प्राजक्त

युवा विवेक    10-May-2022   
Total Views |


prajakta

झाडावरून प्राजक्त ओघळत राहातो. मंद वाऱ्यावर हलकेहलके झुलत राहातो आणि जमिनीवर येऊन विसावतो. फांदीच्या कडेवर डुलताना जाणवणारा इवल्या देहाचा भार वाऱ्यासोबत क्षणोक्षणी हलका होत जातो. त्याला आवाज नाही, त्याला शब्द नाहीत, परंतु हुंकार आहे, झंकार आहे ! जमिनीला टेकताक्षणी वेदनेची एक हलकीशी कळ उठते त्याच्याही छातीत आणि मागे उरते ती एक अनाम, अबोल स्तब्धता! कोमेजत जातानाचा मंद, उदास दरवळ..... प्राजक्तालाही असतं त्याचं एक आयुष्य. उमलण्याचं, दरवळण्याचं, फुलता फुलता गळण्याचं. एकदा गात्र गळली की, श्वास थांबतात, पण दरवळणं श्वासांपलीकडचं असतं ना ! सुगंधाचं कोडं फुलाला उमजत नाही, अस्तित्वाचं कोडं मनाला समजत नाही आणि तरीही फूल दरवळतं. मन विरघळतं. ओढाळलेल्या लाटा किनारा शोधत भटकत राहातात दारोदार, अर्थ शोधत राहातात आपल्याच असण्याचा आणि एका नाजूक प्राजक्तक्षणात तो अर्थ विजेसारखा चमकून जातो समोर! प्रत्येक गोष्ट त्यातल्या फायद्या-तोट्यासाठीच करायची असते का? झपाटलेपण नावाचं काही तरी असतंच ना? नाही तर समुद्रात आपलं सर्वस्व झोकून देण्यात नदीचा फायदा कोणता? आभाळ सोडून पर्वतांवर उतरण्यात धुक्याचा फायदा कोणता? फांदीचा आधार सोडून जमिनीकडे झेपावत आपलं विझतं अस्तित्व काही क्षण तरी सुगंधित करण्यात प्राजक्ताचा फायदा कोणता??तरीही हे असंच होत राहातं!

 

ऑक्टोबरमधल्या तीन ऋतूंच्या सीमारेषेवर एक प्राजक्त उभा असतो. त्याची त्यालाही जाणीव नसते, पण फुलत राहातो. कदाचित, म्हणूनच फुलताफुलताच एका क्षणी गळून पडू शकतो इतक्या निश्चिंतपणे ! एक दिवस कोणीतरी तो गळलेला प्राजक्तही वेचून घेऊन जातो. ओंजळ फुलांनी आणि सुगंधानं भरून घेऊन कोणाच्यातरी मनात, श्वासांत पुन्हा एकदा तोच प्राजक्त दरवळून उठतो. त्यालाही समाधान मिळतं आपल्या इवल्याशा आयुष्याच्या क्षणभंगुर सार्थकतेचं आणि तो पुन्हा एकदा गळत राहातो.... झाडावरून प्राजक्त ओघळत राहातो..... मंद वाऱ्यावर हलकेहलके झुलत राहातो..!

 

- अक्षय संत