'तिपेडी' दान...

युवा विवेक    04-May-2022   
Total Views |

'तिपेडी' दान...


weni 

मी म्हणतेय खरं की, वेणी तिपेडी घाला; पण आता थोडे दिवस शक्य नाही ते. कापून टाकलंय ना मी तुम्हाला... पहिल्यांदा किती नाराज झाला होतात माझ्यावर! 'लेकीच्या डोक्यावर आम्ही छान लांबसडक वाढलो होतो, तर तुला काय अधिकार आमच्यावर कात्री चालवायचा?' असं तुम्ही सरळसरळ विचारलं नसलं, तरी तुमच्या मनातला हा प्रश्न मी ओळखला होता बरं ! म्हणून तर तुम्हाला कापण्यामागचं कारण समजावून सांगितलं होतं. ते कारण कळल्यावर मात्र अभिमानाने फुलून गेला होता ना? मग...उगाच का तुम्हाला त्रास देईन मी?

 

माझ्या लेकीची आणि तुमची किती छान गट्टी होती रे! जाड केसांची देणगी तिला मिळाली होतीच. त्यात लांबसडक वेणीची तिला आवड! म्हणून तर तुम्हाला मला हात लावू दिला नाही कधी तिने. हात लावू दिला नाही; म्हणजे कापण्यासाठी म्हणतेय हं मी. नाहीतर रोज तिच्या वेण्या घालायचं काम मीच तर करायचे. बाप रे! किती ते दहा मिनिटांचं काम जेमतेम. मात्र, हात जाम भरुन यायचे तिच्या वेण्या घालताना. तुम्हाला खुदुखुदू हसू यायचं, पण माझी अवस्था काय व्हायची माझं मलाच ठाऊक! किती रे जाड होता तुम्ही. हातात मावेपर्यंत पुरेवाट व्हायची आणि त्यात परत लांबच्यालांब. भांग पाडून, जटा काढून, वेण्या घालून होईपर्यंत दम लागायचा मला. आताही जटा म्हटलं नि काटा आला अंगावर. तुम्हाला धुतल्यानंतर तर कायबोलायचं काम नाही. हलकेहलके जटा सोडवणं हा एक मोठा प्रकल्प असायचा. आहे ना लक्षात? त्यात लेकीचं लक्ष दुसरं कशात असलं, तर तुमच्याकडे जरा दुर्लक्ष व्हायचं तिचं. मग काय ! मस्त जुंपायची आमची; पण तिच्याबरोबर तुम्ही किती छान दिसायचात रे! त्या जाड-जाड दोन वेण्या, एकीत मस्त मोगऱ्याचा गजरा, नाहीतर एखादं चाफ्याचं फुल. नजरेसमोर येताय रे सारखे. तुम्हाला माहीतेय…. फोटो काढून ठेवलाय मी तुमचा. तुमची आठवण आली ना, की मग बसते फोटो पाहत.

 

काय म्हणताय? 'एवढं प्रेम होतं तर कापलं का आम्हाला?" अरेच्चा...परत त्याच प्रश्नावर आलात का? पण मला पक्कं माहितेय बरं का...आता हे असं म्हणताय ते लटकं रुसूनहो ना? कोणाच्या उपयोगी पडणार असू, तर स्वतःचा जीव द्यायला तुम्ही तय्यारच असणार. अगदी आनंदाने तयार असणार याची मला खात्री होती ना; म्हणून तर कात्री लावली ना तुम्हाला! आणि माझी ती लाडाची लेक...तिचं तुमच्यावर किती प्रेम होतं हे का मी सांगायला हवं तुम्हाला? आठवतंय ना...? शेंड्या कापू या म्हटलं तरी तुम्हाला किती गच्च धरुन ठेवायची ते. तिच्याबद्दलही मला खात्री होतीच, केस कापण्यामागचं खरं कारण कळलं की, ती ही बिलकुल नाही म्हणणार नाही. तसंच झालं ना.

 

पण एक सांगू…? लवकरच तुम्हाला एक दुसरी मैत्रीण मिळेल, जिच्या डोक्यावर तुम्ही दिमाखाने मिरवू शकाल आणि तीही तुमच्या सोबतीने दिमाखात समाजात वावरू शकेल. तुम्हाला कल्पना आहे की, नाही मला माहीत नाही, पण केसांशिवाय वावरणं अवघड असतं रे. मग केस जाण्यामागचं कारण काहीही असो. ज्यांना कॅन्सरसारखा आजार असतो ना त्यांच्यासाठी तर डोळ्यात पाणी येतं. आधीच त्या आजारामुळे शारीरिक त्रास, त्यात केमोमुळे केस गळायला लागले की, होणारा मानसिक त्रास वेगळाच. मला माझ्या लेकीचा आणि तुमचा अभिमान वाटतोय की, अशा कॅन्सर पेशंटच्या मदतीसाठी तिने तुम्हाला पाठवून दिले आहे. तुमचीही छाती फुलून आलेय ना? हे बघा..जेवढ्या निगुतीने तिने तुम्हाला पाठवलं आहे ना तितक्याच निगुतीने तुमची पुढची प्रक्रिया होईल बरं ! तुमच्यापासून एक छानसा विग तयार होईल आणि या मैत्रिणीसारखीच दुसरी कोणी मैत्रीण तुमच्यासकट मिरवायला तयार होईल बघा. तिलाही आपलं समजून रहाल ना तुम्ही तिच्याबरोबर? तुम्हाला माहितेय का... आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, तर त्यासारखी सुखाची दुसरी कोणती गोष्ट नसते रे. लवकरच घ्याल तुम्ही तो अनुभव. मग मला सांगा कसं वाटतंय ते. माझ्या छोट्या लेकीच्या दृष्टीने तिचे आवडते लांबसडक केस कॅन्सर पेशंटसाठी दान करणं ही मोठी गोष्ट असेल... आहेच!पण आपल्याला अशा किती सहज करता येणाऱ्या गोष्टी असतात की ज्या दुसऱ्या कोणाच्या उपयोगी पडू शकतात. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजासाठी आपण काही देणं लागतो हे अंगात भिनवलं पाहिजे रे सगळ्यांनीच. त्या दृष्टीने विचार केला ना तर मला लेकीचं खूप कौतुक वाटतंय बघा आत्ता.

 

एक सांगू का तुम्हाला? तुम्हाला हे पत्र लिहायला घेतलं ते फक्त यासाठीच नाही बरं का. इतर बऱ्याच जणांकडून हे वाचलं जाणार आहे ना, तर यातून अजून कोणाला अशी कृती करायची इच्छा झाली ना तर मला आनंदच होईल रे. म्हणून खरं तर हा पत्रप्रपंच मांडला आहे. पटलं ना तुम्हालाही? सगळ्याच गोष्टी काही आपल्याला माहीत असतात असं नाही ना. मग चांगल्या गोष्टींचं पीक आपल्याकडून फोफावलं, तर उत्तमच आहे ना! तुम्हाला कुठं पाठवलं ते पोचल्यावर कळेलच तुम्हाला! इतरही लोक त्यांच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन असं सत्पात्री दान देऊच शकतात. मदत करू शकतात आणि हो तुम्हीसुद्धा इथून पुढं जिच्याबरोबर राहाल ना तिथं सुखी रहा आणि तिलाही सुखी करा.

 

तुमच्या वाढण्याची वाट पाहणारी मी

(विशेष सूचना : कॅन्सर किंवा अन्य रुग्णाला देण्यासाठी म्हणून तुमचे केस कमीतकमी 12 इंच लांब असावेत. केसांना कोणताही कृत्रिम रंग लावलेला नसावा. केस कापण्याआधी शाम्पू आणि कंडिशनर करून जेवढे कापायचे आहेत तिथे रबर लावून खाली वेणी घालावी. वेणी घालून झाल्यावर परत रबर लावावा. कापलेले केस म्हणजे वेणी प्लॅस्टिक बॅगमध्ये नीट पॅक करून त्यावर आपला पत्ता, मेल आयडी आणि मोबाईल नंबर लिहून अशा प्रकारचे विग तयार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये द्यावेत. खाली जमिनीवर पडलेले केस डोनेट करू नयेत, त्याचे विग होत नाहीत.)

- जस्मिन जोगळेकर