एक पत्र मंटोसाठी....

युवा विवेक    12-Apr-2022   
Total Views |

एक पत्र मंटोसाठी....


manto 

प्रिय मंटो,

बोल के लब आझाद है तेरे....

मंटो, तू अपेक्षित होतास की उपेक्षित, ह्या चर्चेपेक्षा तू होतास, ह्याचा आधार जास्त महत्त्वाचा, नाही का? तू गोष्ट होतास तुझीच. फक्त तुझी नाही, तुझी, माझी, त्या प्रत्येकाची, ज्याला तुझा आधार वाटतो या निराधार जगात. तुला आयुष्य कळलं होतं की, नाही, ठाऊक नाही; पण तुला जगता येत होतं, कारण तुला जगवता येत होतं.

 

खूप दुर्मीळ झालंय हल्ली हे जगता आणि जगवता येणं. माणसं म्हणजे तुझ्यासाठी गोष्टी होत्या तुझ्या आणि गोष्टी म्हणजे माणसं!

 

तू काय शोधत होतास, जे शोधत होतास तेच लिहीत होतास की, जे लिहित होतास, त्यातच तुझा शोधही सुरू होता, ह्याचा विचार तू केला नाहीस, ते काम तू अगदी निर्धास्तपणे तुझं लिखाण वाचणाऱ्या लोकांवर सोडून दिलंस आणि फक्त लिहीत गेलास. शोधत गेलास. पुन्हापुन्हा हेच करत गेलास. रक्ताळलेली मनं आणि पिसाळलेले मुर्दाड आत्मे हेच तुझ्या कथांचे नायक. त्यातून तू माणूस शोधत गेलास हाडामांसाचा. का रे बाबा? कशाला हवा होता तुला माणूस? काय मिळालं असतं माणसाला भेटून? पुन्हा तेच ना, मुर्दाड रक्तच!

 

भल्या माणसा, माणसात कसला माणूस शोधत फिरतोस रे? तो सापडणार थंड पडलेल्या मांसाच्या गोळ्यातच! तुला सापडला, पण तुला सापडलेला तो थंड मांसाचा गोळा 'माणसांना' रुचला नाही, पचला नाही आणि पुन्हा तूच अडकलास ना त्याच मुर्दाड सावल्यांच्या सापळ्यात.

 

कशाला असलं काही तरी सांगायला गेलास त्यांना? आणि काय मिळवलंस सांगून? पन्नास वर्षांनी उठून कोणी तरी, तुझी गोष्ट लोकांना सांगितल्याचं समाधान? कोणाची गोष्ट कोणाला सांगून किंवा कोणीही ती ऐकून ना सांगणारे बदलतात, ना ऐकणारे, हे तुलाही माहीत होतंच की!

 

तरीही तू सांगत गेलास, सांगणं थांबलं तेव्हा मरूनच गेलास. बहुदा, म्हणूनच मेलास. असो! तुझ्यानंतर तेंडुलकरांपासून कश्यपपर्यंत अनेक जण आले, कोर्टाच्या पायऱ्या चढले, उतरले आणि तुझ्यासारखंच काही ना काही सांगत राहिले.

 

शेवटी काय रे, गोष्ट महत्त्वाची! तात्पर्य नव्हे; मग ती तुझी असो वा कुलवंतची वा टोबा तेगसिंगची. गोष्ट महत्वाची!

 

मंटो, तू होतास.....तू अजूनही आहेस.... तुझ्या प्रत्येक शब्दाइतकाच चिरंतन आहेस!

बोल के लब आझाद है तेरे..!

- अक्षय संत