क्षण

युवा विवेक    26-Apr-2022   
Total Views |

क्षण


kshan 

आपण सगळेच थोड्या फार फरकानं खुनी असतो का? स्वत:चेच?क्षणाक्षणाला समोर येणाऱ्या 'मेक अ चॉईस'च्या हत्यारांना क्षणोक्षणी नव्यानं धार लावत जाणं म्हणजेच जगणं, इतकीच आपली आयुष्याची व्याख्या ! स्वप्नांचा दाबलेले गळे, इच्छांना दिलेली तिलांजली आणि आकांक्षांचं घातलेलं श्राध्द या सगळ्यात आयुष्य इतकं गुरफटून गेलेलं असतं की, 'तो' क्षण येईपर्यंत जाणीवांची दारं गंजून निकामी झालेली असतात. 'तो' क्षण ! सगळ्या चॉईसेसच्या, इझम्सच्या आणि ईकारांती भुतांच्या पलीकडचा तो क्षण! विजेसारखा येतो आणि वाऱ्यासारखा विरून जातो पुन्हा. प्रवाहाचं दान प्रवाहात मिसळून जातं आणि आपण मात्र हातात आठवणींचं आणि गेल्या क्षणाच्या पश्चातापाचं मळभ घेऊन पुन्हा जगायला लागतो. स्वत:चीच समजूत काढतो, नशिबात नव्हती त्या क्षणाची अनुभूती. अरे, नशिबात नसतीच, तर सामोरी का आली असती? तुम्ही साद ऐकली नाहीत हा दोष साद घालणाऱ्याचा कसा काय असू शकतो? अतर्क्य ! अतर्क्य आहे सगळंच ! तर्काच्या कसोटीवर न मावणारं आणि अर्काच्या पातळीवर न झेपणारं ! प्रत्येक आयुष्याचा रंग वेगळा, राग वेगळा आणि तो क्षणही वेगळाच. आयुष्य वाहात राहातं थेंबाथेंबानं. वरवर उडत राहातात तुषार भोगयोगांचे, आतमध्ये दडवून एक खोल, विराट पोकळी.... प्रत्येक वेळी स्वप्नांना सत्याचे प्रयोग जोडून पाहाण्याचा चिवट अट्टाहास नक्की कशासाठी करायचा? आपण यंत्र बनवायची ती आपल्या सुखाच्या गुलामीसाठी आणि त्या यंत्राचीच गुलामी आपल्या स्वप्नांवर लादायची, यात कसला आलाय उपभोग?

मुळात शारीर पातळीवरचा भोग म्हणजेच आयुष्याचा सार्थक उपभोग, हे मानणाऱ्या माणसांची कीव करावी की, आस्था तेच समजू नये, इतका वेग आपण आपल्याच शरीरमनात जन्माला आल्यापासून इन्जेक्ट करून घेतलाय आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत तसाच राहाणार, नव्हे, शेवटच्या श्वासालाही आपल्याशेजारी बसलेल्या आपल्या मुलाबाळांमध्ये तो आधीच रुजलेला असणार. आपल्यासारखेच तेही त्या क्षणाची वाट पाहाण्यात आयुष्य घालवणार, तो विजेसारखा येणार आणि वाऱ्यासारखा विरून जाणार पुन्हा आणि पुन्हा तेच! आठवणी..... पश्चात्ताप आणि जगत राहाणं..... आपण खरंच कोण आहोत नक्की?? कोण आहोत..... ??

- अक्षय संत