सवय वाचनाची...

युवा विवेक    05-Mar-2022   
Total Views |

सवय वाचनाची...


vachan 

एखादी गोष्ट सलग २२ दिवस केली की, त्याचं सवयीत रूपांतर होतं, असं म्हणतात. वाचन आपण लहानपणापासून करत असतो. खरं म्हणजे, वाचन करायला आपल्याला शिकवलं जातं. शाळेत, घरी, संस्कार वर्ग, प्रायव्हेट क्लास अशा विविध ठिकाणी वाचणं, लिहिणं हेच शिकवलं जातं. त्यामुळे आपण वाचतो, वाचायला लागतो; पण आपण 'वाचन' करत असतो असं नाही. आपल्याला लहानपणी करून दिली जाते ती अक्षरओळख, अंकओळख. त्या प्राथमिक ज्ञानाच्या आधारावर वाचणं सुरू होतं. पाठ्यपुस्तक, गोष्टींची पुस्तकं, वर्तमानपत्र, जाहिराती, दुकानांवरच्या नावांच्या पाट्या असं करतकरत वाचनाचा प्रवास सुरू होतो.

 

शाळा, कॉलेजच्या पुस्तकांची साथ सुटली की, अनेकांचं वाचन थांबतं. इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या वाढत्या वापरामुळे रोज सकाळी दारात येणारा पेपरसुद्धा अनेक घरांनी बंद केला. मासिक, वर्तमानपत्रे, ग्रंथालये यांच्या वर्गणीदारांची संख्या कमी झाली. पुस्तकविक्री कमी झाली. मात्र.... मात्र.... म्हणून सगळंच संपलं असं नाही. ज्यांची वाचनाची सवय टिकून आहे. वाचनात रमण्याचा आनंद ज्यांनी घेतलाय, त्यांना काहीही फरक पडत नाही. ते वाचन थांबवत नाही. म्हणून तर कागदी वर्तमानपत्र गेलं असेल, पण ई-बुक आलं. ऑडिओ बुक आले. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर विविध लेखकांच्या चाहत्यांनी त्यांचे वेगवेगळे ग्रूप्स उघडले. सुलेखन केलेल्या सुंदर इमेजेस शेअर होऊ लागल्या. छोट्याछोट्या ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे साहित्य माणसापर्यंत पोहोचू लागलं.

 

या गदारोळात वाचनाची सवय मागे पडली.... अशी तक्रार काही मंडळींची असते. त्या वेळी त्यांना काय अपेक्षित असतं? तर, शांत जागा, हातात आवडतं पुस्तक आणि मिळणारा निवांतपणा... हे त्यांना बहुतेक अपेक्षित असतं. घाईगडबडीच्या आताच्या काळात असा निवांतपणा कुठे मिळणार? ८-९ तासांची नोकरी आणि नोकरीनिमित्त करावा लागणारा साधारण १-२ तासांचा प्रवास यामुळे दिवसाचे १० तास अनेकांचे सहज जातात. यानंतर रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर थोडा वेळ तरी वाचन जमू शकेल का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारावा. याचं उत्तर 'हो' यायला हरकत नसावी. रोज आपण किमान अर्धा तास वेळ काढू शकतो. मिनिटाला एक पान या हिशोबाने जरी वाचन केलं, तरी अर्ध्या तासात तीस पानं होऊ शकतील. वेग कमी असेल, तरी वीस पानं व्हायला हरकत नाही. म्हणजे याचाच अर्थ रोज अर्धा तास याप्रमाणे जरी वाचन केलं, तरी दहा दिवसांत २०० पानाचं पुस्तक वाचून होईल. त्यामुळे वाचायला वेळ नाही, अशी सबब देण्याआधी स्वत:चं कठोर आत्मपरीक्षण नक्की करावं! दैनंदिनीत बदल करावा.

 

वाचायला सुरुवात केल्यावर आवडते विषय, आवडते लेखक, आवडती भाषा घ्यावी. मात्र, त्यात अडकून पडू नये. नाही तर एकसुरीपणा येतो. विशिष्ट भावविश्वात आपण अडकून पडतो. शब्दांचा रियाज वाचक म्हणून होत नाही. भावना, भावविश्व वगैरेला संकुचितपणा येतो. एकाच लेखकाने घालून दिलेल्या चौकटीत आपण अडकून पडतो. वाचक म्हणून ते घातक आहे आणि त्याहीपेक्षा घातक आहे ते माणूस म्हणून घडण्यासाठी. स्वत:ची जडणघडण, विचार, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, जबाबदारी पेलण्याची क्षमता हे सगळं वाचनातून येतं. नक्कीच येतं. फक्त त्यासाठी डोळसपणे त्या गोष्टींकडे बघणं आवश्यक असतं.

 

लेखक, कवी, चित्रकार अशा विविध कलाक्षेत्रात आणि पत्रकार, वकील, शिक्षक, संशोधक, शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अशा बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना अनेकदा कामाचा भाग म्हणून वाचावंच लागतं. त्या वेळी कामासाठीचं वाचन आणि आवडीचं वाचन अशा दोन पातळ्यांवर त्यांचा संघर्ष सुरू असतो. 'उगवत्या सूर्याकडे पाहिल्यावर डोळ्यांच्या व्याधी दूर होतात...' या शास्त्रीय विधानाप्रमाणेच 'वाचनाने माणूस घडतो...' हे विधान आहे. मात्र, एखाद्या सकाळी डोंगरावर वगैरेही जाण्याचे कष्ट न घेता सहजपणे खिडकीतून उगवता सूर्य बघाच. तो लालबुंद गोळा आपल्या तेजस्वी रूपाने तुमचा दिवस सुंदर करतो. मग डोळ्यांच्या व्याधी आपोआप दूर होतात. त्यासाठी वेगळं काही करावं लागतंच नाही. वाचनाचंही तसंच आहे. सलग काही दिवस वाचून बघा... ते शब्द त्यांच्या तेजस्वी रूपाने तुमचं आयुष्य रोज सोनेरी करतील. स्वत:तले बदल तुम्हाला आपोआप दिसू लागतील. स्वत:चे विचार बदलताय, काही गळून पडताय आणि काही नव्याने आत प्रवेश करताय असं तुम्हाला जाणवू लागेल. कोणतीही हानी नसलेलं 'वाचन' नावाचं व्यसन तुम्हाला जडेल आणि तुमचा 'व्यासंग' त्यातून वाढत जाईल. गरज आहे, ती सुरुवात करण्याची आणि नंतर स्वत:शी प्रामाणिक राहून स्वत:ला घडवण्याची...!

 

- मयूर भावे