सुख आणि आनंद

युवा विवेक    05-Apr-2022   
Total Views |
सुख आणि आनंद
 

joy 

सुख आणि आनंद यांच्यात नेमका फरक काय असतो? मुळात काही फरक असतो की, नुसताच शब्दच्छल? काल माझ्या आईनं मला हा प्रश्न विचारला आणि क्षणभर काय उत्तर द्यावं, ते सुचेना. आनंद, एक भावना, तर सुख, एक वृत्ती अशा पारड्यात तोलून पाहिलं, पण तरी मूळ प्रश्न मात्र तसाच राहिला. नेमका फरक काय?? या दोन्ही शब्दांच्या वापरामधून काही सापडतंय का, तेही शोधायचा प्रयत्न केला, अजूनही करतोय. माणूस कायम सुख उपभोगतो, आनंद मात्र लुटतो. माणूस सुखाच्या मागे धावतो, पण आनंद मात्र मिळवतो.

माणूस सुखासीन असतो, आयुष्य आनंदी असतं. सुख शोधतात, आनंद अनुभवतात. सुख नांदतं, आनंद विहरतो; पण हे झाले केवळ शब्दांचे खेळ. त्यावरून रितीची कल्पना येईलही कदाचित, स्थितीचं काय?? सुखाला विरुद्धार्थी शब्द दु:ख !जणू सुखाची सावलीच ती ! पण मग आनंदाची अशी सावली कोणती? तिथेही दु:खच? सत्चिदानंद, परमानंद, यात सुख कुठे आहे? कृष्णानं एका पारड्यात ठेवलेलं सोनंनाणं, ऐश्वर्य, अगदी स्वत:चा देहही... आणि दुसऱ्या पारड्यात रुक्मिणीच्या तुळशीचं इवलंसं पान!भामेच्या आनंदावर रुक्मिणीचं तुळससुख वरचढ ठरलं, म्हणायचं की, रुक्मिणीच्या आनंदानं भामेच्या सुखाला शह दिला, म्हणायचं? प्रश्न खरंच अवघड आहे, पण कळीचा आहे. एकाच विठूरायाला पाहून 'सुख झाले हो साजणी' आणि 'आनंदाचे डोही आनंदतरंग' असं दोन्ही म्हणता येतं? अर्थातच, पण मग त्यांच्यात फरक तो काय उरला? एकदा सुख आनंदाकडे गेलं आणि त्याला म्हणालं, 'तुझी झोळी मी स्वत:च्याच अस्तित्वाने भरून टाकतो.' सुखाने आनंदाच्या पारड्यात स्वत:चं, सुखाचं, भरभरून दान टाकलं.

आनंद निरलसपणे ते दान स्वीकारत होता. एक क्षण असा आला, जेव्हा आनंदाची झोळी सुखानं भरून वाहू लागली, तरीही कांकणभर उरलेल्या सुखानं त्याला विचारलं, 'मी तर तुला माझं सर्वस्व दिलं, आता तू मला काय देणार?' इतका वेळ सुखाचं दान अलिप्तपणे स्वीकारणारा आनंद हसला आणि म्हणाला, 'तू मला तुझं सर्वस्व दिल्यानंतर माझ्यापाशी तुला देण्यासाठी तुझ्याशिवाय वेगळं काय उरलंय?' आणि काय सांगू ते काकणभर सुखही आनंदात अलगद विरघळून गेलं. आता सुख आणि आनंद यांच्यातला फरक ओळखणं म्हणजे महासागरातून एखाद्या विशिष्ट नदीचं पाणी वेगळं करण्याइतकं अवघड होऊन बसलंय. प्रश्नाचं उत्तर मिळण्यातच ज्याला सुख वाटत असेल, त्याला उत्तराचं उत्तर न शोधण्यातला आनंद कसा उमजावा.

- अक्षय संत