अमीट आभा

युवा विवेक    24-May-2022   
Total Views |


amitabh

मार्च महिन्याचं रणरणतं ऊन.... दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती..... दुपारच्या वेळी बसनं रास्ता पेठेतल्या अपोलो टॉकीजला उतरलो.... दीडचा शो सुरू व्हायला काही मिनिटंच बाकी होती.... आतल्या अंधारात चार पाचच टाळकी होती.... बरोबरच आहे म्हणा, सिनेमा रिलीज होऊन सहा महिने झाल्यावर आम्ही थेटरात येत होतो. हो, त्या वेळी सहा महिन्यांनीसुद्धा सिनेमा थिएटरमध्ये असायचा. असो, तर अंधारात सिनेमाचं टायटल वगैरे झळकलं आणि अचानक अंगावर शहारा आला. हो, अंधारात चहूबाजूंनी एकच आवाज घुमत होता. फक्त त्याचा आवाज... 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन ये इस गुरुकुल के तीन स्तंभ है...' त्यादिवशी पहिल्यांदा मी अमिताभ बच्चन या माणसाचा आवाज थिएटरच्या डॉल्बी साऊंड सिस्टीममध्ये ऐकला. चित्रपट : मोहब्बतें!!

 

त्याहीआधी खूप लहानपणी संध्याकाळी खेळून घरी परतायची घाई केल्याचंही आठवतंय. का? तर 'हम'मधली शेवटची फायटिंग पाहायला किंवा टीव्हीवर 'जंजीर' पाहताना पुलावरच्या मारामारीच्या वेळी, फारसे सिनेमे न पाहणाऱ्या माझ्या आईलासुद्धा श्वास रोखून बसलेलं पाहिलंय मी. 'यारी है इमान मेरा' तर माझ्या आजोबांचं आवडतं गाणं होतं. थोडक्यात, त्याच्या आणि त्याच्या सिनेमांच्या प्रेमात असलेल्या तिसऱ्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे.

 

तसा तो दिसायला अगदीच साधारण. त्याच्या समकालीन हिरोजच्या मानानं तर अतिशय सामान्य. त्याच्याकडे विनोद खन्नासारखं तगडं शरीर नव्हतं, शत्रुघ्न सिन्हाची स्टायलोगिरी नव्हती, शशी कपूरचा कापूरगोरा रंग नव्हता आणि राजेश खन्नाचं रोमँटिक आर्जवही नव्हतं. त्याच्याकडे होती ताडमाड उंची, मांसाचा लवलेशही नसलेले गाल आणि गहिरे डोळे. 'आनंद'मध्ये राजेश खन्नाची अखंड बडबड सुरू असताना तो फक्त डोळ्यांतून बोलत होता. कदाचित म्हणूनच त्याचा शेवटचा आक्रोश आठवून आजही अंगावर काटा येतो. 'मौत तू इक कविता है, इक कविता का वादा है, मिलेगी मुझको..... ' म्हणणारी व्याकूळ प्रगल्भता साकारावी ती त्या घनगर्द आवाजानेच! त्याच्याकडे रूप नव्हतं, पण आवाज होता. कधी निखाऱ्यासारखा उसळून येणारा तर कधी क्षितिजाच्या अथांगतेत विरघळत जाणारा आवाज. 'जंजीर'मध्ये तो लाथेनं खुर्ची उडवत ओरडतो, 'जबतक बैठने के लिए कहा ना जाये, चुपचाप खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं' किंवा 'काला पत्थर'मध्ये तो नीतूसिंगबद्दल बोलताना म्हणतो, 'वो लड़की अंगूठी नही, इस बेबस और विरान जिंदगी में सपने बेचती है।' किंवा 'द लास्ट लियर'मध्ये तो अचानक उठून शेक्सपिअरच्या टेंपेस्टमधलं स्वगत म्हणायला लागतो किंवा 'मैं और मेरी तनहाई अक्सर ये बातें करते है' किंवा 'मदिरालय जाने को घर से, चलता है जब पीनेवाला....' किंवा.... नाही, असे कितीतरी क्षण आहेत त्या आवाजानं मंतरलेले.

 

पण अमिताभ म्हणजे फक्त आवाज नाही ना. अमिताभची शांततासुद्धा किती बोलकी असते, याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'सरकार राज'मधला बापलेकाचा हॉस्पिटलमधला सीन पाहावा किंवा 'सरकार'मधला शंकरनं विष्णूला मारल्यानंतरचा सीन. अगदीच मागे जायचं झालं तर 'मिली'मधला त्याचा एकटेपणा आठवून पाहा किंवा 'रेश्मा और शेरा'मधला मुका दीर. अँग्री यंग मॅन म्हणून काळजातला अंगार सतत ओकत राहणारा आणि ढिश्यूम ढिश्यूम या दोन शब्दांपलीकडचा अमिताभ या काही क्षणांत असा काही झळाळून उठतो की वाटतं, नाही, हाच खरा अमिताभ आहे. त्याच्या मूळ स्वभावातली संयत शालीनता त्याच्या पडद्यावरच्या इमेजला जेव्हा जेव्हा क्रॉस करत राहिली, तेव्हा तेव्हा कदाचित त्या धाडधूड हाणामारीच्या आणि स्टायलाईज्ड डायलॉगबाजीच्या रखरखीत वाळवंटात ही अशी निःशब्द मृगजळं उमलत गेली असावीत. शांततेतला हा एक्स्ट्रीम एलिगन्स हिंदी सिनेमाच्या पडद्यावर बलराज साहनी किंवा गुरुदत्त हे तुरळक अपवाद वगळता खूप दुर्मीळ आहे.

 

एकेका पिढीच्या जगण्याचा दस्तावेज मांडताना सिनेमामाध्यमानं अनेकदा कूस बदलली आहे. समाजाचा वारसा जपण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचं कामही सिनेमानं अनेकदा केलेलं आहे. एक काळ बलराज साहनीनं साकारलेल्या शेतकऱ्याच्या मूक रुदनाचा होता, काही काळानंतर त्याचंच रूपांतर अमिताभच्या अँग्री यंग मॅनमध्ये झालेलं दिसलं. त्याअर्थानं म्हणायचं तर मला बलराज साहनी आणि अमिताभ हे दोघेही एकेका काळाचे प्रतिनिधी वाटतात. अभिनयच नाही, तर दोघांचा काळ, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला सुसंस्कृतपणा, चेहऱ्यावरचं बुद्धिमत्तेचं तेज अशा अनेक गोष्टी समान असल्या तरी बलराज साहनी दिसायला काहीसे अरिस्टोक्रॅट असले तरी विचारांनी पूर्ण समाजवादी होते आणि अमिताभची स्क्रिन इमेज कितीही अन्यायाविरुद्धचा मसीहा अशीच उभी राहिली असेल तरीही तो खऱ्या आयुष्यात टिपिकल अरिस्टोक्रॅट असल्याचेच पुरावे जास्त आहेत.

 

अमिताभ.... अमिताभ..... अमिताभ काय आहे नक्की? अमिताभ हा एक न संपणारा जादूटोणा आहे. अमिताभ नावाचं गारुड कधी उतरूच शकत नाही, कारण त्यावर उताराच नाही. सैगल, दिलीपकुमार, राजेश खन्ना, अमिताभ, शाहरुख यांच्यानंतर गेल्या वीस वर्षांत काही काळापुरता हृतिकचा अपवाद वगळता 'सुपरस्टार' हा मान कोणालाच मिळू शकला नाही आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळात ते अवघडही आहे. आणि जिथं सुपरस्टारडमचीच मारामार, तिथं मिलेनियमचा महानायक वगैरे तर विचारच नको करायला.

थोडक्यात काय, अमिताभ बच्चन या साडेसात अक्षरी अमीट आभेला अस्ताचा शाप नाही. जोवर शांततेला हुंकार आणि असंतोषाचा एल्गार अस्तित्वात आहे, तोवर अमिताभ अजरामर आहे.

अक्षय संत