सागरास….

युवा विवेक    01-Jun-2022   
Total Views |


sea

"आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे

निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे

हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे…"

 

कवी कुसुमाग्रजांची ही सुंदर कविता आज वाचली आणि मला तुझी तीव्रतेने आठवण यायला लागली. खरं तर आठवण आली म्हणणं चुकीचंच होईल. कारण आठवण येण्यासाठी मुळात विसरायला हवं ना! तू तर अगदी कायमचा माझ्या मनात घर करून बसला आहेस आणि आठवण आली म्हणून लग्गेच तुझ्याकडे धाव घेण्याएवढी मी तुझ्याजवळ राहत नाही ना… म्हणून मग दुधाची तहान ताकावर भागवावी म्हटलं, त्यासाठी हा पत्रप्रपंच.

 

लहान असताना मला वाटणारी तुझी भीती ते आता वाटणारी अनिवार ओढ असा हा माझा प्रवास आहे. हसायला काय झालं? खरंच सांगतेय. खूप भीती वाटायची मला तुझी. तुझी एखादीही लाट पोहोचणार नाही अशा ठिकाणी मी उभी राहायचे. एवढंच नाही तर पाण्यात गेलेल्या सगळ्यांना सारख्या हाका मारत बसायचे. ते परत येइपर्यंत अक्षरशः जीवात जीव नसायचा. किनाऱ्यावर नुसतीच उभी राहणार म्हटल्यावर अर्थात सगळ्यांच्या चपला, पिशव्या सांभाळायचं काम लागायचं मला. तक्रार कधीच नव्हती त्याबद्दल, पण आत गेलेले लवकर बाहेर परत येत नाहीत ही मात्र जोरदार तक्रार असायची. एवढं रमण्यासारखं काय आहे तुझ्यात हे तेव्हा कधी कळलं नाही. आणि आतात्या राधेला जशी कृष्णसख्याची ओढ ना, तशी तुझी मला! अचानक एवढा प्रिय कसा झालास ते कारण मात्र माहीत नाही हं मला आणि मी जाणून घ्यायचा प्रयत्नही केला नाही कधी. तुझ्यात जीव पूर्ण गुंतलाय हे मात्र खरं. तू सोबत असलास की किती शांत वाटतं! आपला प्रिय सखा, पाठीराखा आपल्यासोबत कायम आहे ही जाणीव होत राहते सारखी. 'काय जादू केलीस माझ्यावर?' असं मुळीच विचारणार नाही तुला. जीव लावावा असा आहेसच रे तू. नुसता प्रेमात पडावं असाच नाहीस तर तुझ्याकडून खूप काही शिकतेय रे मी. हं... आता उगीच आश्चर्याचे भाव आणू नकोस हं चेहऱ्यावर. तुला माहितेय हे... कितीदातरी बोललेय मी हे तुला.

 

मला तुझं सगळ्यात काय आवडतं माहितेय? तुझ्या पोटात तू कधीच काही साठवून ठेवत नाहीस. नको असलेलं सगळं लाटांबरोबर किनाऱ्यावर फेकून देतोस आणि स्वतः परत पहिल्यासारखा स्वच्छ, नितळ होऊन जातोस. असं वागण्याचा प्रयत्न करायचाय मलाही. वाईटसाईट विचार, कोणाबद्दल राग, द्वेष सगळं सगळं मनातल्या लाटांद्वारे बाहेर टाकायला बघते, पण कधी कधी परतणाऱ्या लाटेबरोबर थोडंफार परत आत येतं रे. मनातली ती परतणारी लाट तुझ्या लाटेसारखी निर्मळ कधी होईल याची वाट बघतेय मी. जमेल ना मला? आणि किनाऱ्याकडे जाणारी तुझी ती फेनिल लाट किती आक्रमक असते रे! तेवढीच परत जाणारी लाट मात्र एकदम शांत… वरवर कितीही खळबळ जाणवली तरी आतून शांत आहेस का रे? मला ना एकदा तुझ्या अंतरंगात शिरून पाहायचंय. आतून असं शांत राहून घेतलेले निर्णय कधीही योग्यच ठरतात ना! व्हायला पाहिजे बघ तुझ्यासारखं. आणखी एक सांगू? मला तुझ्या किनाऱ्यावर असते ना ती मर्यादवेल फार आवडते. तिच्या बाहेर लाट जाऊ द्यायची नाही ही मर्यादा तू स्वतःवर घालून घेतली आहेस ना? इतका अथांग, अफाट असणाऱ्या तुला ती नाजूकशी वेल भारी पडतेय बरं का! मग कधी कधी वाटतं आम्ही माणसांनी अशी मर्यादा स्वतःवर घालून घेतली, त्याप्रमाणे वागलो तर ही दुनिया किती आनंदी होईल ना! पण...


हा जो 'पण' असतो तोच मेला दुष्ट असतो. तू शांत असतोस तेव्हा तुझ्यासारखं गुणी बाळ जगात दुसरं कोणतंच नसतं. पण एकदा का खवळलास तर तुला शांत करायची ताकद कोणातच नसते. तुझं ते रूप मात्र मला घाबरवून सोडतं बरं का. गावच्या गावं, कित्येक माणसं, बागांच्या बागा यांचा स्वतःहून नैवेद्य घेतलास तरी शांत होण्याचं नाव घेत नाहीस. काय होतं असं अचानक तुला? मला जसा तू प्रिय आहेस, तशीच बाकी दुनियाही प्रिय आहे. तू खवळल्यानंतर झालेलं नुकसान पाहिलं की, उन्मळून पडायला होतं रे. अर्थात यात मी तुला दोष बिलकूलच देणार नाही. तू उगीचच कोणाच्या वाट्याला जाणार नाहीस हे पक्कं माहितेय मला. ही सगळी आमच्याच भाईबंदांची करणी. लोभापासून माणसाची जर सुटका झाली तर सगळं सुरळीत होईल. आता परिस्थिती हाताबाहेर चाललेय कळतंय मला पण तरीही… कधी आणि कसा सुधारणार रे माणूस? तुझ्यासारखं होता यायला हवं बघ. इतका मोठा पसारा तुझा पण गर्व नाही अजिबात. उलट इतर कितीतरी छोट्या मोठ्या जीवांना तुझ्यात प्रेमाने सामावून घेतोस. असं मिळून मिसळून राहिलं तर अर्थ आहे रे सगळ्याला. कधी शहाणपण येणार काय जाणे. असो


मला मात्र तुझ्या किनारी आलं की एकदम अंतर्मुख व्हायला होतं. फक्त घोट्यापर्यंत येणाऱ्या लाटेतून शांतपणे चालायला फार आवडतं मला. तुझ्याजवळ येऊनही वरून जशी कोरडी राहते ना अगदी तश्शीच कोरडी आतून देखील होऊन जाते. एरवी कायम घोंगावणारे मनातले, डोक्यातले विचार तुझ्या अथांग दर्शनाने बुजरे होऊन जातात. तेच क्षण आवडतात मला आणि हे सुंदर क्षण मी एका कुपीत बंद करून ठेवलेत. ती कुपीसुद्धा ना या क्षणांना बंद केल्यापासून सुगंधी होऊन गेलेय अगदी. कधी इच्छा होईल तेव्हा एकेक क्षण मी त्यातून बाहेर काढते, थोडावेळ त्यात रमते आणि मग परत आत ठेवून देते. तुझ्यापासून लांब असल्यावर दुसरं काय करणार! लांब आहे म्हणून तक्रार मात्र नाही हं. उलट बऱ्याच विरहानंतरची भेट जास्त छान असते हो ना? आता आपण कधी भेटू माहीत नाही. तोवर सोबत करायला ते मोहक क्षण आहेतच माझ्याजवळ….

 

तू माझा आहेस हे पक्कं माहितेय मला, पण मी तुझी आहे का? मी तरी काय विचारतेय हे. तुला कसं ना असं फक्त तुझं-माझं करून चालेल. तू तर सगळ्यांचाच आहेस आणि तसाच राहा. थांबते आता… भेटू लवकरच.

जस्मिन जोगळेकर