'सामान्य माणसाशी माझी बांधिलकी'

युवा विवेक    07-Mar-2022   
Total Views |

'सामान्य माणसाशी माझी बांधिलकी'


bharat sasane 

पुणे : 'लेखकांनी भूमिका घ्याव्यात की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. कोणतीच भूमिका नाही, हीच आमची भूमिका आहे, असं अनेक लेखक म्हणतात. मात्र, लेखकांनी भूमिका घ्यायला हव्यात. त्या सुस्पष्टपणे मांडायला हव्यात. माझी बांधिलकी सामान्य माणसाशी आहे. त्यामुळे त्याला केंद्रबिंदू ठेवून मांडणी करणं ही माझी भूमिका आहे', असे विधान ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांनी शनिवारी केले. विवेक साहित्य मंचच्या वतीने सासणे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.

 

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्या हस्ते सासणे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विवेक समुहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबळेकर, विवेक समुहाचे प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर, विवेक साहित्य मंचच्या संयोजक डॉ. अर्चना कुडतरकर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

 
bharat sasane

डॉ. कुडतरकर यांनी सासणे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सासणे यांना त्यांचे लेखनविश्व, साहित्यामागच्या प्रेरणा, शैली अशा विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले. 'सुस्पष्टता आणि गूढ यातला भेद, फरक म्हणजेच जीवन आहे. मात्र, याही पलीकडे जीवनाला लाभलेली एक अतर्क्यता आहे आणि ती अतर्क्यता लेखकाला, कवीला आकर्षित करून घेत असते. सर्वसामान्यांच्या जीवनात गूढ आहे, याबद्द्ल अनेकांचं एकमत आहे. माझ्या कथा रूढार्थाने गूढ कथा नाही. मात्र, त्या कथांमध्ये गूढता निश्चित आहे. त्याचा शोध वाचकांनी, अभ्याकांनी घ्यावा.'

 

दृश्यात्मक लेखनशैलीवर सासणे यांनी या वेळी भाष्य केले. ते म्हणाले, 'मी पात्रांच्या डोळ्यांत कॅमेरा बसवून आजूबाजूला बघत असतो. कथेत येणारी पात्रे आपल्या आजूबाजूला वावरत असतात. जरा त्रयस्थ दृष्टीने किंवा तिसरा डोळा लावून आपण बघितलं तर, काही पात्र अगदी सहजपणे आपल्या कथाविश्वात येऊन सामावतात. माझ्या आधीदेखील अनेकांनी चित्रदर्शी किंवा दृश्यात्मक शैलीचा स्वीकार केला आहे.'

 

'प्रशासकीय सेवेत असून तुम्ही लेखन कसं करतात?' या श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सासणे म्हणाले, 'प्रशासकीय सेवेच्या महसूल विभागात काम करताना मी माणसांचे विविध नमुने पाहिले, दु:ख पाहिलं. माझ्याकडे येणारा अर्ज लघुकथा असते आणि जेव्हा त्याची फाइल होते, तेव्हा ती एक दीर्घकथा होते.'

 

'साहित्य संमेलनामध्ये साहित्यावर चर्चा व्हावी. त्यामध्ये राजकीय किंवा अन्य कोणत्याही बाबींचा खूप अंतर्भाव होता कामा नये,' अशी अपेक्षाही सासणे यांनी या वेळी व्यक्त केली. सासणे यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांनाही या वेळी सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदुला आवटे-पुजारी यांनी केले.

****

'बालसाहित्यातून अद्भूत रस वजा झाला'

'बालमानसशास्त्रानुसार कोणत्याही लहान मुलाला अद्भूत रसाची तहान असते. त्यातून अनेक लेखक, कलाकार वगैरे तयार होऊ शकतात. मात्र, अलीकडच्या बालसाहित्यातून अद्भूत रस वजा झालेला दिसतो. त्यामुळे मी अद्भूत रसावर आधारित कथा लिहिल्या. दुसरं म्हणजे, आपल्याकडच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे गोट्या, चंदू, फास्ट फेणे असे बालनायक खूप पुढे आले. मात्र, बालनायिका झाल्या नाहीत. परदेशात हे चित्र वेगळं आहे,' अशा शब्दांत सासणे यांनी आपली खंत व्यक्त केली.

****

'वाचक कुठे भेटतील याचा नेम नाही...'

'वाचक कुठे आणि कसे भेटतील याचा नेम नाही. सोशल मीडियावरच्या एका व्यक्तीने मला निदर्शनास आणून दिलं की, माझ्या कथा काही 'कॅफे'मध्ये वाचल्या जात आहेत. कॅफेमध्ये संगीत असतं, वादन असतं. मात्र, कॅफेत साहित्य वाचलं जातंय. त्यातही माझ्या दीर्घ कथा प्रकटपणे वाचल्या जात आहेत आणि त्यामुळे लोक भारावून जात आहेत. हे माझ्यासाठी खूपच हृद्य आहे', असेही सासणे म्हणाले.

****

सदर मुलाखत विवेक साहित्य मंचच्या फेसबुक पेज आणि युट्युब चॅॅनलवर बघता येईल...