्या इतर अनेक रहस्यांसारखा.

 

आपल्या सगळ्यांच्यात एक 'नॉर्मन बेट्स' असतोच. लाट उसळण्याआधीच फुटत गेली, तर अशा फुटलेल्या लाटांमधूनच कधी तरी एखाद्या राक्षसासारखा तो बाहेर येतो आणि त्या क्षणी आपण आपले राहत नाही; पण तरीही 'नॉर्मन बेट्स' आपल्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे....

कारण, ती आई होती म्हणुनी....

- अक्षय संत