कुन फाया कुन

युवा विवेक    19-Apr-2022   
Total Views |

कुन फाया कुन

 
kun faya kun 

सूर बोलतात आपल्याशी. त्यांनाही त्यांची सुखदुःख असतात, त्यांचे आकार-उकार असतात, त्यांची भाषा असते. सुरांची भाषा सुरांनीच बोलली जाते. सुरांचं जग सुरांच्या नजरेनंच बघता येतं.

 

फार लहान वयात त्याला ही नजर मिळाली होती. बहुदा त्याला वय ही संकल्पना कळण्याच्या आधीपासूनच दैवी की काय म्हणतात, तशीच; पण गंधर्वांनाही त्यांचे म्हणून काही शाप असतातच. आठ-नऊ वर्षांचा होता तो. एक दिवस शाळेत एक फोन आला. मुख्याध्यापिका घाईघाईनं त्याच्या वर्गात आल्या आणि वर्गशिक्षिकेच्या कानात काहीतरी कुजबुजल्या. शिक्षिका त्याला म्हणाल्या, 'तुझ्या घरून फोन आलाय, तुला घरी जावं लागेल.' तो त्याच्या आयुष्यातला एक न विसरता येणारा दिवस आहे. वडिलांचा निष्प्राण देह समोर होता आणि स्वतःची म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स सोडल्यास त्यांनी मागे काहीही ठेवलं नव्हतं. वडील गेले. घरातला कमावता हात गेला. त्याला शाळा आवडत होती, पण तो शाळेत गेला तर कमावणार कोण? म्हणून नाईलाजानं त्याचं नाव शाळेतून काढून टाकलं आणि वयाच्या नवव्या वर्षांपासून तो वडिलांचे 'की बोर्डस' घेऊन वेगवेगळ्या म्युझिक स्टुडिओजचे उंबरे झिजवायला लागला. शाळेच्या जगातून बाहेर पडला तरी जगाच्या शाळेत भरपूर शिकायला मिळत होतं.

 

भारतबाला या मित्राबरोबर काही जिंगल्स केल्यावर मणीरत्नम नामक दिग्दर्शकानं त्याला पहिल्यांदा सिनेमाला संगीत देण्यासाठी विचारलं. त्याच्याकडे तर स्वतःचा स्टुडिओही नव्हता. एकेक गाणं करण्यासाठी तो दोन दोन, तीन तीन आठवडे घ्यायचा. इंडस्ट्रीत कुजबुज सुरू होतीच, एवढा वेळ लागतो का एका गाण्याला? अधूनमधून मित्र स्टुडिओला येऊन काहीबाही सल्ले द्यायचे. 'अरे, इथं ढोलकचा पीस टाक ना', 'तिथं बासरी छान वाटेल'; पण तो त्याला योग्य वाटेल तेच करायचा, पण पहिलाच सिनेमा असल्यामुळे त्याचाही गोंधळ उडत होताच. अशातच एक दिवस त्याच्या ऑफिसमधून त्यावेळचे टॉपचे सिंगर्स कुमार सानु वगैरे यांना फोन करून रेकॉर्डिंगसाठी विचारण्यात आलं. तोपर्यंत या दोघांनी त्याचं नावही ऐकलेलं नसल्यामुळे 'असेल कोणीतरी नवीन मुलगा....' म्हणून गायला नकार दिला. या सगळ्या गोंधळात अखेर १५ ऑगस्ट ११९२ या दिवशी त्याचा पहिला सिनेमा, 'रोजा' प्रदर्शित झाला अँड द रेस्ट इज हिस्टरी.

 

नव्वदच्या दशकात 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम' नंतर सगळ्यात जास्त गायलं आणि ऐकलं गेलेलं देशभक्तीपर गीत म्हणून 'भारत हमको जान से प्यारा है' ची नोंद व्हायला हरकत नाही. मुळात या गाण्यामागची कॉन्सेप्ट फारच वेगळी आणि भन्नाट होती. त्याला गाण्यातून असा फील निर्माण करायचा होता की, एका भागात आई आपल्या बाळाला अंगाई ऐकवत झोपवतीय आणि ते बाळ झोपी जात असतानाच हळूहळू क्रिसेंडो वाढत जातो आणि 'जागो' म्हणत टिपेला पोचतो. ते गाणं जर नीट ऐकलं, तर हा कॉन्ट्रास्ट प्रचंड अंगावर येतो. 'दॅटस टिपिकल रहमान टच'.

 

पूर्वीचं संगीत ऐकताना बरेचदा गाण्यातूनच संगीतकारांचं आयडेंटिफिकेशन करता यायचं.... जसं की, 'ग्रँड ऑर्केस्ट्रेशन' म्हणजे शंकर जयकिशन किंवा एक विशिष्ट ठेका म्हणजे ओ. पी. नय्यर! त्या त्या गाण्यात त्या त्या संगीतकाराच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली जाणवायची. रहमानची गाणी अशीच वेगळी काढून ओळखता येतात, याचं कारण म्हणजे त्यातली 'सुपर्ब मेलडी' आणि कमालीचं मिक्सिंग. खूप लोक म्हणतात की, रहमान टेक्नॉलॉजीच्या फार आहारी जातो, पण ही 'फॅक्ट' आहे की ए. आर. रहमान हा संगीतकार भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख देण्याचं काम गेली तीस करत आलेला आहे. 'मोझार्ट ऑफ मद्रास' ही सार्थ उपाधी त्याला उगीच नाही मिळालेली! त्याचा भारतीय लोकसंगीताचा अभ्यास बघायचा असेल, तर 'करिये ना...' किंवा 'राधा कैसे ना जले किंवा जिया जले ऐका.....' घटम हे एकच वाद्य त्यानं 'करिये ना' आणि 'जिया जले' या दोन्ही गाण्यांत किती वेगवेगळ्या पॅटर्न्समधून वापरलंय, ते बघा ! त्याची काही गाणी, तर फक्त मधल्या म्युझिक पीस किंवा त्याच्या व्होकल्ससाठी ऐकावीत. कमाल !

 

समोर अथांग समुद्र असावा... केशरी पिवळा सूर्य आभाळ आणि पाणी यांच्यामध्ये तरंगताना दिसावा... संध्याछायांची चाहूल यावी. वाळूवरची आपली पावलंही लाटांमध्ये विरत जाताना दिसावीत आणि अशा निमग्न वेळी कानात हेडफोन्स लावून बॉम्बे थीम लावावं किंवा हिमालयातल्या एखाद्या बर्फाळ रस्त्यावरून समोर चमचमणारी शिखरं बघत 'फिर से उड चला' ऐकावं किंवा अफाट एकटेपणा दाटून आलेला असताना दूर कुठून तरी 'कुन फाया कुन' चे सूर ऐकू यावेत, तेव्हा कळतं, सूर बोलतात आपल्याशी. त्यांचा बोलविता धनी 'तो' असतो.

 

- अक्षय संत