‘ती’ची गोष्ट

युवा विवेक    08-Mar-2022   
Total Views |

तीची गोष्ट


she 

आडगावातलं एखादं घर.... माजघराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात धगधगणारी चूल..... आगीच्या ज्वाळांनी लालेलाल डोळ्यांतून निघणारं पाणी पदरानं पुसत हातातल्या फुंकणीनं चूल फुंकणारी ती !

 

उंचच उंच इमारतीचं बांधकाम चालू असलेली जागा..... रणरणत्या उन्हात डोक्यावर दगडविटांची घमेली वाहत एकेक पावलानं पुढं सरकणारी ती..... शेजारीच धुळीत फतकल मारून हातातला मातीनं माखलेला बर्फाचा गोळा चोखत बसलेलं तिचं किरटं पोर..... आणि शेजारी त्या पोरावर लक्ष ठेवत नाजूक बोटांनी धुळीत रेघोट्या ओढणारी त्याची मोठी बहीण.....

 

शेत-शिवारात किंवा बंगल्याच्या चार भिंतींत बाहुलीसारखी वागवली जाणारी, वासनेसाठी नागवली जाणारी ती भेगाळलेल्या टाचा घासत डोक्यावर पाण्याची कळशी घेऊन चालणारी ती.... रात्रीच्या अंधारात स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात अभ्यास करत बसलेली ती.... लोकल पकडायला जिवाच्या आकांतानं धावणारी ती, कडक ब्लेझर घालून बोर्डरूममध्ये प्रेझेन्टेशनला उभं राहणारी ती आणि रात्री आपल्या लेकराला कुशीत घेऊन जनाई-जिजाईची गोष्ट सांगणारीसुद्धा तीच !

 

ती.... असंख्य नावांनी, भावांनी, रूपांनी, नात्यांनी आपल्या आजूबाजूला सतत वावरणारी, जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपला हात धरून कधी मायेनं तर कधी धाकानं पुन्हापुन्हा खंबीरपणे उभं राहायला शिकवणारी ती ! आई, बहीण, मैत्रीण, मुलगी, आजी, बायको, प्रेयसी, शिक्षिका, आत्या, काकू, मावशी, मामी, बॉस.... आपले असे किती तरी भावबंध तीया एकाच सर्वनामाशी जोडलेले असतात.

 

यातल्या प्रत्येक तीचा चेहरा वेगळा, आवाज वेगळा, तिची गोष्ट वेगळी आणि तरीही तीएकच..... संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ नंदादीप लावणारी तीच आणि हातात काठी घेऊन भल्याभल्या गुंड-पुंडांना गुडघ्यावर आणणारी पोलिसी गणवेशातली तीच! वयात येण्याआधीच तिच्यातली प्रगल्भता एखाद्या कळीसारखी उमलून येते. जगाच्या आपल्यावर रोखलेल्या नानाविध भावनांच्या नजरा तिला फार लवकर उमजतात. बहराच्या अत्युच्च शिखरावरही तिच्यातली तृष्णा कृष्णेचं रूप लेऊ शकते आणि तरीही तिच्यातली अपार सृजनशीलता आयुष्यभर कोमेजत नाही. हाडामांसाचा माणूस जन्माला घालणं हे निसर्गानं तिला दिलेलं सगळ्यात मोठं देणं आहे, पण त्या देण्यातही नऊ मास नऊ रात्रींच्या गर्भकळांचा अभिशाप आहे; पण ती तो अभिशापही एखाद्या प्रसादासारखा मिरवते. म्हणूनच पुरुष कधीच कायावाचामने आई होऊ शकत नाही. पुरुषाला प्रेम समजून घ्यायचं असतं आणि तिला मात्र प्रेम व्हायचं असतं, म्हणूनच ती प्रेमात स्वतःला संपूर्ण समर्पित करू शकते. पुरुष मात्र त्या समर्पणाचं उत्तर शोधत राहतो.

 

कालानुरूप, समाजानुरूप तिचं व्यक्तिमत्व बदलत गेलं असलं, तरी निसर्गानं तिला दिलेले गुण मात्र कधीच बदलू शकत नाहीत. समर्पण, वात्सल्य, निष्ठा, विवेक आणि सृजन या पंचमहाभूतांनी बनलेलं तिचं स्त्रीत्व. आज प्रत्येक क्षेत्रात आणि जीवनाच्या प्रत्येक परिघात ती खंबीरपणे उभी आहे ती याच पाच गोष्टींमुळे! तिनं तिच्या बेड्या तोडल्या, तिनं तिची कुलुपं उघडली आणि तिनं तिचा रस्ता स्वतः शोधला. आज त्याच रस्त्यावर तिने आपल्या पाऊलखुणा अगदी अभिमानानं कोरून ठेवल्यात. तिच्या पावलांवर पावलं टाकीत आज अनेक महिला वाटचाल करताहेत. प्रत्येकीनं आपआपला किनारा शोधलाय, आपापला समुद्र निवडलाय आणि आपापल्या क्षितिजाकडे एकटक रोखून पाहत तीम्हणतीय 

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी.....

तिच्या समुद्राला एक काय, कित्येक जन्म अपुरे आहेत. ती पुन्हा पुन्हा जन्म घेते, नव्या रूपात, नव्या देहात, नव्या क्षितिजात..... ती.....!

जागतिक महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

- अक्षय संत